Home » Blog » कर्नाटक सीमेवर कोल्हापुरातील मराठी नेत्यांची धरपकड

कर्नाटक सीमेवर कोल्हापुरातील मराठी नेत्यांची धरपकड

पोलिस-शिवसैनिकांत धक्काबुक्की

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Ekikaran Yuva Samiti

कोल्हापूर; प्रतिनिधी : मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीच्या मेळाव्याला कर्नाटक राज्य सरकारने परवानगी नाकारली असून मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी निघालेल्या बेळगाव आणि कोल्हापूरातील मराठी नेत्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे. कोल्तहापूरातील शिवसैनिकांना कोगनोळी नाक्यावर रोखल्यावर पोलिस आणि शिवसैनिकांत जोरदार धक्काबुक्की झाली. मेळावा यशस्वी करणार असा निर्धार मराठी भाषिकांनी केला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यासह कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात असल्याने सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Maharashtra Ekikaran Yuva Samiti)

महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात आज सोमवारी (दि.९) मराठी भाषिकांचा मेळावा आयोजित केला आहे. पण कर्नाटक पोलिसांनी आठ ते २० डिसेंबर या कालावधीत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. बेळगावातील एकिकरण समितीच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कर्नाटक पोलिसांकडून पाळत ठेवली आहे. मेळाव्याला हजर राहणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. तरीही कोल्हापूरातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने मेळाव्याला उपस्थिती राहण्याचा निर्धार केला आहे.

आज सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ताराराणी चौकातील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला वंदन करुन शिवसेनेने भगवी रॅलीद्वारे बेळगावकडे कूच केले. शिवसेनेचे उप नेते संजय पवार, संपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, शहर प्रमुख सुनील मोदी, संभाजी भोकरे यांच्यासह शिवसैनिक भगवे ध्वज, बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा घेऊन मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.

महाराष्ट्र कर्नाटक हद्दीवरील कोगनोळी टोल नाक्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. शिवसेनेची भगवी रॅली कोगनोळी नाक्यावर अडवण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा जयघोष करत मराठी भाषिकांवरील होत असलेल्या अन्यायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. कर्नाटक सरकारच्या हुकुमशाही वृत्तीचा धिक्कार करण्यात आला. यावेळी बोलताना शिवसेनेचे संजय पवार म्हणाले, बेळगावसह बिदर, भालकी, कारवार हा महाराष्ट्राचा भाग आहे. तिथे मराठी माणसं राहतात. मराठी संस्कृती, भाषा तिथे जपली जाते. पण कर्नाटक सरकार हुकुमशाहीचा वरवंटा मराठी जनतेवर फिरवत आहे. लोकशाही मार्गाने मराठी जनतेच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली असली तरी आम्ही मेळावा यशस्वी करु असा निर्धार केला. त्यानंतर शिवसैनिकांनी कोगनोळी नाक्यावरुन कर्नाटक हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिस आणि शिवसैनिकांत जोरदार धक्काबुक्की झाली. पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड करत ताब्यात घेतले. (Maharashtra Ekikaran Yuva Samiti)

दरम्यान बेळगाव शहरात कर्नाटक पोलिसांचा चौकाचौकात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्यात आली आहे. एकीकरण समितीचे नेते मालोजी अष्टेकर सकाळी मॉनिंग वॉकला गेले असता साध्या वेषातील पोलिस त्यांचा पाठलाग करुन पाळत ठेवत आहेत. अष्टेकर यांच्यासह बेळगावातील मराठी नेत्यावर पाळत ठेवली जात आहे. अनेकांना नोटिसा पाठवल्या असून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00