हिंगोली : प्रतिनिधी : पोलीस कर्मचाऱ्याने सासुरवाडीत जाऊन केलेल्या हल्ल्यात पत्नी ठार झाली. या घटनेत पोलिसाचा मुलगा, सासू, मेव्हणा गंभीर जखमी झाले आहेत. हिंगोली शहरातील प्रगतीनगरमध्ये घटना घडली आहे. गोळीबार करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. (police firing)
वसमत शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विलास मुकाडे व त्याच् पत्नी मयुरी याच्यात गेले काही दिवसापासून वाद झाला होता. सततच्या भांडणामुळे मयुरी हिंगोली शहरातील प्रगतीनगर येथे माहेरी राहण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान बुधवारी सायंकाळी विलास आणि मुयुरी यांच्यात मोबाईलवर बोलताना मोठा वाद झाला. त्यानंतर विलास मुकाडे वसमत येथून ड्युटी संपवून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हिंगोली शहरातील प्रगतीनगरील सासुरवाडीत आला. त्यावेळी विलास आणि मयुरी यांच्यात वाद झाला. विलास मुकाडे स्वत:जवळ असलेले पिस्तूल काढले आणि पत्नी मयुरीवर गोळी झाली. त्यानंतर सासू वंदना धनवे, मेव्हणा योगेश धनवे आणि अडीच वर्षाच्या मुलावर गोळीबार करुन तो पसार झाला.(police firing)
गोळीबाराचा आवाज ऐकूण शेजारी घटनास्थळी आले. घटनेची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस अधीक्षक श्रीकांत कोकाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे घटनास्थळी आले.
या घटनेते मयुरी मुकाडे यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी सासू, मेव्हणा आणि मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारास दाखल केले आहे. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारास नांदेड येथे हलवण्यात आले. पोलिसांनी संशयित विलास मुकाडे याला अटक केली.