Home » Blog » Prakash pawar : डॉ. प्रकाश पवार चिकित्सक विश्लेषक

Prakash pawar : डॉ. प्रकाश पवार चिकित्सक विश्लेषक

कुलगुरू डॉ. शिर्के : राज्य वाङ्मय पुरस्काराबद्दल विद्यापीठातर्फे गौरव

by प्रतिनिधी
0 comments
prakash pawar

कोल्हापूर : प्रतिनिधी : डॉ. प्रकाश पवार हे ऐतिहासिक राजकारणाचे चिकित्सक विश्लेषक आहेत. त्यामुळेच त्यांच्या हातून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची महत्त्वपूर्ण पुस्तके साकार झाली, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले. (Prakash pawar)

विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश पवार यांच्या ‘राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत शाहू महाराज पुरस्कार नुकताच जाहीर झाला. या निमित्ताने डॉ. पवार यांचे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. (Prakash pawar)

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. प्रकाश पवार आंतरविद्याशाखीय अभ्यासक व संशोधक म्हणून लौकिक मिळवून आहेत. त्यापुढे जाऊन त्यांनी उपलब्ध इतिहास सामग्रीचे चिकित्सक विश्लेषण करून त्याद्वारे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची साकारलेली जीवनचरित्रे आजवरच्या चरित्रांपेक्षा वेगळी ठरली आहेत. त्यांच्या ‘राजमाता जिजाऊ’ या पुस्तकास राज्य पुरस्कार प्राप्त झाल्याचा विद्यापीठ परिवाराला अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतो. त्यांच्या या पुढील साहित्यकृतींनाही असेच मानसन्मान लाभोत, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनीही राजमाता जिजाऊ यांच्याविषयीचा हा ग्रंथ अमूल्य असल्याचे गौरवोद्गार काढले.

यावेळी बोलताना डॉ. प्रकाश पवार म्हणाले, या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय हे शिवाजी विद्यापीठाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे आणि डॉ. राजन गवस यांना आहे. विद्यापीठाच्या ग्रंथालयात अनेक दुर्मिळ संदर्भ आणि पुस्तके मिळाल्यामुळेच राजमाता जिजाऊ यांच्याविषयीची बहुमूल्य माहिती संकलित करता आली. चार वर्षे हे संशोधन सुरू राहिले. त्या आधारे लेखन करीत गेलो. हे लेखन डॉ. गवस यांनी वाचकांसमोर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच सहा हजार प्रतींची आवृत्ती अवघ्या वर्षभरात संपण्याच्या मार्गावर आहे, असे त्यांनी सांगितले. (Prakash pawar)

यावेळी मुंबई विद्यापीठाचे डॉ. दीपक पवार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. जी. बी. कोळेकर, उपकुलसचिव संध्या अडसुळे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते.

हेही वाचा :

ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे कालवश
बोराडे नावाचे साहित्य शिवार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00