ख्राइस्टचर्च : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमान असतानाही साखळी फेरीतच बाद झालेल्या पाकिस्तान संघाला रविवारी टी-२० क्रिकेटमध्येही पराभवाचे तोंड पाहावे लागले. यजमान न्यूझीलंडने मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा ९ विकेटनी दणदणीत पराभव करून विजयी सलामी दिली. या विजयासह न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे. (Newzealand T-20)
बाबर आझम आणि महंमद रिझवानसारख्या प्रमुख खेळाडूंशिवाय खेळणाऱ्या पाकिस्तान संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शतकापर्यंतही पोहोचता आले नाही. न्यूझीलंडने पाक संघाचा डाव १८.४ षटकांत ९१ धावांत संपवला. न्यूझीलंडच्या भूमीवरील पाकची ही टी-२० क्रिकेटमधील नीचांकी धावसंख्या ठरली. पाकचे दोन्ही सलामीवीर खातेही न उघडता बाद झाले. पाककडून खुशदिल शाह वगळता एकाही फलंदाजास वैयक्तिक २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. खुशदिलने ३० चेंडूंमध्ये ३ षटकारांसह ३२ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे काइल जेमिसनने ३, जेकब डफीने ४, तर ईश सोधीने २ विकेट घेतल्या. (Newzealand T-20)
पाकिस्तानचे हे माफक आव्हान न्यूझीलंडने अवघ्या १०.१ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. न्यूझीलंडतर्फे सलामीवीर टीम सिफर्टने २९ चेंडूंमध्ये ७ चौकार व एका षटकारासह ४४ धावा फटकावल्या. सिफर्ट बाद झाल्यानंतर फिन ॲलन आणि टीम रॉबिन्सन यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. या मालिकेतील दुसरा सामना १८ मार्च रोजी ड्युनेडिन येथे होणार आहे. (Newzealand T-20)
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान – १८.४ षटकांत सर्वबाद ९१ (खुशदिल शाह ३२, सलमान आघा १८, जहाँदाद खान १७, काइल जेमिसन ३-८, जेकब डफी ४-१४) पराभूत विरुद्ध न्यूझीलंड – १०.१ षटकांत १ बाद ९२ (टीम सिफर्ट ४४, फिन ॲलन नाबाद २९, टीम रॉबिन्सन नाबाद १८, अबरार अहमद १-१५).
हेही वाचा :
सतरा वर्षीय अँड्रिव्हाचा स्वियातेकला धक्का