नवी दिल्ली : गुजरात टायटन्स संघाचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा व्यक्तिगत कारणांमुळे मायदेशी दक्षिण आफ्रिकेला परतला आहे. गुजरात संघाकडून गुरुवारी याविषयी माहिती देण्यात आली असली, तरी रबाडाच्या परतण्याचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. (Rabada) रबाडाने यंदाच्या मोसमात गुजरातकडून सुरुवातीचे दोन सामने खेळले. त्यापैकी पंजाब किंग्जविरुद्ध त्याने ४१ धावांत १, तर मुंबई इंडियन्सविरुद्ध ४२ धावांत १ विकेट घेतली होती. बुधवारी बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध रबाडाच्या जागी अर्शद खानला गुजरात संघात स्थान देण्यात आले होते. यंदाच्या मोसमासाठी झालेल्या लिलावात गुजरातने रबाडाला १०.७५ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. रबाडाने आतापर्यंत ८२ आयपीएल सामन्यांत ११९ विकेट घेतल्या आहेत. रबाडा संघात कधी परतणार, याविषयी गुजरातकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. (Rabada)

भुवनेश्वर कुमारची ब्राव्हो, अश्विनशी बरोबरी बेंगळुरूचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने गुजरातविरुद्धच्या सामन्यात एक विकेट घेऊन आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी झेप घेतली. भुवनेश्वरच्या खात्यात १८३ विकेट झाल्या असून त्याने ड्वेन ब्राव्हो आणि रविचंद्रन अश्विनशी बरोबरी केली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलदाजांमध्ये युझवेंद्र चहल अग्रस्थानी असून त्याने १६२ सामन्यांत २०६ विकेट घेतल्या आहेत. त्याखालोखाल पियुष चावलाच्या नावावर १९२ सामन्यांत १९२ विकेट आहेत. भुवनेश्वरने १७८ सामन्यांत १८३ विकेट घेताना प्रत्येकी दोनवेळा डावात ४ व ५ बळी घेतले आहेत. १९ धावांत ५ विकेट ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. २०१६ आणि २०१७ या सलग दोन मोसमात भुवनेश्वरने पर्पल कॅपचा बहुमान पटकावला होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर आता ब्राव्होसह संयुक्तरीत्या अग्रस्थानी आहे.
हेही वाचा :
सॅमसनच्या नेतृत्वाचा मार्ग मोकळा
भारताचे चार बॉक्सर उपांत्य फेरीत