नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अलीकडेच निवृत्ती जाहीर केलेला भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. अश्विनच्या निवृत्तीची घोषणाही त्याच्या ‘कॅरम बॉल’इतकीच अनपेक्षित असल्याचे मोदींनी म्हटले आहे. (Modi Letter)
सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील तिसऱ्या कसोटीनंतर अश्विनने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर, मोदी यांनी पत्र लिहून अश्विनला शुभेच्छा दिल्या. “तुझ्या निवृत्तीच्या घोषोने भारतातील आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला. तुझ्याकडून आणखी बऱ्याच ऑफ-ब्रेक चेंडूंची अपेक्षा असताना तू निवृत्तीचा कॅरम बॉल टाकून सर्वांना त्रिफळाचीत केलेस. मात्र, तुझ्यासाठीही, विशेषत: तू भारतातर्फे साकारलेल्या इतक्या उल्लेखनीय कारकिर्दीनंतर हा निर्णय कठीण असेल, याची सर्वांना जाणीव आहे. गुणवत्ता, कष्ट आणि संघभावनेने भरलेल्या तुझ्या कारकिर्दीबद्दल मी तुझे अभिनंदन करतो,” असे मोदी यांनी पत्रात म्हटले आहे.
“तू आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा करत असताना तुझ्या ९९ क्रमांकाच्या जर्सीची मैदानावर तीव्रतेने उणीव भासेल. तू गोलंदाजी करत असताना क्रिकेटप्रेमींना जाणवणाऱ्या अपेक्षेच्या भावनेला ते यापुढे मुकतील. फलंदाजांना चकवण्याची आणि परिस्थितीनुरूप गोलंदाजीमध्ये नाविन्यपूर्ण बदल करण्याची विक्षण क्षमता तुझ्यामध्ये होती. तू सर्व क्रिकेटप्रकारांमध्ये मिळून घेतलेल्या ७६५ विकेट्स विशेष होत्या. तुझा सर्वाधिकवेळा मालिकावीराचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रम हा कसोटी क्रिकेटमध्ये संघाच्या यशावरचा तुझा परिणाम दर्शवतो,” असेही मोदी यांनी पत्रात नमूद केले आहे. (Modi Letter)
अश्विनच्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अनेक ठळक गोष्टींचा उल्लेखही मोदी यांनी पत्रामध्ये केला आहे. यांमध्ये अश्विनने कसोटी पदार्पणात घेतलेले ५ बळी, तसेच २०११ च्या वन-डे वर्ल्ड कप विजेत्या संघातील अश्विनचा सहभाग या गोष्टींचाही समावेश आहे. एकाच कसोटीत शतक आणि पाच बळी घेण्याच्या अश्विनच्या अष्टपैलू कामगिरीबद्दलही मोदींनी गौरवोद्गार काढले आहेत. त्याचप्रमाणे, २०२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये सिडनी कसोटीत पराभव टाळण्यासाठी केलेली फलंदाजी, २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धचा सामन्यात मोक्याच्या क्षणी सोडलेला वाइड-बॉल आदी क्षणांचीही प्रशंसा मोदींनी केली आहे. (Modi Letter)
हेही वाचा :
- भारताच्या मुलींना विजेतेपद
- रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत
- चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!