मुंबई : विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी अवघे दहा आमदार असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘शॅडो कॅबिनेट’ची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षाच्या नेत्यांवर विभागवार जबाबदारी देण्यात आली आहे. या नेत्यांना महाराष्ट्र पिंजून काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.(NCP)
पवार गटाची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व आमदारांची आणि खासदारांची उपस्थिती होती. पक्षवाढीसाठी काही प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. जयप्रकाश दांडेगावकर, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, रोहित पवार, एकनाथ खडसे, हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाने जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. या नेत्यांनी प्रत्येक महिन्यात जिल्ह्यांचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी देण्याची रणनीती आखली आहे. जिथे पद रिक्त असेल तेथे ते भरले जाणार आहे. पदाधिकारी बदलायची गरज वाटत असेल तर तेही बदलले जातील.(NCP)
पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी नव्या उमेदीने कामाला लागण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या. पुढच्या तीन महिन्यात महाराष्ट्र पिंजून काढा आणि त्याचा अहवाल द्या असे आदेश पवारांनी दिले आहेत. याबाबत खा. अमोल कोल्हे म्हणाले की, सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवणारी टास्क टीम तयार करण्यात आली. तसेच विभागनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. ७, ८ मार्चपासून या नेत्यांना विभागनिहाय दौरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबतचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होईल. या अधिवेशनात विरोधी पक्ष नेतेपदाबाबत जो प्रस्ताव दिला जाईल त्यावर सरकारनेही विचार करावा, असा ठराव बैठकीत करण्यात आला. (NCP)
युवक अध्यक्षपदी फहाद अहमद
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी फहाद अहमद यांची निवड करण्यात आली आहे. फहाद अहमद यांनी अणुशक्तीनगर विधानसभेची निवडणूक लढली होती. ते अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती आहेत. त्यांच्या निवडीची माहिती पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरून दिली.
अशी आहे जबाबदारी
मराठवाडा : राजेश टोपे आणि जयप्रकाश दांडेगांवकर
विदर्भ : राजेंद्र शिंगणे आणि अनिल देशमुख
कोकण : जितेंद्र आव्हाड आणि सुनिल भुसारा
प. महाराष्ट्र : हर्षवर्धन पाटील
उत्तर महाराष्ट्र : हर्षवर्धन पाटील
हेही वाचा :
आ. सतेज पाटील विधान परिषद गटनेतेपदी
महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी लाजा गुंडाळून ठेवल्या आहेत का?