Home » Blog » पोलिसांतील घरभेद्यांमुळे साताऱ्याला सावकारीचा विळखा

पोलिसांतील घरभेद्यांमुळे साताऱ्याला सावकारीचा विळखा

कारवाईबाबत कौतुक; पण गुन्हे शाखेला जमले ते सिटी पोलिसांना का नाही?

by प्रतिनिधी
0 comments
Satara

सातारा : प्रशांत जाधव :  सातारा शहर पोलीसांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवल्याने बेफाम झालेल्या सातारा शहरातील खासगी सावकार विजय चौधरीला कायद्याचा हिसका दाखवत आर्थिक गुन्हे शाखेने खासगी सावकारांकडून एक कोटी १६ लाख ८० हजारांचे सोने जप्त केले. मुद्देमाल जप्तीची अत्तापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. सातारा पोलिसांची ही कारवाई अभिमानास्पद असली तरी सातारा शहर पोलिसांच्या क्षमता आणि प्रामाणिकपणावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारीही ठरली आहे. त्यामुळे कारवाईचे कौतुक केले जात आहे. त्याचवेळी एक वर्षाहून अधिक काळ फिर्यादीचा अर्ज धूळखात ठेवून अप्रत्यक्ष खासगी सावकाराला पाठबळ देणाऱ्या वर्दीतील घरभेद्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. संशयितांना मदत होईल अशी भूमिका घेऊन फिर्यादीला तकलादू न्याय देण्याचे नाटक करणाऱ्या सातारा शहर पोलिसांवर कारवाईबाबत मिस्टर क्लिन असलेले पोलीस अधीक्षक समीर शेख नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Satara)

सातारा जिल्ह्यात खासगी सावकारांचे जाळे अनेक वर्षांपासून विस्तारले आहे. पोलीस, सहकार विभागाचे निबंधक यांचे रेकॉर्ड वगळता जिल्ह्यातील असा कोणताच भाग नाही तिथे खासगी सावकारीचा धंदा केला जात नाही. अनेक ठिकाणी तर ज्यांच्यावर कारवाईची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर बसून खासगी सावकारांनी अनेकांच्या खिशात हात घातल्याची उदाहरणे जिल्ह्याने पाहिली आहेत. जमिनी हडप करणाऱ्या खासगी सावकरांनी थेट लहान मुलांना सावकारीच्या पैशांसाठी ठेवून घेतल्याची खळबळजनक घटना २०२२ सालात जिल्ह्यात घडली. त्यावेळी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सावकारांचे कंबरडे मोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. अवघ्या एका आठवड्यात १५ सावकारांना कायद्याच्या कचाट्यात त्यांनी आणले होते. त्यानंतर ही मोहीम अपवाद वगळता पूर्णपणे थंडावल्याने सावकारांचे काम जोमात सुरू होते.

सोनारांनीही पाय रोवले

सावकारीतून मिळणारा पैसा पाहून या धंद्यात आता काही सोनारांनीही पाय रोवायला सुरूवात केली होती. अशातच विजय चौधरी नामक एका सोनाराने सावज गाठत त्यांना सावकारीच्या पाशात ओढण्याचे काम केले. अर्थात त्याला राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा आहे. सातारा शहर पोलिसांचाही त्याला पाठींबा असल्याचे आता समोर आले आहे. पोलिसांच्या पाठबळावर व्यापारी, वकील असलेल्या लोकांना फसवण्याचा धंदा ही सावकारकीची बाजू विद्यमान पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या मदतीने पुढे आणली आहे. देताना दोन द्यायचे आणि परत घेताना दहा मोजायचे ही सावकारांची काळी बाजू जिल्ह्याला खासकरून पोलीस यंत्रणा, सहकार विभाग यांना मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे. (Satara)

सुंभ जळाला तरी…

काळ होता २०१९ सालचा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील खासगी सावकारांनी धुमाकूळ घातला होता. त्याला तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अजयकुमार बन्सल यांनी चांगलाच आवर घातला होता. त्यांच्या कार्यकाळात काही मोठे मासे गळाला लागले होते. त्यानंतर सावकारीचा पाश कमी होईल अशी अपेक्षा असताना जिल्ह्यात ‘व्हाइट कॉलर’ खासगी सावकारी फोफावल्याचे नुकतेच आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे समोर आले. संदीप पाटील, अजयकुमार बन्सल यांच्या काळात सर्वाधिक कारवाया करूनही ‘सुंभ जळाला तरी पीळ कायम’ अशी स्थिती राहिल्याने जिल्ह्यातील खासगी सावकारी पूर्णपणे संपवणे पोलीस दलाला शक्य झाले नाही. (Satara)

दुष्काळी पट्टा जाळ्यात

बागायती शेती मोठ्या प्रमाणात असलेल्या कराड तालुक्यात आणि दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या माण, खटाव, फलटण या तालुक्यांमधील खासगी सावकारांनी शेतकर्‍यांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. वाई, साताऱ्यासह ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, कंपन्यांचे मालकही सावकारांच्या जाळ्यात फसले आहेत. अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी, कर्जाच्या रकमेच्या बदल्यात जमीन, घर, गाड्या तारण घेतल्या जातात. दरमहा दहा ते २५ टक्क्यांपर्यंत व्याज आकारणी केली जाते. त्यामुळे कर्जाच्या रकमेच्या कैकपटींनी पैसे खासगी सावकाराला मोजले तरी मूळ कर्ज काही केल्या फिटत नाही. मग, तारण घेतलेली वस्तू सावकार गिळंकृत करतात. अशा अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.

सावकारांच्या विकृतीचा कळस

सावकारांचा विकृत मानसिकतेचा कळस म्हणजे साताऱ्यात काही सावकारांच्या नजरा कर्जदाराच्या घरातील महिलांवर गेल्या होत्या. हे कमी की काय म्हणून खासगी सावकारांनी थेट लहान मुलांना सावकारीच्या पैशांसाठी ठेवून घेतल्याची खळबळजनक घटना २०२२ सालात जिल्ह्यात घडली. सावकारांच्या  छळाने उच्चांक गाठल्याने अस्वस्थ झालेले तत्कालीन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सावकारांचे कंबरडे मोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. अवघ्या एका आठवड्यात १५ सावकारांना कायद्याच्या कचाट्यात त्यांनी आणले होते. मात्र, नंतरच्या काळात राजकारण्यांचा वाढलेला हस्तक्षेप आणि त्यांच्यापुढे पोलिसांनी घेतलेली बोटचेपी भूमिका यामुळे खासगी सावकारीचे पीक यंत्रणेच्या पाठबळावर जोमात वाढले. पोलिसांना राजकीय दवावाला सामोरे जावे असले तरी किमान सावकारीच्या गुन्ह्यात तो झुगारून काम करणे अपेक्षित आहे. खासगी सावकारांची वाढती मुजोरी आणि त्रस्त जनतेचा टाहो लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी खासगी सावकारीचे कंबरडे मोडण्याचा विडा उचलत सामान्य जनतेला न्याय देण्याची आता गरज आहे. (Satara)

लेकराची आर्त हाक आणि एसपींच्या डोळ्यात पाणी

खासगी सावकार चौधरी याच्याकडून घेतलेले पैसे परत फेडल्यानंतर त्याच्याकडील कोट्यवधीचे सोने तो परत करत नसल्याने पेशाने वकील असलेल्या एका महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात अर्ज दिला होता. मात्र, सावकाराच्या ‘मिठाला जागलेल्या’ शहर पोलिसांनी केवळ वेळ मारून नेली. दरम्यान अर्जदार महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्या महिलेच्या मुलाने एसपींची भेट घेतली. यावेळी साहेब, जिवंत असताना नाही पण मेल्यावर तरी माझ्या आईला न्याय द्या, अशी साद त्याने एसपींना घातली. ही विनंती ऐकून संवेदनशील समीर शेख यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना देत सक्त कारवाईचा दम भरल्याने चौधरी आणि सातारा शहर पोलिसांचे बिंग फुटले.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00