ब्राझिलिया : ब्राझीलचा प्रमुख फॉरवर्ड फुटबॉलपटू नेमारचे राष्ट्रीय संघातील पुनरागमन मांडीच्या दुखापतीमुळे लांबवणीवर पडले आहे. पुढील आठवड्यामध्ये ब्राझीलचे २०२६च्या वर्ल्ड कपसाठीचे दोन पात्रता सामने होणार असून या सामन्यांकरिता नेमारच्या जागी एन्ड्रिकची निवड करण्यात आली. (Neymar)
नेमार मागील १७ महिन्यांपासून दुखापतीमुळे ब्राझील संघाकडून खेळलेला नाही. ऑक्टोबर, २०२३ मध्ये तो ब्राझीलकडून अखेरचा सामना उरुग्वेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर, गुडघ्याच्या दुखापतीमुळे नेमारला फुटबॉलपासून दूर राहावे लागले होते. वर्षभरानंतर, ऑक्टोबर २०२४ मध्ये तो एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये अल-हिलाल क्लबतर्फे एक सामना खेळला. परंतु, पुन्हा ‘हॅमस्ट्रिंग’ दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले. नेमारच्या सततच्या दुखापतींमुळे जानेवारी, २०२५ मध्ये अल-हिलालने परस्पर सहमतीने त्याच्यासोबतचा करार संपुष्टात आणला. त्यानंतर, नेमार हा ब्राझीलच्या सँटोस क्लबमध्ये दाखल झाला. मागील महिन्यात सँटोसकडून खेळलेल्या सात सामन्यांमध्ये त्याने तीन गोलही केले. त्यानंतर, आता त्यांच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले आहेत.(Neymar)
३३ वर्षीय नेमारने ब्राझीलकडून १२८ सामने खेळले असून ब्राझीलतर्फे सर्वाधिक ७९ आंतरराष्ट्रीय गोलचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्यामुळे, आगामी सामन्यांत त्याची उणीव ब्राझील संघाला जाणवेल. २०२६ च्या वर्ल्ड कप पात्रता फेरीमध्ये ब्राझीलचा सामना २० मार्चला कोलंबियाशी, तर २५ मार्चला गतविजेत्या अर्जेंटिनाशी होणार आहे. या सामन्यांसाठी नेमारच्या जागी एन्ड्रिकची निवड करण्यात आली.(Neymar)
१८ वर्षीय एन्ड्रिकने स्पेनच्या रियाल माद्रिद क्लबकडून खेळताना २८ सामन्यांत ६ गोल नोंदवले आहेत. त्याने १३ सामन्यांमध्ये ब्राझीलचे प्रतिनिधित्व केले असून त्याच्या नावावर ३ गोल जमा आहेत. दरम्यान, ब्राझीलचे मुख्य प्रशिक्षक डॉरिव्हल ज्युनियर यांनी गोलरक्षक लुकास पेरी आणि बचावपटू अलेक्स सँड्रो यांनाही संघात स्थान दिले आहे. (Neymar)
हेही वाचा :
सतेज चषक ‘पीटीएम’कडे