कोल्हापूर : प्रतिनिधी : मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील खासगी ट्रॅव्हल्स एजंटांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षकास बेदम मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मारहाण करणाऱ्या दोघांना अटक केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्स परिसरात ही घटना घडली. (PI beaten)
शाहूपुरी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. शाहूपुरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक विशाल दशरथ मुळे हे हायकोर्टात आपले म्हणणे सादर करुन स्वारगेट पुणे ते कोल्हापूर या बसने मध्यवर्ती बसस्थानकात आले. त्यानंतर ते चालत शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे जात होते. महालक्ष्मी चेंबर्सजवळ ट्रॅव्हल एजंट अकिब पठाण त्यांचा हात पकडून पुण्याची बस लागली आहे, असे सांगत त्यांना जबरदस्तीने घेऊन जाऊ लागला. त्यावेळी मुळे यांनी मी पोलीस असून मला पुण्याला जायचे नाही, असे सांगितले. तरीही अकिब पठाण मुळे यांना बसकडे खेचू लागला. मुळे यांनी पुण्याला जाणार नाही असे पुन्हा एकदा सांगितले. तरीही तो बस तिकीट तयार करणारा त्याचा भाऊ दिलावर मुजावरकडे मुळे यांना जबरदस्ती करुन घेऊन जाऊ लागला. (PI beaten)
मुळे यांनी हात झटकल्यावर अकिब जावेदने दिलावर आणि जावेद मुजावरला बोलावले. त्यानंतर अकिबने ‘पोलीस असलास तरी बघून घेतो,’ अशी धमकी दिली. मुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन पोलीस ठाण्याकडे जाऊ लागले. त्यावेळी अकिब पठाणने पाठीमागून मुळे यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. जावेद मुजावरने मुळेंच्या डोळ्यावर ठोसा लगावला. (PI beaten)
घटनेची माहिती विशाल मुळे यांनी मोबाईलवरुन पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना दिली. त्यावेळी अकिब पठाण, दिलदार मुजावर आणि जावेद मुजावर यांनी गर्दीचा फायदा घेऊन मुळे यांना बेदम मारहाण केली. त्यानतंर घटनास्थळी पोलीस आल्यावर त्यांची सुटका करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांनी फिर्याद दिल्यावर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अकिब पठाण आणि दिलदार मुजावर यांना अटक केली.
हेही वाचा
पानसरे हत्येतील सहा आरोपींना जामीन