Home » Blog » Rahane : ‘केकेआर’च्या कर्णधारपदी अजिंक्य रहाणे

Rahane : ‘केकेआर’च्या कर्णधारपदी अजिंक्य रहाणे

उपकर्णधार म्हणून व्यंकटेश अय्यरची निवड

by प्रतिनिधी
0 comments
Rahane

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५च्या मोसमासाठी गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. कोलकाताने २०२५साठीच्या लिलावामध्ये सर्वाधिक किंमत मोजून करारबद्ध केलेल्या व्यंकटेश अय्यरची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. (Rahane)

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या मोसमाचे विजेतेपद पटकावल्यानंतर कोलकाताने २०२५च्या लिलावापूर्वी श्रेयसला करारमुक्त केले होते. त्यामुळे, आगामी मोसमात कोलकाताचा कर्णधार कोण, या प्रश्नावर अखेर रहाणेच्या रूपाने उत्तर मिळाले. विशेष म्हणजे, २०२४ च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या लिलावात पहिल्या दिवशी रहाणेला कोणत्याच संघाने करारबद्ध केले नव्हते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी कोलकाताने १.५ कोटी रुपये या मूळ किमतीला त्याला करारबद्ध केले. (Rahane)

रहाणे आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा कोलकाता संघाकडून खेळणार आहे. यापूर्वी २०२२ च्या मोसमात तो कोलकाता संघाकडून खेळला होता. तथापि, त्यावेळी त्याला सात सामन्यांत १०३.९० च्या स्ट्राइक रेटने अवघ्या १३३ धावा करता आल्या होत्या. २०२३ मध्ये त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने करारबद्ध केले. त्या वर्षी त्याने चेन्नईकून १७२.४८ च्या स्ट्राइक रेटने ३२६ धावा केल्या. मागील वर्षीच्या मोसमात त्याच्या नावावर १२३.४६ च्या स्ट्राइक रेटने २४२ धावा जमा होत्या. (Rahane)

रहाणेने यापूर्वी भारतीय कसोटी संघाचे, तसेच मुंबई रणजी संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्याचप्रमाणे, २०२४ च्या रणजी ट्रॉफी विजेत्या मुंबई संघाचाही तो कर्णधार होता. अलीकडेच मुंबईने सईद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यामध्ये रहाणेचा महत्त्वाचा सहभाग होता. या स्पर्धेत रहाणेने १६४.५६ च्या स्ट्राइक रेटने आणि ५८ च्या सरासरीने ४६९ धावा फटकावल्या. आयपीएलमध्ये रहाणेने यापूर्वी २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे, तर २०१८ व २०१९ मध्ये रायस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. (Rahane) व्यंकटेश अय्यरला कोलकाताने २०२४ च्या लिलावापूर्वी मुक्त केले होते. परंतु, त्यानंतर लिलावामध्ये तब्बल २३.७५ कोटी रुपये मोजून कोलकाताने त्याला पुन्हा करारबद्ध केले. तो या लिलावातील चौथ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला होता. अय्यर २०२१ पासून कोलकाताकडून खेळत असून मागील वर्षी कोलकाताच्या विजेतेपदामध्ये त्याच्या फलंदाजीचा मोलाचा वाटा होता. त्याने २०२४ च्या आयपीएल मोसमात १५८.७९ च्या स्ट्राइक रेटने ३७० धावा फटकावल्या. आगामी मोसमात कोलकाताची सलामीची लढत २२ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे. (Rahane)

हेही वाचा :

 भारत साखळीत अपराजित

विदर्भ तिसऱ्यांदा रणजी विजेता

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00