रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. औरंगजेबाच्या कबरीनंतर महाराष्ट्रात नवा ऐतिहासिक वाद सुरू होण्याची चिन्हे त्यामुळे दिसू लागली आहेत. (Raigad Waghya Dog)
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक फेसबुक पोस्ट करून वाघ्या कुत्र्याची रायगडावरील समाधी हटवण्याची मागणी केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की :
संभाजीराजे छत्रपती यांची पोस्ट
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे. (Raigad Waghya Dog)
समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.
कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली… (Raigad Waghya Dog)
भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे.
संभाजी ब्रिगेडची कारवाई
वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने गेल्या काही वर्षापासून लावून धरली होती. वारंवार मागणी करुनही शासनाकडून या शिल्पासंदर्भात कसलाच निर्णय न होत नव्हता. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी १ ऑगस्ट २०१२ रोजी ही समाधी हटवली. काही सामाजिक संघटनांनी या कुत्र्याला आपल्या अस्मितेचे प्रतिक मानले. संभाजी ब्रिगेडच्या विरोधात भूमिका घेतली. त्या सामाजिक दबावाला बळी पडूत शासनाने तात्काळ ते शिल्प पुनर्स्थापित केले. (Raigad Waghya Dog)
मुळ प्रश्न आहे तो वाघ्या शिवचरित्रात असण्याचा. समकालीन संदर्भ साधनात कसलाही त्याचा कसलाही उल्लेख नाही. हे शिल्प केवळ दंतकथेवर आधारित आहे. शिवकाळानंतर ज्यांनी ज्यांनी रायगडचा अभ्यास केला त्यांच्याही साहित्यात या कुत्र्याचा उल्लेख मिळत नाही. उदाहरणादाखल : १८६९ साली “महात्मा जोतिराव फ़ुले” स्वत: रायगडावर गेले, शिवरायांची दुर्लक्षीत झालेली समाधी शोधून काढली आणि शिवरायांवर प्रदीर्घ पोवाडा लिहिला. पण यात कुठेच वाघ्याचा उल्लेख नाही. १८८१-८२ मध्ये “जेम्स डग्लज ” हा इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला. या अधिका-यानेही त्याच्या “बुक ऑफ़ बॉम्बे” या पुस्तकात रायगडचे आणि शिव समाधीचे नकाशासहीत तपशीलवार वर्णन केले आहे. त्यांनीही वाघ्याचा कुठेही उल्लेख केला नाही.
दंतकथेतील या कुत्र्याचा सर्वप्रथम संदर्भ आला तो १९०५ साली “चिं. ग.गोगटे” यांच्या “महाराष्ट्र देशातील किल्ले” या पुस्तकात. या कुत्र्याचे ’वाघ्या’ असे नामकरण केले नाटककार ’राम गणेश गडकरी’ यांनी. त्यांच्या “राजसंन्यास” या नाटकाच्या माध्यमातून. गडकरींनी त्यांचे हे नाटक वाघ्याला अर्पण केलेले आहे. वाघ्याच्या चबुत-यावर “राजसंन्यास” या नाटकातील काही ओळी कोरल्या आहेत. विशेष म्हणजे गडकरींचे हे नाटक शिवराय आणि शंभूराजे यांच्या बदनामीने ओतप्रत भरलेले आहे. गडकरींच्या राजसंन्यास नाटकाचे लेखन २३ जून १९१६ ते ७ जानेवारी १९१७ या काळात घडले आहे. (Raigad Waghya Dog)
वाघ्या कुत्रा ऐतिहासिक असल्याचा दावा
प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांच्या मते वाघ्या कुत्रा हे ऐतिहासिक वास्तव आहे. त्यासाठी ते एक पुरावा देतात. ज्यावेळी संभाजी ब्रिगेडने वाघ्याचा पुतळा हटवला होता, तेव्हा त्याच्या पुनर्स्थापनेसाठी सोनवणी यांनी उपोषण केले होते. सोनवणी यांचे म्हणणे आहे की वाघ्याचा पुरावा जर्मनांनी जपलेला आहे. त्यासाठी ते एका सूचीचा संदर्भ देतात. त्या पुस्तकाचे नांव…”Negotiations: authors and subjects of books I-X (1834-1852) ” प्रकाशित झाल्याचे वर्ष…१९३०. हे पुस्तक म्हणजे १८३४ ते १८५२ या काळात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची १२६ पानी सूची असुन त्यात लेखक व पुस्तकांच्या विषयांबाबत माहिती आहे. याच पुस्तकात जे लिहिले आहे की-
“शिवाजी नैसर्गिक मृत्युने रायगड येथे १६८० साली मरण पावला. त्याच्या दहनस्थळी स्मारक बांधण्यात आले. त्याबाजुलाच एक पाषाणस्तंभ असुन त्यावर दगडात ताशीवपणे बनवलेला कुत्रा (शिवस्मारकाकडे) पहात आहे. हाच वाघ्या…शिवाजीचा लाडका कुत्रा, ज्याने जळत्या चितेत उडी घेतली होती…”
या ग्रंथात फक्त १८३४ ते १८५२ या काळात प्रसिद्ध झालेल्या ऐतिहासिक पुस्तकांची नोंद आहे, म्हणजेच वाघ्याबाबतचा मजकुर याच काळात लिहिल्या गेलेल्या कोणत्यातरी पुस्तकातुन या सूचीत घेण्यात आला आहे हे उघड आहे. या सूचीचे पुनर्मुद्रण १९३० सालचे आहे. तेही जर्मनीत झालेले. वाघ्याचा नवा पुतळा पुन्हा बसवण्यात आला तो १९३६ साली.
शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी हा पुतळा ब्राह्मणांनी १९३६ साली बसवला असा आरोप आहे. पण मग १८३४ ते १८५२ साली अधेमधे प्रसिद्ध झालेल्या, त्याही जर्मन ग्रंथात, वाघ्या कसा आला? असा संजय सोनवणी यांचा प्रश्न आहे
याचा अर्थ एवढाच आहे कि संभाजीराजांनी शिवस्मारक बांधल्यानंतर लगेच वाघ्याचेही स्मारक बनवले होते. येथे वाघ्याच्या दगडी ताशीव पुतळ्याचा उल्लेख आहे. याचाच अर्थ असा कि मुळ पुतळा दगडीच होता. कालौघात तो नष्ट झाला…वा केला गेला. आताचा पुतळा तर पंचधातुचा आहे. १९३० साली मुळात तो अस्तित्वातच नव्हता. म्हणजेच ज्या लेखकाने वाघ्याच्या स्मारकाची माहिती दिली आहे ती मूळच्या पुतळ्याची व स्मारकाची आहे. म्हणजेच वाघ्याचे स्मारक शिवस्मारक जेंव्हा मुळात बनवले गेले तेंव्हापासूनचेच आहे. कोणा महाराणीच्या जागेवर आताचे स्मारक नाही. वाघ्या ही दंतकथा नाही. कुत्र्याचे नांव “वाघ्या” आहे असे जर्मनांनीही नोंदवलेले आहे. तसा भारताशी जर्मनांचा कसलाही राजकीय किंवा सांस्कृतिक हितसंबंध नव्हता. मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांमध्ये वाघ्याचा उल्लेख मिळत नाही म्हणून वाघ्या अस्तित्वातच नव्हता असे म्हणणे अज्ञानमूलक आहे, असे सोनवणी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. (Raigad Waghya Dog)
वादग्रस्त विषय
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचे वास्तव हा एक वादग्रस्त आणि चर्चेचा विषय आहे. वाघ्या हा कथितरित्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळीव कुत्रा होता, ज्याने महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८०) त्यांच्या चितेत उडी मारून स्वतःचे जीवन संपवले, अशी दंतकथा प्रचलित आहे. या कथेनुसार, वाघ्याची समाधी रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी बांधण्यात आली. परंतु, या कथेच्या सत्यतेबाबत इतिहासकारांमध्ये आणि संशोधकांमध्ये मतभेद आहेत.
ऐतिहासिक पुराव्यांचा अभाव
शिवकालीन समकालीन कागदपत्रांमध्ये किंवा विश्वसनीय ऐतिहासिक स्रोतांमध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याचा किंवा त्याच्या चितेत उडी मारण्याच्या घटनेचा कोणताही उल्लेख सापडत नाही. रायगडावरील वाघ्याचा पुतळा आणि समाधी १९३६ मध्ये शिवाजी स्मारक समितीने उभारली, जी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल २५६ वर्षांनी घडली. ही समाधी ऐतिहासिक घटनेवर आधारित नसून, लोककथा आणि नाटकातून प्रेरित असल्याचे मानले जाते. या समितीमध्ये कोण पदाधिकारी होते, याचेही संदर्भ सापडत नाहीत.
वाद आणि आधुनिक दृष्टिकोन
समर्थन: काही लोकांचे मत आहे की वाघ्या ही कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणीप्रेमाचे आणि स्वामिनिष्ठेचे प्रतीक आहे. धनगर समाजात कुत्र्याला विशेष स्थान असल्याने ही कथा त्यांच्याशी जोडली जाते. (Raigad Waghya Dog)
विरोध: इतिहास संशोधक आणि शिवप्रेमी, उदाहरणार्थ संभाजी ब्रिगेड आणि संभाजीराजे छत्रपती , यांचा असा युक्तिवाद आहे की वाघ्याची समाधी अनैतिहासिक असून ती शिवचरित्राला कलंकित करते. २०१२ मध्ये संभाजी ब्रिगेडने हा पुतळा हटवला होता, परंतु प्रशासनाने तो पुन्हा स्थापित केला. २०२५ मध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही समाधी ३१ मे २०२५ पर्यंत हटवण्याची मागणी केली आहे, कारण तिला ऐतिहासिक आधार नाही.
निष्कर्ष
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचे वास्तव हे ऐतिहासिक घटनांवर आधारित नसून, लोककथा, साहित्य आणि २०व्या शतकातील निर्मितीवर अवलंबून आहे. ती एक भावनिक आणि सांस्कृतिक प्रतीक म्हणून काहींसाठी महत्त्वाची असली, तरी तिचा शिवचरित्राशी थेट संबंध असल्याचा पुरावा नाही. सध्या या समाधीच्या सत्यतेवरून वाद सुरू असून, ती हटवावी की ठेवावी हे शासनाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
संभाजीराजे छत्रपती यांच्या मागणीनंतर हा विषय कसे वळण घेतो, हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा :
कोरटकरच्या मुसक्या आवळल्या
बुलडोझर कारवाईवर यूपी सरकारला कोर्टाने फटकारले