मुंबई : विशेष प्रतिनिधी : गेल्या दोन महिन्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आणि रोज नवनवीन गंभीर आरोपांना सामोरे जावे लागत असलेल्या वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांना त्यांच्या पक्षाचे नेते सर्वोच्च नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तूर्तास अभय दिले आहे. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नातही तोपर्यंत मुंडेंचा राजीनामा घेण्याची गरज नाही, अशी भूमिका त्यांनी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेतली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Pawar-munde)
पवारांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्या समवेत अजित पवारांनी दीर्घकाळ चर्चा केली. जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीनंतर कदाचित मुंडेंना राजीनामा द्यावयास सांगितला जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र बैठक संपल्यानंतर सर्व नेते पत्रकारांशी काहीही न बोलता निघून गेले. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचे या बैठकीत पवारांनी स्पष्ट केल्याचे समजते. (Pawar-munde)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुंडे हे सातत्याने सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधकांच्या ‘टार्गेट’वर आहेत. त्यानंतर मागील सरकारमध्ये कृषीमंत्री असताना खात्यातील भ्रष्टाचारची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली. त्याचबरोबर करुणा मुंडे-शर्मा यांनी कौटुंबिक न्यायालयात त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्यात करूणा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये कोटी देण्याचे आदेश वांद्रे न्यायालयाने दिले. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यांच्यावरील वाढत्या आरोपामुळे राष्ट्रवादीबरोबरच महायुती सरकारची प्रतिमाही मलिन होत असल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा, असा दबाव भाजपा व शिंदे गटाबरोबरच राष्ट्रवादीतून वाढत चालला आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी दीर्घकाळ चर्चा केली. यावेळी जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मुंडे यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे या विषयावर चर्चा न करता जनतेपर्यंत माहिती पोहोचवावी असेही त्यांनी सांगितले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Pawar-munde)
कोर्टातूनच तडाखा दिला पाहिजे : अंजली दमानिया
राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत असल्याबाबत या विषयावर आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘त्यांचा सिंचन घोटाळा सिद्ध झाला नाही. तो बंद करण्यात आला. प्रफुल्ल पटेल यांचा घोटाळाही बंद करण्यात आला. जोपर्यंत आपण भाजपसोबत आहोत, तो पर्यंत सर्व यंत्रणा आपल्यासाठी आहेत. कितीही स्ट्राँग पुरावे असले तरी काही सिद्ध होणार नाही. हे त्यांना माहीत आहे. म्हणून यांना कोर्टातूनच तडाखा दिला पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या.
हेही वाचा :
बेकायदेशीर स्थलांतरित स्वर्गातून जमिनीवर
मोदींनी ‘उद्योगपती मित्रां’कडून मणिपुरात गुंतवणूक आणावी
मित्राचा खिसा भरणे हीच मोदींसाठी ‘राष्ट्रनिर्मिती’!