Home » Blog » Pawar criticises Shah : ‘त्यांना’ कधी तडीपार केले नव्हते!

Pawar criticises Shah : ‘त्यांना’ कधी तडीपार केले नव्हते!

शरद पवारांचे अमित शहांना सणसणीत प्रत्युत्तर

by प्रतिनिधी
0 comments
Pawar criticises Shah

मुंबई : प्रतिनिधी : देशाच्या गृहमंत्रिपदी सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण होते. या पदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या देशभक्तांनी अतिशय मोलाचे काम केले. सध्याच्या गृहमंत्र्यांची तुलना करताना ‘कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शामभटाची तट्टाणी?,’ अशी परिस्थिती आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्युत्तर दिले. (Pawar criticises Shah)

ते म्हणाले, ‘एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य होते. गुजरातने उत्तम प्रशासकांची ओळख देशाला करून दिली. जी नावे मी तुम्हाला सांगितली त्यापैकी सर्वांचे एक वैशिष्ट्य होते की त्यापैकी कोणालाही कधी त्यांच्या राज्यातून तडीपार केले गेले नव्हते. तो प्रसंग कधी या राज्यकर्त्यांवर आला नाही. ’(Pawar criticises Shah)

गुजरातमधून तडीपार असताना यांनी मुंबईत आश्रयासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे विनंती केली होती. अशा व्यक्तीने जी विधाने केली त्याची नोंद पक्षात किती घेतली हे न सांगितलेले बरे, असा टोलाही पवार यांनी लगावला.

शिर्डी येथे झालेल्या भाजपाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात रविवारी अमित शहा यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली होती. पवारांचे गद्दारीचे राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेने वीस फूट खाली गाडले, असा हल्ला चढवला होता. शरद पवार यांनी मंगळवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषद घेऊन शहा यांचा नामोल्लेख न करता प्रत्युत्तर दिले.(Pawar criticises Shah)

‘सर्व राज्यांना एकत्रित करण्याचे काम सरदार पटेल यांनी केले. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशात पंडित गोविंद वल्लभ पंत यांना देशाचे गृहमंत्री म्हणून सर्वांनी अनुभवले. यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण देशाचे गृहमंत्री होते. या पदाची प्रतिष्ठा या देशभक्तांनी ठेवली. शेजारचे गुजरात व महाराष्ट्र हे एक राज्य होते. बाबूभाई म्हणून गुजरातचे कर्तबगार प्रामाणिक आणि स्वच्छ मुख्यमंत्री होते. त्यानंतर माधवराव सोलंकी आणि चिमणभाई पटेल असे उत्तम प्रशासक होते. यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आले नव्हते, असे पवार म्हणाले.

१९७८ ला हे कुठे होते?

ते म्हणाले, ‘देशाच्या गृहमंत्र्यांनी भाषण करणे हा त्यांचा अधिकार आहे. पण थोडीफार माहिती घेऊन भाषणे केली तर लोकांच्या मनात शंकेची स्थिती निर्माण होत नाही. १९७८ सालापासून त्यांना माझी माहिती झाली. मी १९५८ सालापासून राजकारणात आहे. ७८ साली ही व्यक्ती राजकारणात कुठे होती मला माहीत नाही. पण ७८ साली मी मुख्यमंत्री होतो. त्यात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, हशू अडवाणी, प्रमिलाताई आदी कर्तृत्वान लोक लोक माझ्या मंत्रिमंडळात होते. पुलोद सरकारची माहिती घेतली तर यातील सगळ्यांनी राज्यासाठी चांगले योगदान दिले. म्हणून मी मुख्यमंत्री असताना उत्तमराव पाटील गृहमंत्री, उपमुख्यमंत्री होते आणि आडवाणी नगरविकास खात्याचे होते. जनसंघाची पार्श्वभूमी असलेल्यांनी माझ्यासोबत काम केले. वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन होते. ही सर्व नेतृत्वाची फळी भाजपने ७८नंतर दिली. नंतरच्या काळात देशात वेगवेगळे पक्ष सत्तेत होते. पण राजकीय पक्षातील नेत्यांत सुसंवाद होता.’(Pawar criticises Shah)

कुठे इंद्राचा ऐरावत…

वाजपेयी आणि आडवाणी कर्तृत्ववान लोक होते. ते अतिरेकी भूमिका घेऊन समाजकारण किंवा राजकारण केले नाही, असे सांगून ते म्हणाले, ‘उदाहरण सांगायचे म्हणजे भूजला भूकंप झाला. मुख्यमंत्र्यांची बैठक पंतप्रधान वाजपेयी यांनी बोलावली. त्यात अतिवृष्टी आणि महापूर, भूकंपाचे धोरण ठरवण्यासाठीची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी विरोधी पक्षात असताना मंत्र्याचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुपूर्द केले. ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्याकडे आहे. पण हल्लीच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर आणि उद्धव ठाकरेंवर जे भाष्य केले त्यावर न बोललेले बरे. मराठीत एक म्हण आहे ‘कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी?’. (Pawar criticises Shah)

उद्धव ठाकरेंबाबत जी भूमिका घेतली ती लोकांनी पाहिली. ते सुद्धा त्यावर कधी तरी त्यांचे मत सांगतील. मला हे माहीत आहे, जेव्हा हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, अन् त्याला मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली होती. अशा व्यक्तीने जी विधाने केली त्याची नोंद त्यांच्या पक्षात किती घेतली हे न सांगितलेले बरे, असे त्यांनी सांगितले.

दिल्लीत ‘आप’ सोबत

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे त्याबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले, ‘येत्या आठ-दहा दिवसांमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व आमच्या पक्षाचे नेते एकत्र बसून आगामी निवडणुकाबाबतची भूमिका ठरवतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्ही केजरीवाल यांच्या ‘आप’ पक्षाला सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहोत. त्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात घेऊन आमची भूमिका पटवून देऊ.’

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00