नवी दिल्ली : म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच या दोन्ही देशांना सर्वतोपरी मदत देण्याची तयारी दर्शवली. (PM Modi offers support)
भूकंपामुळे बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेल्या एक उंच इमारत कोसळली. त्यात तिघे कामगार ठार झाले. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
पंतप्रधान मोदींनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मी चिंतित आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. या संदर्भात, आमच्या अधिकाऱ्यांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंडच्या सरकारांशी संपर्कात राहण्यास सांगितले. (PM Modi offers support)
म्यानमारमध्ये शुक्रवारी शक्तीशाली भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल इतकी नोंदवली. भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमार होता. त्यानंतर ६.४ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आणि त्यामुळे संपूर्ण प्रदेशातील इमारती हादरल्या.
बँकॉकमध्ये, बांधकामाधीन असलेली ३० मजली इमारत कोसळली. म्यानमारच्या मंडाले येथील अनेक इमारतींचेही मोठे नुकसान झाले. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी आपत्कालीन प्रतिसाद प्रयत्न सुरू केले आहेत. (PM Modi offers support)
भूकंप आणि भूकंपाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर थायलंडचे पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत नुकसानीचा आढावा घेण्याबरोबरच तातडीने मदत आणि बचावकार्य गतिमान करण्याबाबत चर्चा करण्यात येईल.
बँकॉकमध्ये बिमस्टेक शिखर परिषद
भूकंपग्रस्त बँकॉकमध्ये पुढील आठवड्यात बिमस्टेक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक नेते या परिषदेला उपस्थित राहणार आहे.
बिमस्टेक (बेट ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन) मध्ये भारत, थायलंड, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ आणि भूतान यांचा समावेश आहे. येत्या बँकॉक शिखर परिषदेत, नेते प्रादेशिक सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि संयुक्त उपक्रमांना गती देण्यासाठी धोरणांवर चर्चा करणार आहेत.