जळगाव[M1] [M2] : प्रतिनिधी : महाशिवरात्रीच्या यात्रेत केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीची घटना घडली. केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यासह आणि पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर चार टवाळखोरांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात घडली. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पुर्वसंध्येलाच भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड झाल्याने गृहखाते लक्ष्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Raksha Khadse)
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींसह तिच्या मैत्रिणींची टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रकार घडला. खडसे यांनी टवाळखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोथळी गावात महाशिवरात्रीनिमित्त अदिशक्ती मुक्ताईबाईंची यात्रा भरली होती. यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या एका कार्यक्रमात रक्षा खडसे यांनी कन्या फराळ वाटप केले. त्यावेळी भोई नावाचा तरुण त्यांचा पाठलाग करत होता. त्यानंतर खडसे यांच्या कन्या सायंकाळी यात्रेत मैत्रिणीबरोबर फिरायला गेल्या. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षकही होता. त्यावेळी भोई नावाचा तरुण आपल्या टवाळखोर मित्रासमवेत त्यांच्या पाठीमागे लागल्या. खडसेंच्या कन्या ज्या पाळण्यात बसल्या त्याच पाळण्यात भोई नावाचा तरुण बसला. तसेच खडसेंच्या कन्येचे व्हिडिओ चित्रणही केले. ही बाब खडसेंच्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्याने टवाळखोरांना रोखले. त्यावेळी टवाळखोर आणि सुरक्षारक्षकांची झटापटही झाली. (Raksha Khadse)
खडसेच्या कन्येने घरी येऊन रक्षा खडसे यांनी घडलेला प्रकार कळल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. अनिकेत भोई, पियुष मोरे, सोम माळी, अतुल पाटील, किरण माळी यांच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रक्षा खडसे यांनी छेडखानी करणाऱ्या टवाळखोरांना अटक करावी अशी मागणी केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला पण टवाळखोरांना अटक केली नाही. त्यानंतर संतप्त रक्षा खडसे पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. माझ्या मुलींसमवेत सुरक्षा रक्षक असतानाही माझ्या मुलीची ज्या पद्दातीने छेडछाड केली तर सर्वसामान्य मुलींचे काय होणार? असा प्रश्नही त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना विचारला. मी केंद्रीय मंत्री आणि खासदार म्हणून नाही तर आई म्हणून न्याय मागण्यासाठी पोलिस ठाण्यात आलो आहे. माझीच मुलगी सुरक्षीत नाही तर इतरांचे काय? राज्य सरकारने टवाळखोरांविरोधात कठोर कारवाई करावी. तसेच याबद्दलच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मागणी करणार आहे, असेही खडसे म्हणाल्या. मी मुख्यमंत्र्यांना भेटून अशा घटनासंदर्भात अधिकाअधिक कारवाईची मागणी करणार आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जात असेल तर राज्यात तर सर्वसामान्यांच्या मुलींबाबत सरकारचे नेमके धोरण काय आहे? असा सवालही उपस्थित केला जात आहे. (Raksha Khadse)
या प्रकरणी माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या घरामधील मुलीसोबत घडला, असे नाही तर हा सामाजिक प्रश्न आहे. महाराष्ट्रात अशा स्वरुपाच्या अनेक घटना घडत आहेत. अनेक घटनांची नोंद होत नाही. अशा घटनासंदर्भात मुली समोर येत नाहीत. मात्र रक्षा खडसे यांची मुलगी धाडसाने पुढे आली, असे एकनाथ खडसे म्हणाले. माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली. त्यासंदर्भात अनेकवेळा सरकारला म्हटले आहे की तुम्ही या विषयी बांगड्या घातल्या आहेत का? अशा घटनांना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारणाचा संरक्षण मिळत आहे. या संदर्भात येणाऱ्या अधिवेशनात प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही एकनाथ खडसे यांनी सांगितले. (Raksha Khadse)