Home » Blog » Newzealand one-day : न्यूझीलंडची विजयी आघाडी

Newzealand one-day : न्यूझीलंडची विजयी आघाडी

दुसऱ्या वन-डेमध्ये पाकचा ८४ धावांनी पराभव

by प्रतिनिधी
0 comments
Newzealand one-day

हॅमिल्टन : न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या वन-डेमध्ये ८४ धावांनी विजय नोंदवून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. न्यूझीलंडने केलेल्या ८ बाद २९२ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव बेचाळिसाव्या षटकात २०८ धावांत संपुष्टात आला. (Newzealand one-day)

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर ऱ्हाइस मारियू आणि निक केली यांनी न्यूझीलंडला ६.२ षटकांत ५४ धावांची सलामी दिली. ही जोडी फुटल्यानंतर ठरावीक अंतराने न्यूझीलंडच्या विकेट पडल्या. सत्ताविसाव्या षटकात त्यांचा निम्मा संघ १३२ धावांत गारद झाला होता. परंतु, महंमद अब्बास आणि मिचेल हे यांनी सहाव्या षटकासाठी ७७ धावांची भागीदारी रचून न्यूझीलंडला दोनशेपार पोहचवले. (Newzealand one-day)

अब्बास ४१ धावांवर बाद झाल्यानंतर मिचेलने एकहाती फटकेबाजी करून न्यूझीलंडला तीनशे धावांच्या आसपास नेले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहात ७८ चेंडूंमध्ये प्रत्येकी ७ चौकार व षटकारांसह ९९ धावा फटकावल्या. शतकासाठी अखेरच्या चेंडूवर षटकाराची आवश्यकता असताना मिचेलने चौकार मारल्यामुळे तो ९९ धावांवर नाबाद राहिला. ९९ धावांवर नाबाद राहणारा तो न्यूझीलंडचा दुसरा, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सोळावा फलंदाज ठरला. याअगोदर ब्रुस एजरने १९८१ मध्ये भारताविरुद्ध नाबाद ९९ धावा केल्या होत्या. (Newzealand one-day)

प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानची आघाडीची फळी पुन्हा एकदा अपयशी ठरली. पाकच्या पहिल्या सहा क्रमांकावरील एकाही फलंदाजास वैयक्तिक वीस धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. फहीम अश्रफ आणि नसीम शाह यांच्या अर्धशतकांमुळे पाकने जेमतेम दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. फहीमने ८० चेंडूंमध्ये ६ चौकार, ३ षटकारांसह ७३, तर नसीमने ४४ चेंडूंमध्ये ४ चौकार, ४ षटकारांसह ५१ धावा केल्या. न्यूझीलंडच्या बेन सिअर्सने ५९ धावांत ५ विकेट घेऊन कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. जेकब डफीने ३ विकेट घेतल्या. या मालिकेतील अखेरचा सामना ५ एप्रिल रोजी माउंट माँगानुई येथे रंगणार आहे. (Newzealand one-day)

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड – ५० षटकांत ८ बाद २९२ (मिचेल हे नाबाद ९९, निक केली ३१, महंमद अब्बास ४१, महंमद वसीम २-७८, सुफियान मुकीम २-३३) विजयी विरुद्ध पाकिस्तान – ४१.२ षटकांत सर्वबाद २०८ (फहीम अश्रफ ७३, नसीम शाह ५१, बेन सिअर्स ५-५९, जेकब डफी ३-३५).

हेही वाचा :
सूर्यकुमारच्या आठ हजार धावा पूर्ण
पदार्पणातच ‘मोहाली बॉय’ चा विक्रम

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00