माउंट माँगानुई : फलंदाजांनी ऐनवेळी केलेल्या हाराकिरीमुळे श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात ८ धावांनी पराभव ओढावून घेतला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. (Newzealand)
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १७२ धावा केल्या. दहाव्या षटकामध्ये न्यूझीलंडचा निम्मा संघ ६५ धावांत गारद झाला होता. परंतु, डॅरेल मिचेल आणि मायकेल ब्रेसवेल यांनी सहाव्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी रचून न्यूझीलंडला पावणेदोनशे धावांच्या आसपास पोहोचवले. न्यूझीलंडकडून टी-२०मध्ये सहाव्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी ठरली. ब्रेसवेलने ४२ चेंडूंमध्ये ४ चौकार, २ षटकारांसह ६२ धावा केल्या, तर ब्रेसवेलने ३३ चेंडूंमध्ये प्रत्येकी ४ चौकार, षटकारांसह ५९ धावा फटकावल्या. (Newzealand)
न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना पथुम निसंका व कुसल मेंडिस यांनी श्रीलंकेला शतकी सलामी दिली. या दोघांनी चौदाव्या षटकामध्ये संघाच्या १२१ धावा धावफलकावर लावल्या होत्या. त्यावेळी श्रीलंकेचा संघ हा सामना सहज जिंकू शकेल, असे वाटत होते. तथापि, पुढील सात षटकांमध्ये श्रीलंकेने ८ विकेट गमावल्या. यापैकी अखेरच्या पाच विकेट तर केवळ १३ चेंडूंमध्ये गेल्या. परिणामी, श्रीलंकेला ८ बाद १६४ धावांपर्यंतच मजल मारता आली. निसंकाने ६० चेंडूंमध्ये ७ चौकार व ३ षटकारांसह ९० धावांची खेळी केली. मेंडिसने ३६ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ४६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून जेकब डफीने ३, तर मॅट हेन्री आणि झाकेरी फोक्स यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (Newzealand)
हेही वाचा :