माउंट माँगानुई : यजमान न्यूझीलंडने मालिकेतील चौथ्या टी-२० सामन्यामध्ये पाकिस्तानवर ११५ धावांनी मात केली. न्यूझीलंडचा ६ बाद २२० धावांच्या आव्हानासमोर पाकिस्तानचा डाव १०५ धावांत संपुष्टात आला. या विजयासह न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. (Newzealand)
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय पाकच्या अंगलट आला. टीम सिफर्ट आणि फिन ॲलन यांनी न्यूझीलंडला ४ षटकांमध्येच ५९ धावांची दमदार सलामी दिली. सिफर्ट २२ चेंडूंमध्ये ३ चौकार व ४ षटकारांसह ४४ धावा करून बाद झाल्यानंतर ॲलनने मार्क चॅपमनसह संघाचे शतक पूर्ण केले. अवघ्या १९ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या ॲलनने २० चेंडूंमध्ये ६ चौकार व ३ षटकारांसह ५० धावा फटकावल्या. डावाच्या अखेरीस कर्णधार मायकेल ब्रेसवेलच्या २६ चेंडूंमधील ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४६ धावांमुळे न्यूझीलंडला २२० धावांपर्यंत पोहोचता आले. (Newzealand)
न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. पॉवर-प्लेमध्येच पाकिस्तानचा निम्मा संघ ४२ धावांमध्ये माघारी परतला होता. इरफान खान व अब्दुल समदचा अपवाद वगळता पाकच्या एकाही फलंदाजास वैयक्तिक धावांचे दशकही ओलांडता आले नाही. समदने ३० चेंडूंमध्ये ४ चौकार व २ षटकारांसह ४४ धावा केल्याने पाकला कसेबसे शतक धावफलकावर लावता आले. न्यूझीलंडतर्फे जेकब डफीने ४, तर झॅकरी फोक्सने ३ विकेट घेतल्या. या मालिकेतील अखेरचा सामना २६ मार्च रोजी वेलिंग्टन येथे होणार आहे. (Newzealand)
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड – २० षटकांत ६ बाद २२० (फिन ॲलन ५०, टीम सिफर्ट ४४, मायकेल ब्रेसवेल नाबाद ४६, हारिस रौफ ३-२७, अबरार अहमद २-४१) विजयी विरुद्ध पाकिस्तान १६.२ षटकांत सर्वबाद १०५ (अब्दुल समद ४४, इरफान खान २४, जेकब डफी ४-२०, झॅकरी फोक्स ३-२५).
हेही वाचा :
अर्जेंटिना पात्रतेच्या उंबरठ्यावर