Home » Blog » New zealand : न्यूझीलंडचा बांगलादेशवर विजय

New zealand : न्यूझीलंडचा बांगलादेशवर विजय

पाच विकेटनी मात; किवींसोबत भारताचीही उपांत्य फेरी निश्चित

by प्रतिनिधी
0 comments
New Zealand


रावळपिंडी : न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेच्या ‘ग्रुप ए’मध्ये सोमवारी बांगलादेशचा पाच विकेटनी पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. रचिन रवींद्रचे शतक आणि मायकेल ब्रेसवेलच्या ४ विकेटमुळे न्यूझीलंडने २३७ धावांचे लक्ष्य ४६.१ षटकांत ५ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलग दोन विजयांमुळे न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला असून या गटातून भारताचेही उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. त्याचवेळी गतविजेत्या यजमान पाकिस्तानसह बांगलादेशचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. (New Zealand)
बांगलादेशने दिलेल्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. विल यंग आणि केन विल्यमसन हे भरवशाचे फलंदाज पहिल्या चार षटकांमध्येच अनुक्रमे ० व ३ धावांवर माघारी परतले. त्यानंतर, डेव्हॉन कॉन्वे आणि रचिन रवींद्र यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. कॉन्वे बाद झाल्यानंतर रचिनने टॉम लॅथमसह चौथ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडचे द्विशतक धावफलकावर लावले. दरम्यान, रचिनने कारकिर्दीतील चौथे वन-डे शतक झळकावत १०५ चेंडूंमध्ये १२ चौकार व एका षटकारासह ११२ धावांची खेळी केली. लॅथमनेही ७६ चेंडूंत ३ चौकारांसह ५५ धावा करून त्याला पूरक साथ दिली. हे दोघे बाद झाल्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि मायकेल ब्रेसवेल यांनी सत्तेचाळिसाव्या षटकात न्यूझीलंडचा विजय साकारला. (New Zealand)
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने ५० षटकांत ९ बाद २३६ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार नजमुल हसन शांतो आणि तन्झिद हसन यांनी बांगलादेशला ४५ धावांची सलामी दिली. हसन २४ धावांवर बाद झाल्यानंतर बांगलादेशचे अन्य आघाडीचे फलंदाजही स्वस्तात बाद झाले. ११८ धावांमध्ये बांगलादेशचा निम्मा संघ गारद झाला होता. शांतोने एक बाजू लावून धरत जाकेर अलीसोबत सहाव्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी रचली. त्याने ११० चेंडूंमध्ये ९ चौकारांसह ७७ धावांची खेळी केली. शांतो बाद झाल्यानंतर जाकेर आणि रिशाद हुसेनच्या फटकेबाजीमुळे बांगलादेशला सव्वादोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. जाकेरने ५५ चेंडूंमध्ये ३ चौकार व एका षटकारासह ४५ धावा केल्या. रिशादने त्याला २६ धावांची उपयुक्त साथ दिली. न्यूझीलंडकडून मायकेल ब्रेसवेलने ४, तर विल ऑरुर्केने २ विकेट घेतल्या. (New Zealand)
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश – ५० षटकांत ९ बाद २३६ (नजमुल हुसेन शांतो ७७, जाकेर अली ४५, रिशाद हुसेन २६, मायकेल ब्रेसवेल ४-२६, विल ऑरुर्के २-४८) पराभूत विरुद्ध न्यूझीलंड ४६.१ षटकांत ५ बाद २४० (रचिन रवींद्र ११२, टॉम लॅथम ५५, डेव्हॉन कॉन्वे ३०, तस्किन १-२३, मुस्तफिझूर १-४२).

हेही वाचा :

नेदरलँड्सची भारतावर मात

‘मला आता लय सापडतेय’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00