कोल्हापूर; प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांचे काम आणि कार्य हे खूप मोठ्या उंचीचे आहे. त्यांचे विचार कोणी कितीही दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तरी ते कधीच संपणार नाहीत, असा इशारा खासदार शाहू छत्रपती यांनी भाजपला दिला. (Shahu Chhatrapati)
राज्य सरकारच्या शपथविधीच्या वृत्तपत्रातील जाहिराती पाहिल्या असता हे ठरवून केले आहे. हे मुद्दाम केले आहे हे सिद्ध होत आहे. सर्वांनी याचा निषेध केला पाहिजे ही लढाई खूप वर्षाची आहे . सव्वाशे वर्षांपूर्वी ही अशीच परिस्थिती झाली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शाहू छत्रपती म्हणाले, संपूर्ण भारतात राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा आदर केला जातो. सरकारने जाहिरातीत घोडचूक केली आहे. याचे पडसाद आणि परिणाम कोल्हापूरसह महाराष्ट्रात आणि देशात उमटू शकतात हे सरकारने लक्षात घ्यावे. सरकारला सात दिवसही झाले नाहीत तोपर्यंत ते राजर्षी शाहूंचे विचार हे सरकार विसरले. सरकारने हे जाणीवपूर्वक केले आहे हेही सिद्ध झाले आहे.
दरम्यान, शपथविधी सोहळ्याबाबत भाजपने केलेल्या जाहिरातीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा फोटो वगळल्याचे लक्षात आल्यानंतर त्याबाबतच्या तीव्र प्रतिक्रिया कोल्हापुरात उमटल्या. राजर्षी शाहू प्रेमींच्या वतीने नर्सरी बागेतील शाहू समाधी स्मारक स्थळ येथे निदर्शने करत सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक राजू लाटकर, उद्धव सेनेचे विजय देवणे, माजी महापौर आर. के. पोवार, कॉम्रेड चंद्रकांत यादव, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, ॲड. बाबा इंदुलकर, शिवाजीराव परुळेकर, भारती पवार, अनिल घाडगे आदी उपस्थित होते.
राजू लाटकर म्हणाले, सरकारने क्रांतिकारी विचारांचे आणि मानवतावादी, लोकहितवादी असणाऱ्या राजर्षी शाहूंचा फोटो वगळला आहे . याविरुद्ध बहुजन समाजाने पेटून उठले पाहिजे. कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनीही मुंबईत याचा निषेध केला पाहिजे. (Shahu Chhatrapati)
उबाठा सेनेचे विजय देवणे म्हणाले, सरकारने महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे.
यावेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. के. पोवार, भारती पोवार, ॲड. बाबा इंदुलकर , संदीप देसाई यांनी भाजपचा तीव्र निषेध केला.
हेही वाचा :
- ९५ विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनबद्दल संशय!
- सुटका झाली, पण आता एकटे जायला भीती वाटते…
- अभिनेत्रीच्या बहिणीने प्रियकराला जाळून मारले