– अमोल उदगीरकर
अनुष्का शर्माने निर्मिती केलेल्या ‘एन एच 10’ सिनेमात एक फार मार्मिक संवाद होता. सिनेमातलं एक पात्र शहरात राहणाऱ्या नायिकेला टेचात सांगत – ये गुडगाव मे, जहाँ आखरी मॉल खतम होता है ना, वहा आपकी डेमोक्रसी और कॉन्स्टिट्यूशन खतम हो जाते है. ‘एन एच 10’ मध्ये आपल्या उबदार मध्यमवर्गीय कोषात गुरफटलेल्या शहरांपासून हाकेच्या अंतरावर कायदा-सुव्यवस्थेच्या झालेल्या चिंधड्या दाखवणारी निर्माती अनुष्का शर्मा ‘पाताल लोक’ मध्ये अजून दोन पावलं पुढे जाते. ‘पाताल लोक’ मध्ये दिसतं आपल्या गगनचुंबी चकचकीत शहरांमध्येच अस्तित्वात असलेलं एक असं जग, ज्याची नोंद घेणं शहरातला सुविद्य वर्ग टाळतो. कधी भीती पोटी, तर कधी घृणेपोटी. प्रत्येक शहरात असा एक भाग असतो, जिथं विशिष्ट वेळेनंतर, किंबहुना कधीच जायचं नाही असं आपण आपल्या परिवारातल्या लोकांना बजावून सांगत असतो. ‘तिथले लोक ‘चांगले’ नसतात’ असं आपलं ठाम मत असतं. त्याचबरोबर त्याच शहरात असा एक भाग असतो, जिथं आपण भविष्यकाळात राहायला जावं आणि ‘उच्चभ्रू’ बनावं असंही आपल्याला वाटतं असतं. (Paatal Lok)
एका शहरात तीन बेटं
एकाच शहरातला एक भाग आपल्याला दुःस्वप्नासारखा वाटत असतो, तर दुसरा भाग हव्या हव्याश्या मोरपंखी स्वप्नांसारखा. आर्थिक, भाषिक, वांशिक, जातीय, धार्मिक आणि इतर असंख्य पातळ्यांवर अंगावर येणार वैविध्य असणाऱ्या देशात एकाच शहरात अशी तीन वेगवेगळी बेटं असणं हे तसं साहजिकच. या वेगवेगळ्या बेटांचा एकमेकांशी कधी फारसा संबंध येत नाही आणि जेंव्हा क्वचित, तो येतो तेंव्हा मोठं घर्षण होणार हे नक्की. ‘पाताल लोक’ मधल्या हाथिराम चौधरीच्या मते हे आपण टाळत असलेलं, दुर्लक्षित करत असलेलं जग म्हणजे ‘पाताल लोक’ आहे. तो स्वतः जिथे राहतोय ती मध्यमवर्गीय वस्ती ‘धरती लोक’ आहे, तर या दोन्हींशी तुटून आपल्याच मस्तीमध्ये आणि हस्तीदंती मनोऱ्यात राहणारं उच्चभ्रू लोकांचं ‘स्वर्ग लोक’ आहे. पण आर्थिक सामाजिक स्तर वेगवेगळे असले तरी तिन्ही भागांमधली दुःख, वेदना, वासना, स्वार्थ हे सारखेच आहेत. ही तिन्ही जगं अनेक बाबतीत वेगळी असली तरी या तिघांना जोडणारे काही समान धागे पण आहेत हे अमेझॉन प्राईमवरची ‘पाताल लोक’ ही वेबसिरीज बघताना सतत जाणवत राहतं.
हाथिराम चौधरीकडं तपास
दिल्ली पोलिसांची टीम चारजणांना प्रसिद्ध पत्रकार संजीव मेहरा (नीरज काबी ) यांच्या हत्येचं षडयंत्र रचल्याच्या आरोपाखाली अटक करते. ह्या केसचा तपास करण्याची जबाबदारी जिथं अटक झाली आहे, त्या भागातल्या पोलीस चौकीतला इंस्पेक्टर हाथिराम चौधरी (जयदीप अहलावत ) याच्याकडे सोपवली आहे. हाथिराम चौधरी हा व्यवसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात अयशस्वी आहे असं त्याच्या आजूबाजूच्या लोकांना आणि दस्तुरखुद्द त्याला स्वतःला पण वाटतं असतं. ज्याच्याकडून फारशा अपेक्षा नाहीत, अशा अधिकाऱ्याकडे ही हाय प्रोफाईल केस सोपवण्यामागे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे पण काही आडाखे असतात. सरळमार्गी हाथिराम चौधरी जेंव्हा या केसची चौकशी सुरु करतो, तेव्हा वरकरणी ‘ओपन अँड शट’ असणारी ही केस वरवर दिसते, तशी नाही हे त्याला जाणवायला लागतं. यूपीएससीची तयारी करणाऱ्या इम्रान अन्सारी (ईश्वाक सिंग ) या तरुण सहकाऱ्याला सोबतीला घेऊन या केसची पाळंमुळं खोदताना चौधरीला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. हे अडथळे वैयक्तिक आयुष्यातल्या गुंतागुंतीच्या प्रश्नांकडून आणि मुख्य म्हणजे हाथिराम चौधरी ज्या व्यवस्थेचा भाग आहे त्या व्यवस्थेकडून आलेले आहेत. कुणालातरी असं वाटत असतं की हाथिराम चौधरीने या केसच्या मुळापाशी पोहोंचू नये. आणि या शक्ती खूप प्रभावशाली आणि ताकदवान आहेत. अतिशय सामान्य माणूस असणाऱ्या हाथिराम चौधरीपेक्षा शेकडो पटींनी ताकदवान शक्ती. हाथिराम चौधरी या सगळ्या अडथळ्यांना न जुमानता केसच्या मुळाशी पोहोचतो का? अडथळा आणणाऱ्या प्रभावशाली शक्ती कोण असतात आणि त्यांचा उद्देश काय असतो? हल्लेखोरांना संजीव मेहराची हत्या का करायची असते? या प्रश्नांची उत्तर ‘पाताल लोक’ च्या नऊ एपिसोड्समध्ये विखुरलेली आहेत . (Paatal Lok)
केवळ क्राईम थ्रीलर नव्हे
वरकरणी ही सिरीज ‘क्राईम थ्रीलर’ असली तरी या सीरिजला अनेक मुद्द्यांवर भाष्य करायचं आहे. आपल्या देशात धगधगत असणाऱ्या अनेक ‘फॉल्ट लाईन्स’ वर काहीतरी विधान करायचं आहे. देशात झालेलं राममंदिर आंदोलन, त्यातून देशात पडलेली उभी धार्मिक फूट, देशाच्या अनेक भागात वर्चस्व टिकवून असणारा जातीय भेद, लैंगिकतेतून होणारी घुसमट, स्वतःला अभिमानाने ‘लिबरल’ म्हणून घेणाऱ्या लोकांचे खरे चेहरे, न्यूजचॅनलच्या पडद्यामागे चालणारं राजकारण, खास पोलीस ठाण्यांची असणारी अशी वर्णव्यवस्था आणि अशा अनेक मुद्द्यांवर ही सीरिज बोलते.
प्रत्येक पात्राची वेगळी स्टोरी
प्रत्येक पात्राची बॅकस्टोरी आहे. त्याचबरोबर माणूस जन्मतःच गुन्हेगार असतो, का परिस्थिती त्याला गुन्हेगार बनण्यासाठी मजबूर करते या मूलभूत मुद्द्यावर हत्येच्या प्रयत्नातल्या चारही आरोपींच्या भूतकाळातून प्रकाश टाकलेला आहे. बहिणींवर झालेल्या अत्याचारातून गुन्हेगारीकडून वळलेला त्यागी (अभिषेक बॅनर्जी ), मामाने रेल्वेत सोडून दिलेली आणि लहानपणीच लैंगिक शोषणाचा बळी पडलेली चिनी ( रोनाल्डो सिंग ), पंजाबातल्या जातीभेदातून नखशिखांत पोळला गेलेला मंजार जातीचा तोप सिंग (जगजीत सिंधू ) आणि धार्मिक घृणेमुळे लहानपणीच भावाचा झालेला खून बघणारा कबीर ( आसिफ ) ह्या चारही पात्रांमधून आपल्या देशातल्या अधोविश्वाचं दर्शन घडत जातं. संजीव मेहराची anxiety असणारी बायको डॉली (स्वस्तिका मुखर्जी), स्वतःच्या सर्वसामान्य वडिलांची लाज वाटणारा हाथिरामचा मुलगा (बोधिसत्व शर्मा ), हाथिरामची संसारात फारशी आनंदी नसणारी तरी नवऱ्याच्या पाठीशी उभी असणारी बायको (गुल पनाग), आणि ज्याचे हेतू सुरुवातीपासूनच संशयास्पद वाटतात असा पोलीस अधिकारी (विपीन शर्मा) पण या जिगसॉ पझलचा महत्वाचा भाग आहेत. (Paatal Lok)
सीरिज अतिशय प्रभावी बनण्याचं श्रेय दिग्दर्शक अविनाश अरुण आणि प्रोसित रॉय यांना देऊन पण ह्या सीरीजवर पटकथा लेखक सुदीप शर्मा याचा ठसा अधिक ठळकपणे उमटला आहे हे मान्य करावं लागतं .दिग्दर्शकाला लेखकाने झाकोळून टाकण्याचं हे अपवादात्मक उदाहरण .सुदीप शर्माने पूर्वी केलेल्या कामाचा प्रभाव ‘पाताल लोक’ वर दिसतो . ‘पाताल लोक’ चा दुसरा सीझन पुढच्यावर्षी ओटीटीवर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
- Santosh Deshmukh Murder बीडचा बिहार झाल्याची विरोधकांची टीका
- World Tour Badminton : ट्रिसा-गायत्री जोडीचा पराभव
- India lost : स्मृतीच्या शतकानंतरही भारताचा पराभव