Home » Blog » Patan Politics: पाटणकरांच्या भाजप प्रवेशाने शंभूराज देसाई यांच्यापुढे आव्हान

Patan Politics: पाटणकरांच्या भाजप प्रवेशाने शंभूराज देसाई यांच्यापुढे आव्हान

by प्रतिनिधी
0 comments
Patan Politics

सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद्चंद्र पवार) पक्षाचे सत्यजित पाटणकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे तेथे नवाच संघर्ष सुरू झाला आहे. महायुतीतल्या दोन पक्षातच त्यामुळे संघर्षाला धार येणार आहे. महायुतीच्या एकाच म्यानात पाटणच्या या दोन तलवारी कशा राहतात आणि त्यांचा पुढचा संघर्ष कसा राहतो, याकडे पाटण-कराडचेच नव्हे, तर संपूर्ण सातारा जिल्ह्याचे आणि पश्चिम महाराष्ट्राचेही लक्ष लागून राहणार आहे. (Patan Politics)

  • डॉ. विजय चोरमारे

पाटणमध्ये पारंपरिकरित्या देसाई आणि पाटणकर यांच्यात लढत होत आली. २०१९च्या निवडणुकीत तिथे एकत्रित शिवसेनेचे उमेदवार शंभूराज देसाई निवडून आले होते. त्यामुळे विधानसभेच्या २०२४च्या निवडणुकीत ही जागा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली. खरेतर उमेदवारीच्या निकषावर ती सत्यजित पाटणकर यांना मिळायला हवी होती, परंतु राज्य पातळीवरील धोरण आडवे आले. पाटण विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार हर्षद कदम, अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांच्यात लढत झाली होती. हर्षद कदम ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असले तरी प्रामुख्यानं लढत शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर अशी झाली. या लढतीत शंभूराज देसाई यांनी विजय मिळवला. शंभूराज देसाई यांना १२५७५९ मतं मिळाली. तर, सत्यजितसिंह पाटणकर यांना ९०९३५ मतं मिळाली. हर्षद कदम यांना ९६२६ मतं मिळाली. तर, शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांचा ३४८२४ मतांनी पराभव केला. (Patan Politics)

पाटण विधानसभा मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमसिंह पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर २०१४ ची निवडणूक सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली. यावेळी शंभूराज देसाई यांनी विक्रमसिंह पाटणकर यांचा पराभव केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सत्यजितसिंह पाटणकर यांनी शंभूराज देसाईंविरुद्ध निवडणूक लढवली. शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना पराभूत करत विजय मिळवला होता. २०१४ मध्ये देखील शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांचा पराभव केला. सातारा जिल्ह्यातील पाटणमध्ये गेली अनेक दशके देसाई आणि पाटणकर घराण्यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र २०१४ पासून शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विजय मिळवला. त्यामुळे पाटणकरांचा प्रभाव कमी झाला. (Patan Politics)

सत्यजित पाटणकर यांचे वडील विक्रमसिंह पाटणकर हे पन्नास वर्षांपासून अधिक काळ शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पुत्राने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे तो शरद पवार यांनाही धक्का मानला जातो. त्याचबरोबर आपल्या विरोधकाला सत्यजीत पाटणकर यांना आपल्या मित्रपक्षाने म्हणजे भाजपने प्रवेश दिल्यामुळे शंभूराज देसाई नाराज आहेत. ते स्वाभाविकही आहे. शंभूराज देसाई यांचं म्हणणं ऐकलं तर त्यांच्या नाराजीची कल्पना येऊ शकते. त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही आमचं काम करत आहोत. गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. या दरम्यान महायुती म्हणून सगळीकडे काम केलं आहे. मंत्री म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत. आमच्या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातील नेत्यांचा प्रवेश झाला आहे. मी याच्याबाबत जे काय बोलायचं आहे ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणार आहे. भेटीची वेळ मागितलेली आहे.

भाजप आणि शिवसेना हे दोन स्वतंत्र पक्ष आहेत त्यामुळे हे असं राजकारण होत राहणार आहे. २०२९ साली भाजपला स्वबळावर सत्ता आणायची आहे. म्हणजे स्वबळावर निवडणूक लढवायची आहे. तसं असेल तर त्याची जुळवाजुळव त्यांना आतापासून करावी लागेल. त्याचाच भाग म्हणून सत्यजित पाटणकरांना प्रवेश दिला आहे. (Patan Politics)
सत्यजित पाटणकर यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी शरद पवार यांना धक्का दिला आहे. त्यांनी अर्ध्या शतकाची शरद पवारांची साथ का सोडली असावी… खरेतर शरद पवार यांच्या संमतीनेच त्यांनी हा मार्ग निवडल्याचे सांगितले जाते. कारण शंभूराज देसाई हे मंत्री असल्यामुळे आणि ताकदवान मंत्री असल्यामुळे मतदारसंघात त्यांचा विरोधकांना त्रास होत असणार. सरकारी यंत्रणा पूर्णपणे विरोधात असताना कुणाही राजकीय नेत्याला काम करणे, कार्यकर्ते टिकवणे अवघड बनते. सत्यजित पाटणकर यांची अवस्थाही तशीच झाली. कार्यकर्ते फुटू लागले. त्यामुळे शंभूराज देसाई यांच्या दांडगाईला आव्हान देण्यासाठी त्यांनी त्यांच्याहून दांडगा बॉस म्हणजे देवेंद्र फडणवीस यांन पकडले आहे. आता स्वाभाविकपणे पोलिस ठाण्यापासून सरकारी कार्यालयांपर्यंत सत्यजित पाटणकर यांची कामे मार्गी लागतील. जिथे शंभूराज देसाई आडवे येतील, तिथे देवेंद्र फडणवीसांच्याकडून त्यांचा अडथळा दूर केला जाईल.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00