मुंबई; वृत्तसंस्था : येत्या काही वर्षांत भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. एका नवीन अहवालानुसार २०२६ पर्यंत देशात सुमारे दहा लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे.
सेमीकंडक्टर उद्योगाच्या विस्तारामुळे केवळ तांत्रिक क्षेत्रातच नव्हे, तर इतर अनेक क्षेत्रातही रोजगाराच्या संधी वाढतील. रोजगाराच्या शोधात असलेल्या लोकांसाठी या अहवालातून एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्राचा वेगाने विकास होईल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या क्षेत्रातील प्रक्रिया अभियंता, ऑपरेटर, तंत्रज्ञ, गुणवत्ता नियंत्रण विशेषज्ञ, विक्री आणि अभियांत्रिकी तज्ञांना मोठी मागणी असेल. याशिवाय चिप सेमीकंडक्टर निर्मितीमध्ये सुमारे तीन लाख नोकऱ्या, एटीएमपी (असेंबली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग) मध्ये सुमारे २ लाख नोकऱ्या आणि चिप डिझाइन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सिस्टम सर्किट्स आणि मॅन्युफॅक्चरिंग सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील.
भारत सरकार आणि अनेक खासगी कंपन्यांच्या पाठिंब्याने सेमीकंडक्टर उद्योगात मोठा बदल होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. भारतात नवीन सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी सुविधा उभारण्यासाठी कंपन्या गुंतवणूक करत आहेत. यामुळे केवळ सेमीकंडक्टर क्षेत्राचा विकास होणार नाही, तर देशातील उच्च-तंत्रज्ञान आणि बांधकाम क्षेत्रात रोजगाराचे नवीन मार्ग खुले होतील. हे सर्व बदल भारताच्या आर्थिक प्रगतीला आणि औद्योगिक विकासाला हातभार लावतील.
‘मजबूत सेमीकंडक्टर इकोसिस्टम विकसित करण्यासाठी भारताला जागतिक दर्जाची प्रतिभा आवश्यक आहे. त्यासाठी उत्तम शिक्षण आणि कौशल्य विकास आवश्यक आहे. दरवर्षी ५ लाख तरुणांना कौशल्याची गरज भासेल जेणेकरून ते या उदयोन्मुख सेमीकंडक्टर क्षेत्रात काम करू शकतील. यासोबतच विद्यार्थ्यांना या उद्योगाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळावे आणि नंतर रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी इंटर्नशिप अत्यंत महत्त्वाची आहे.
– सचिन अलुग, ‘सीईओ’, एनएलबी सर्व्हिसेस