भुवनेश्वर : प्रो-हॉकी लीग स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघाला मंगळवारी स्पेनविरुद्ध ३-४ अशा गोलफरकाने पराभव सहन करावा लागला. या स्पर्धेतील भारतीय महिला संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. (Pro-Hockey League)
भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर प्रो-हॉकी लीग स्पर्धेच्या भारतातील टप्प्याचे सामने खेळवण्यात येत आहेत. स्पेनविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच सत्रामध्ये भारताला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. तथापि, यांपैकी एकाही पेनल्टी कॉर्नरवर भारताला गोल करता आला नाही. दुसऱ्या सत्रामध्ये बलजित कौरने १९ व्या मिनिटास मैदानी गोल करून भारताचे खाते उघडले. मात्र, त्यानंतर चारच मिनिटांमध्ये सोफिया रोगोस्कीने स्पेनतर्फे बरोबरीचा गोल केला. या सत्रात स्पेनला पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले. मध्यंतरास पाच मिनिटे शिल्लक असताना मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर एस्टेल पेट्चेमने गोल करून स्पेनला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. या पेनल्टी कॉर्नरविरोधात भारताने व्हिडिओ रिव्ह्यूही घेतला. परंतु, त्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला नाही. (Pro-Hockey League)
मध्यंतरानंतर तिसऱ्या सत्रामध्ये, साक्षी राणाने ३८ व्या मिनिटास भारताचा दुसरा गोल केला. त्यानंतर, ४५ व्या मिनिटास ऋतुजा पिसाळने गोल करून भारताला ३-२ अशा आघाडीवर पोहचवले. अखेरच्या सत्रामध्ये भारताला केवळ ही आघाडी टिकवणे आवश्यक होते. तथापि, या सत्रातही स्पेनला पाच पेनल्टी कॉर्नर बहाल केले. यांपैकी, ४९ व्या मिनिटास मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर एस्टेलने सामन्यातील वैयक्तिक दुसरा आणि स्पेनचा तिसरा गोल नोंदवला. त्यानंतर, ५४ व्या मिनिटास ल्युसिया जिमेनेझने स्पेनचा चौथा गोल करून ४-३ अशी आघाडी मिळवली. ही आघाडी भेदण्यात भारताला अखेरपर्यंत यश आले नाही. भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला. यापूर्वी, भारताला इंग्लंडविरुद्ध पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव पत्करावा लागला होता. गुणतक्त्यात भारताचा संघ ४ गुणांसह आठव्या स्थानी आहे. (Pro-Hockey League)