धुळे/नाशिक : महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे. चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांचे रूप मानतो. जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे; मात्र महाविकास आघाडीतील नेते जनतेला लुटण्यासाठी राजकारणात आले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. काँग्रेस धर्म, जात, तसेच विविध घटकांच्या नावाखाली समाजात विभागणी घडवण्याचे पाप करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. या वेळी त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीला लक्ष्य केले. भाषणात त्यांनी ४० हून अधिक वेळा काँग्रेसचे नाव घेतले. मोदी म्हणाले, “महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला. राज्यातील जनतेने त्यांचे अडीच वर्षांचे शासन बघितले आहे. आधी त्यांनी सरकार लुटले, नंतर जनतेला लुटले. त्यांनी मेट्रो प्रकल्प बंद केले, वाढवण बंदराचे काम थांबवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. समृद्धी महामार्गाला विरोध केला. अशा नेत्यांपासून आता महाराष्ट्रातील जनतेने सावध होण्याची गरज आहे.” महायुती सरकारच्या केंद्रस्थानी महिला आहेत. कारण महिलांचा विकास झाला, तरच समाजाचा विकास होतो. त्यामुळे आम्ही महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही लाडकी बहीणसारख्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेची चर्चा केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात सुरू आहे; मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडी नेते ही योजना बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत.
त्यासाठी त्यांचे काही लोक न्यायालयातही जाऊन आले. त्यांना महिलांचा झालेला विकास पचनी पडत नाही, अशी टीका त्यांनी केली. गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारने विकासकामांचा नवा उच्चांक गाठला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला गौरव पुन्हा मिळाला आहे. भाजप महायुती आहे, तर गती आहे आणि तरच महाराष्ट्राची प्रगती आहे. आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्चा दिला. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आम्ही पूर्ण केली. दुसरीकडे काँग्रेसने राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. हाच त्यांचा खरा चेहरा आहे, असे सांगून ते म्हणाले, की काँग्रेस जाती-जातीत भेद निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वंचितांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत होते, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू त्याला विरोध करत होते. अनेक अडचणींचा सामना करून बाबासाहेबांनी दलित, आदिवासींना आरक्षण दिले. त्यानंतर इंदिरा गांधींनीही एससी, एसटींना प्रतिनिधित्व मिळू नये यासाठी प्रयत्न केले. एससी, एसटी, ओबीसी हा समाज मजबूत झाला तर काँग्रेसच्या राजकारणाचे दुकान बंद होईल ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते त्यांच्या आरक्षणाला विरोध करतात.