Home » Blog » R. R. borade passes away : ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे कालवश

R. R. borade passes away : ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे कालवश

८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

by प्रतिनिधी
0 comments
R. R. borade passes away

छत्रपती संभाजीनगर : मराठी साहित्यविश्वाचा परीघ आपल्या लेखणीने समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे (वय ८४) यांचे मंगळवारी निधन झाले. एमजीएम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृषी आणि ग्रामीण भावविश्वाच्या माध्यमातून मराठी साहित्य सकस करणारा दमदार साहित्यिक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्व पोरके झाल्याची भावना व्यक्त होत आहे. (R. R. borade passes away)
त्यांच्यावर सायंकाळी सेंट्रल नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्येत खालावत चालली होती. त्यामुळे त्यांचा सार्वजनिक वावर जवळपास थांबलाच होता. मंगळवारी (ता.११) सकाळी साडे आठच्या सुमारास त्यांचे रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या निवासस्थानी त्यांचे चाहते, साहित्यिक, विद्यार्थी, वरिष्ठ अधिकारी यांची रीघ लागली. त्यांच्या पश्चात पत्नी सुलभा बोराडे, मुली प्रेरणा, तृप्ती, मंजुश्री, अरुणा आणि नातवंडे असा परिवार आहे.

रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा. रं. बोराडे यांनी मराठी साहित्यात विपुल लेखन केले. त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला होता. हा पुरस्कार वितरण सोहळा होण्याआधीच त्यांनी घेतलेली एक्झिट चटका लावून गेली.(R. R. borade passes away)

रा. रं. बोराडे यांनी विपुल लेखन केले. कणव आणि कमालीची संवेदनशीलता हा त्यांच्या साहित्याचा विशेष. त्यांची ‘पाचोळा’ ही महत्त्वाची कादंबरी. त्यांच्या १९६२ साली आलेल्या ‘पेरणी’ ते ‘ताळमेळ’, ‘मळणी’, ‘वाळवण’, ‘राखण’, ‘गोधळ’, ‘माळरान’, ‘बोळवण’, ’वरात’, ‘फजितवाडा’, ‘खोळंबा’, ‘बुरुज’, ‘नातीगोती’, ‘हेलकावे’, ‘कणसं आणि कडबा’ यासारख्या कथासंग्रहांनी मराठवाड्यातील कष्टकऱ्यांचे दु:ख समोर आणले. मराठवाड्यातील माणसं, स्त्रीयांचे शोषण, कौटुंबिक ताणतणाव, गरिबी, दुष्काळ, शेती, निसर्ग, देव-दैवते, श्रद्धा-अंधश्रद्धा, ग्रामीण परंपरा, नातीगोती आणि त्यातील राजकारण, माणसांचं बेरकीपण त्यांनी आपल्या साहित्यात चित्रीत केले.  (R. R. borade passes away)
नोकरीच्या निमिताने त्यांचे वास्तव्य शहरी भागात राहिते; तथापि त्यांची नाळ मराठवाड्यातील ग्रामीण जीवनाशी कायम राहिली. गावाने घडवलेला त्यांचा पिंड कायम राहिला. तेच भावविश्व आणि ग्रामीण जीवनाचे कंगोरे त्यांच्या साहित्यातही झिरपू लागले. १९५७ साली त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली आणि त्यांच्या लेखनाचा प्रवास सुरू झाला. जोमदार लेखणीच्या जोरावर त्यांनी मराठी साहित्यविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.(R. R. borade passes away)

त्यांच्या ‘पाचोळा’ या कादंबरीवर एमजीएम विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सने चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांच्या आणखी तीन कादंबऱ्यांवर चित्रपटांची निर्मिती झाली आहे.

त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्षपदही सांभाळले होते. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव अनेकदा चर्चेत असे. पण निवडणूक लढवण्यास त्यांचा तीव्र विरोध होता. त्यामुळे ते अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत. पण १९८९ मध्ये हिंगोलीत झालेल्या १७ व्या मराठवाडा साहित्य संमेलनासाठी त्यांचे नाव बिनविरोध जाहीर झाल्याने त्यांनी हे पद स्वीकरले होते. त्यांनी अनेक संस्था, विद्यापीठे व महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून त्यांचे कार्य मोठे आहे. नव्या लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ‘शिवार’ प्रतिष्ठान स्थापन केले होते. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून नव्या साहित्यिकांचा ते दरवर्षी शिवार पुरस्कार देऊन गौरव करीत. (R. R. borade passes away)

  • अल्प परिचय
    रा.रं.बोराडे यांचा जन्म २५ डिसें १९४० रोजी काटगाव (जि. लातूर) येथे शेतकरी कुंटुंबात झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बार्शी (जि. सोलापूर) येथे, पदवीपर्यंत शिक्षण दयानंद महाविद्यालय, सोलापूर तर पदव्युत्तर शिक्षण तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात छत्रपती संभाजीनगरात येथे झाले.
    त्यांचे विपुल लेखन विविधांगी आहे. कथा, कादंबरी नाटक आणि समीक्षा या प्रकारात वैशिष्ट्यपूर्ण साहित्यनिर्मिती. १९७०-७२ नंतरचा ग्रामीण महाराष्ट्र हा त्यांच्या लेखनाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू.
    रा.रं बोराडे यांच्या लेखनाचे वैशिष्टय म्हणजे ग्रामीण जीवनस्तरावर बदलत गेलेली समाजव्यवस्था आणि तिच्यातून निर्माण झालेले नातेसंबंधाचे नवे आयाम.
  • प्राचार्यपदासह विविध जबाबदाऱ्या
    ३० वर्षे प्राचार्य म्हणून काम करीत असताना प्रशासकीय जबाबदार्‍यांच्या जोडीला लेखक म्हणून आणि महाविद्यालयीन तरूणांमधील सृजनक्षमतेला पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारीही रा. रं. बोराडे यांनी निष्ठेने सांभाळली.‘ग्रामीण आत्मकथन शिबिर’,‘विद्यार्थी नवलेखक शिबिर’, ‘विद्यार्थीनी नवलेखिका शिबिर’,‘लोककला कौशल्य विकास शिबिर’ यासारख्या राज्यपातळीवरील शिबिरांच्या आयोजनाबरोबरच मान्यवर साहित्यिकांच्या प्रत्यक्ष भेटींमधून विद्यार्थ्यांमधील सृजन जाणीवा त्यांनी समृध्द केल्या.
  • विपुल साहित्यसंपदा
    १९५७ साली मॅट्रिकमध्ये असताना रा.रं बोराडे यांची ‘वसुली’ ही कथा प्रसिध्द झाली तर १९६२ साली पदव्युत्तर मराठीच्या अंतिम वर्षाला असताना पेरणी हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर मळणी (१९६७), कणसं आणि कडबा (१९७४), नातीगोती (१९७५), बोळवण (१९७६), माळरान (१९७६), राखण (१९७७), हरिणी (२०००) इ. कथासंग्रह प्रकाशित झाले. यात फजितगाडा (१९७३), खोळंबा (१९७३), ताळमेळ (१९७६), गोंधळ (१९७८), हेलकावे (१९९०), अगंअगं मिशी (२००८) या विनोदी कथासंग्रहांचाही समावेश. पाचोळा (१९७१), सावट (१९८७), आमदार सौभाग्यवती (१९८८), चारापाणी (१९९०), रहाट पाळणा (१९९६), इथं होतं एक गाव (२०००), वळणाचं पाणी (२००७), नामदार श्रीमती (२००७), मरणदारी (२००८), रिक्त अतिरिक्त (२००९), राजसा (२०१३), लेक माझी (२०१७), आयुष्याच्या संध्याकाळी (२०१८), गर्भ (२०१९) इ. कादंबर्‍या प्रकाशित. महानुभाव (१९९३), कथा एका तंटामुक्त गावाची (२०१०), करायला गेले माकड (२०१४) इ.विनोदी कादंबर्‍याही प्रकाशित. चुकभूल घ्यावी द्यावी (१९७२), कश्यात काय अन् फाटक्यात पाय (१९७६), पिकलं पान (१९७९), विहिर (१९८२), पाच ग्रामीण नाटीका (१९८७), हसले गं बाई फसले (१९८७), बंधमुक्ता (१९८८), चोरीचा मामला (१९९६), मी आमदार सौभाग्यवती (२००३), मलाच तुमची म्हणा (२००९) इ. नाट्यलेखन प्रकाशित आहे . ज्यात एकांकिका, वगनाट्य यांचा समावेश. आम्ही लेकी कष्टकर्‍यांच्या (१९८२), शाळेला चाललो आम्ही (१९९३), संकल्पाचे दारी (२००९), हरवलेली शाळा (२०१५), पोपट उडाला भुर्ररर (२०१८), इ. बालसाहित्य प्रकाशित आहे. ग्रामीण साहित्य (१९९२), तिळा तिळा डिकी उघड (२००२), शेवटचा प्रश्न (२००२), एकदा असं झालं (२०११), अनुबंधाची पेरणी (२०१८) इ. अनुभव कथन करणारे ग्रंथ प्रकाशित.
  • पुरस्कार
    ‘मळणी’ कथासंग्रहासाठी उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा राज्यपुरस्कार (१९६८).
    ‘पाचोळा’ कादंबरीसाठी उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा राज्यपुरस्कार (१९७१)
    ‘पाच ग्रामीण नाटिका’ या एकांकिका संग्रहासाठी उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा राज्यपुरस्कार (१९८८)
    ‘पाचोळा’ कादंबरीला भैरु रतन दमाणी साहित्यपुरस्कार (१९८९)
    ‘चारापाणी’ कादंबरीला मराठवाडा साहित्य परिषदेचा नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार (१९९०)
    ‘कणसं आणि कडबा’ या कथासंग्रहासाठी उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा राज्यपुरस्कार
    ‘चोरीचा मामला’ या एकांकिकासंग्रहासाठी उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा राज्यपुरस्कार (१९९७)
    राज्यशासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार (२०००)
    मराठवाडा सेवा गौरव पुरस्कार (२००१)
    अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा जयवंत दळवी नाट्यलेखन पुरस्कार (२००३)
    ‘साहित्य संस्कृती सन्मान’ (२०१०)
    ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’, महाराष्ट्र शासन (२०२४)

हेही वाचा :

बोराडे नावाचे साहित्य शिवार
कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच वस्तुसंग्रहालय

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00