नवी दिल्ली : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मुद्द्यावर बोलताना शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या वक्तव्याला उत्तर देताना, द्रमुक खासदार कनिमोळी यांनी सोमवारी (१० मार्च) त्यांच्याविरुद्ध संसदीय विशेषाधिकार भंगाची नोटीस दाखल केली.(NEP-DMK)
एनईपी अंतर्गत प्रस्तावित त्रिभाषिक सूत्रावर सुरू असलेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस दिली आहे. त्यामुळे केंद्र आणि तामिळनाडू सरकारमध्ये वाद आणखी उफाळण्याची शक्यता आहे.
नोटीस दाखल करण्यापूर्वी कनिमोळी म्हणाल्या की, द्रमुक सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाबद्दल चिंता व्यक्त केली होती. या धोरणाला पूर्णपणे मान्यता देण्यास नकार दिला होता. (NEP-DMK)
‘‘केंद्र सरकारने शालेय शिक्षणासाठी निधीचा विषय राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीशी जोडू नये. आम्ही आमची भूमिका बदललेली नाही. मंत्र्यांनी आमचा उल्लेख खोटारडे आणि असभ्य असा केला. त्यांनी आमच्या अभिमानाला धक्का पोहोचलवला आहे. आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही, पण तुम्ही आम्हाला असभ्य म्हणू शकत नाही,’’ असे कनिमोझी यांनी सभागृहात प्रधान यांना सुनावले. (NEP-DMK)
तत्पूर्वी, तामिळनाडूमध्ये एनईपीच्या अंमलबजावणीवरून सुरू असलेल्या वादात प्रधान यांनी केलेल्या वक्तव्याचा अनेक विरोधी सदस्यांनी निषेध केला. विरोधकांनी गोंधळ घातल्याने लोकसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.
धर्मेंद्र प्रधान काय म्हणाले?
पीएम श्री योजनेवरील प्रश्नाचे उत्तर देताना प्रधान म्हणाले की, द्रमुकच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारने केंद्र, राज्य किंवा स्थानिक संस्थांद्वारे व्यवस्थापित शाळांना बळकटी देणारी केंद्र पुरस्कृत योजना लागू करण्याबाबतची भूमिका बदलली आहे.
प्रधान पुढे म्हणाले, ‘ते बेईमान आहेत आणि ते तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहेत. ते राजकारण करत आहेत.’ तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही सुरुवातीला सहमती दर्शवली होती, “पण अचानक कोणीतरी सुपर सीएम आले आणि त्यांनी यू-टर्न घेतला,’’ असा आरोपही त्यांनी केला. (NEP-DMK)
“आज १० मार्च आहे. मार्च संपण्यास अजून २० दिवस शिल्लक आहेत,” असे सांगताना त्यांनी तामिळनाडू सरकारला पीएम एसएचआरआयवरील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी किती वेळ शिल्लक आहे, ते अप्रत्यक्षरित्या सुनावले. (NEP-DMK)
प्रधान यांच्या वक्तव्यावर टीका करताना काँग्रेस खासदार मल्लू रवी म्हणाले की, दक्षिण भारतातील लोकांना समान आदर दिला पाहिजे. ‘‘आज एका प्रश्नाचे उत्तर देताना शिक्षणमंत्र्यांनी एका राज्याबद्दल अतिशय असंसदीय टिप्पणी केली. त्यांनी तमिळ लोक असंस्कृत आहेत असे म्हटले,’ यावेळी रवी यांनी लक्ष वेधले.
काँग्रेसचे कार्ती चिदंबरम यांनी म्हटले की, त्रिभाषिक धोरण स्वीकारायचे नाही, यावर तामिळनाडूत सामाजिक आणि राजकीय एकमत आहे.
हेही वाचा :
बाळासाहेब देसाईंमुळे बहुजन विद्यार्थी शिक्षण प्रवाहात