कोल्हापूर : प्रतिनिधी : स्वयंसिद्धा संस्थेच्या संस्थापिका कांचन परुळेकर (वय ७४) यांचे आज बुधवारी (दि. २६) कर्करोगाने निधन झाले. स्वयंसिद्धा, स्वयंप्रेरिका, डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशन या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात महिला उद्योजिकांचे जाळे विणले होते. त्यांच्या पश्च्यात दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. (Parulekar)
चार वर्षापासून त्या गर्भाशयाच्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. आठवड्यापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रविवारपासून त्यांची प्रकृती खालावली. आज बुधवारी दुपारी तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी (दि.२७) सकाळी नऊ वाजता साईक्स एक्स्टेंशन येथील स्वयंसिद्धा संस्थेपासून अंतयात्रा काढण्यात येणार असून पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Parulekar)
कांचन परुळेकर यांनी १९९२ पासून महिला सबलीकरण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. शहर व ग्रामीण भागातील अल्पशिक्षित महिलांमधील कौशल्ये ओळखून त्यांच्यासाठी आर्थिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात श्रीमती परुळेकर आयुष्य वेचले. महिलांवरील अन्याय निवारण, आरोग्याबाबत जागृती यातून त्यांनी महिलांना प्रोत्साहित केले. (Parulekar)
रोजगारासाठी परुळेकर यांचे वडील कोकणातून कोल्हापुरात आले. भुदरगड तालुक्यातील नितवडे या गावात त्यांचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षी धरणग्रस्तांसमोर प्रभावीपणे भाषण करताना त्यांना ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांनी पाहिले. त्यानंतर डॉ. पाटील यांनी कांचन परुळेकर यांचे शैक्षणिक पालकत्व घेतले. पुढे त्या डॉ. पाटील यांच्या मानस कन्या बनल्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली. दरम्यान डॉ. व्ही. टी. पाटील यांनी उभारलेल्या सामाजिक कार्य पुढे नेण्यातही कांचन काम करत होत्या. स्वयंसिद्धा या संस्थेच्या माध्यमातून महिला सबलीकरणाच्या कामाचा व्याप वाढवण्यासाठी परुळेकर यांनी बँकेची नोकरी सोडली आणि पूर्णवेळ महिला सक्षमीकरणाच्या कार्यात झोकून दिले. (Parulekar)
श्रीमती परुळेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शेळीपालन, सेंद्रीय शेती, स्थानिक पीकपूरक खाद्यपदार्थ, हस्तकला यातून महिलांचे संघटन केले. जिल्ह्यासह राज्यातील बचतगटांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी महिलांचे ग्रुप तयार केले. महिलांना बोलते करण्यासाठी वाणीमुक्ती, मार्गदीपा हे प्रकल्प यशस्वी केले. या कार्यासाठी त्यांना नातू पुरस्कार, कुसूम पुरस्कार, मंगल पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले. शिवाजी विदयापीठाच्या त्या सामाजिक सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. (Parulekar)