भारतात असे काही हॅकर्स आहेत, की जे सायबर गुन्हे रोखण्यासाठी एक्स्पर्ट म्हणून योगदान देत आहेत. त्यासाठी त्यांच्या स्वतंत्र एजन्सीज देखील कार्यरत आहेत. ते लोकांमध्ये जनजागृतीबरोबरच सायबर गुन्ह्यांबाबत सरकारलाही मदत करत असतात. देशभरात सायबर हल्ले झाल्यानंतर त्यावर उपाययोजना करणे, सायबर गुन्ह्यातील तपासात मदत, मोठमोठ्या कंपन्यांना सायबर सिक्युरिटी पुरविणे, त्यांचा डेटा सुरक्षित ठेवणे अशी कामे हे सायबर एक्स्पर्ट करतात. यातील काहींचा फक्त भारतातच नव्हे तर जगभरात लौकिक आहे. आजच्या पिढीसाठी हे हॅकर्स प्रेरणा ठरू शकतात. चला तर जाणून घेऊया या सायबर हॅकर्स/ सायबर एक्सपर्टस विषयी…
१) अंकित फाडिया (Ankit Fadia) : फक्त बारा वर्षांचा असताना अंकितला कॉम्प्युटर हॅकिंगमध्ये आवड निर्माण झाली. त्याने त्याचे पहिले पुस्तक ‘The Unofficial Guide to Computer Hacking’ हे वयाच्या १४ व्या वर्षी प्रकशित केले. या पुस्तकाच्या जगभरात 3 दशलक्षहून अधिक प्रती विकल्या गेल्या. तसेच ११ भाषांमध्ये हे पुस्तक अनुवादित झाले आहे.
अंकित फाडिया हा वेब सिक्युरिटी क्षेत्रात निर्णायक कौशल्य असलेला स्वतंत्र पीसी सिक्युरिटी आणि डिजिटल इंटेलिजेंस ऑफिसर आहे, जो प्रामुख्याने गोल्डन स्टेट, अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली येथे कार्यरत आहे. अंकितचे काम हे मुख्यतः OS आणि नेटवर्किंग टिप्स तसेच ट्रिक्स (Tricks) आणि प्रॉक्सी (Proxy) वेबसाइटशी संबंधित आहे.
अंकित हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘डिजिटल इंडिया’चा ब्रँड ॲम्बेसिडर देखील आहे. अंकित सांगतो की, कोणत्याही स्मार्टफोनमध्ये पाच ॲप्स असणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या रिमाइंडरसाठी पहिला लुकआउट अँटीव्हायरस (Lookout anti-virus), दुसरा ट्रू-कॉलर (Trucaller), तिसरा रेड फोन (Red Phone), चौथा ॲप लॉकर (App locker ) आणि पाचवा Google Keep.
२) त्रिशनीत अरोरा (Trishneet Arora) : त्रिशनीत अरोरा याने वयाच्या १७ व्या वर्षी TAC सिक्युरिटी सोल्युशन्सची स्थापना केली. त्रिशनीत अरोरा याची TAC कंपनी सिक्युरिटी रिस्क आणि भेद्यता व्यवस्थापन (Vulnerability Management) क्षेत्रात जगभरात ओळखली जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करून, ही कंपनी सिस्टममधील कमकुवतपणा शोधते व ते काढून टाकण्यास मदत करते. ही कंपनी फॉर्च्युन ५०० कंपन्या तसेच जगभरातील सरकारी संस्थांसह अनेक क्लायंटना डेटा सिक्युरिटी सर्व्हिस पुरवत आहे. त्रिशनीतच्या ग्राहकांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज, गुगल यांसारख्या मोठ्या कंपन्या, सीबीआयसारख्या संस्थांचा समावेश आहे.
३) सनी वाघेला (Sunny Waghela) : ‘फिशिंग’ या सर्वात मोठी डेटा चोरी, हेरगिरी, बनावट प्रोफाइलची बनावटगिरी आणि अनेक आर्थिक उल्लंघनांसह १८ हून अधिक सायबर गुन्ह्यांचे निराकरण करण्यात सनी वाघेला एक्पर्ट आहे. ‘जमात उद दावा’ या प्रतिबंधित गटाची संवेदनशील माहिती मिळवून २६/११ च्या मुंबई बॉम्बस्फोटाची उकल करण्यात सनी याने सरकारला मदत केली होती.
सनी याला IT तसेच माहिती सुरक्षेचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. लोक, प्रोसेस, तंत्रज्ञानातील त्रुटी आणि सुरक्षित माहिती आर्किटेक्चर डिझाइनसाठी धोरणे विकसित करण्यापासून व्यवसायात उद्भवणाऱ्या विविध जोखमींचे विश्लेषण करून त्यावर तो उपाय सुचवतो.
सनी गेली अनेक वर्षे ‘टेक-डीफेन्स’चे प्रशिक्षण देत आहे. त्याने 650 हुन अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत. त्याच्या ‘HackTrack-Techdefence’ अंतर्गत विविध विद्यापीठे आणि कॉर्पोरेट संस्थांमधून 80 हजार सहभागींना माहिती सुरक्षा, एथिकल हॅकिंग, वेब ऍप्लिकेशन सुरक्षा आणि सायबर फॉरेन्सिक्स प्रशिक्षण दिले आहे.
४) विवेक रामचंद्रन (Vivesk Ramachandran) : विवेक हा दहा वर्षांपासून ‘वाय-फाय’ सुरक्षेवर (Wi-Fi) काम करत आहे. इतर गोष्टींबरोबरच, त्याने ‘Chellam’ (एक वाय-फाय फायरवॉल), वायमॉनिटर एंटरप्राइझ (802.11ac मॉनिटरिंग), चिगुला (वाय-फाय ट्रॅफिकचे विश्लेषण करण्यासाठी एक SQL-आधारित साधन), डिसेप्टॅकन (इंटरनेट ऑफ थिंग्ज हनीपॉट) विकसित केले तसेच WEP क्लोकिंगवर मात केली.
विवेक हा पेंटेस्टर अकादमीचा संस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक आहे. त्याने Caffe Latte हा सायबर हल्ला शोधून काढला, त्याने एंटरप्राइझ वाय-फाय बॅकडोअर्सची संकल्पना आणली आणि जगातील पहिली वाय-फाय फायरवॉल ‘Chellam’ तयार केली. विवेकने २००७ मध्ये SecurityTube.net सुरू केले, सुरक्षेसाठी हे एक YouTube आहे, जे सध्या वेबवरील सुरक्षा रिसर्चसंबंधी व्हिडिओंचा सर्वात मोठा संग्रह करते.
५) बेनिल्ड जोसेफ (Benild Joseph) : बेनिल्ड जोसेफ हा एक प्रसिद्ध ‘व्हाईट हॅट हॅकर’, लेखक, पॉडकास्टर, TEDx स्पीकर आणि सायबर सुरक्षा रिसर्चर आहे, कि ज्याचा भारतातील कॉम्पुटर सुरक्षा क्षेत्रात मोठा अनुभव आहे. Facebook, Yahoo, BlackBerry, Sony Pictures, Tesco, AstraZeneca, Vodafone आणि Deutsche Telekom सारख्या लोकप्रिय वेबसाइट्समध्ये Benilde द्वारे गंभीर समस्या त्याने शोधून काढल्या आहेत.
‘हॅकिंग द हॅकर’ या पुस्तकात बेनिल्डविषयी माहिती दिली गेली आहे. हे पुस्तक ब्रूस श्नियर, केविन मिटनिक, मार्क रुसिनोविच आणि जगातील सर्वोत्कृष्ट ‘व्हाईट हॅट हॅकर्स’ यांच्या मदतीने लिहिले आहे. याशिवाय ‘मायक्रोसॉफ्ट सोशल फोरम’ तसेच ‘सिलिकॉन इंडिया मॅगझिन’मध्येही भारतातील टॉप ‘व्हाईट हॅट हॅकर्स’मध्ये बेनिल्ड जोसेफ याचा समावेश करण्यात आला आहे.
६) कौशिक दत्ता (Kaushik Dutta) : तज्ञ अँड्रॉइड फोन हॅकर म्हणून ओळख असलेल्या कौशिक दत्ता याने या क्षेत्रातील विकासासाठी काही क्षेत्रे हायलाइट केली आहेत. Android फोनची सुरक्षा वाढविण्यासाठी तो कार्यरत आहे. इंटर्न म्हणून काम करण्यासाठी कौशिक याने यापूर्वी मायक्रोसॉफ्ट कंपनी सोडली. ‘Vysor’चा मालक असलेला कौशिक सध्या ClockworkMod Recovery ला Android डिव्हाइस रिकव्हरी पर्याय विकसित करत आहे.
७) प्रणव मिस्त्री (Pranav Mistry) : प्रणव हा एक रिसर्चर आणि कॉम्पुटर शास्त्रज्ञ आहे. तो STAR Lab चा (सॅमसंग टेक्नॉलॉजी आणि प्रगत संशोधन प्रयोगशाळा) पूर्वीचा अध्यक्ष आणि सीईओ होता. सध्या, तो आर्टिफिशियल रिॲलिटी बिझनेस TWO चा सीईओ आणि निर्माता म्हणून काम करत आहे.
अन्य हॅकर्स विषयी :
- राहुल त्यागी हा अँटी-हॅकिंग आणि सायबर सुरक्षा उपक्रमांसाठी अनेक संस्थांना सेवा देत आहे.
- साई सतीश हा सायबर सुरक्षा क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ञ आणि तरुण उद्योजक आहे. तो सध्या AIMER सोसायटीचा अध्यक्ष आहे.
- संगीत चोप्रा हा आयटी सुरक्षा तज्ञ आहे आणि भारतातील सर्वोत्तम नैतिक हॅकर्सपैकी एक आहे.
- फाल्गुन राठोड याने त्याच्याकडील उल्लेखनीय सायबर सुरक्षा कौशल्यामुळे सायबर गुन्ह्यांची गुंतागुंतीची प्रकरणे सोडवण्याच्या क्षेत्रात लौकिक मिळवला आहे.
- आनंद प्रकाश हा भारतातील आघाडीच्या एथिकल हॅकर्सपैकी एक असून जगभरात प्रसिद्ध आहे.
- प्रख्यात सुरक्षा संशोधक असीम जाखर हा वायफाय आणि झिगबी सुरक्षेसाठी त्याच्या व्यापक योगदानासाठी प्रसिद्ध आहे.