मुंबई : विशेष प्रतिनिधी : दूधभेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक सक्रिय झाला आहे. अत्यंत सुनियोजित आणि धडाकेबाज कारवाई करण्यात येणार आहे. १५ जानेवारीला दूध सर्वेक्षण मोहिमेमध्ये अप्रमाणित घोषित करण्यात आलेल्या दुधाच्या नमुन्यांबाबत संबंधित सहाय्यक आयुक्त (अन्न) आणि संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.(Narahari zirval)
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशाने शनिवारी पहाटेपासून राज्यभरातील दूध उत्पादक, वितरक, विक्रेते व रस्त्यावरील विक्री केंद्रांवर अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यव्यापी तपासणी मोहीम राबवली. बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती येथे ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये विविध ब्रॅंडच्या पिशवीबंद/पॅकबंद दुधाचे ६९८ नमुने आणि सुट्ट्या स्वरुपातील दुधाचे ३९७ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. म्हणजेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या एकूण १०९५ नमुन्यांचे अन्नसुरक्षा व मानके प्राधिकृत प्रयोगशाळांमधून विश्लेषण करण्यात आले. यापैकी १३३ नमुने मानकाप्रमाणे नसल्याचे आढळून आले होते. याबाबत पुढील कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. (Narahari zirval)
केंद्रीय परवाना आस्थापना व राज्य परवाना आस्थापना मधील नमुने अप्रमाणित घोषित झाले होते. त्या संदर्भात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी उत्पादकांकडे नियमित नमुने घेऊन व विश्लेषण अहवालांच्या अनुषंगाने भेसळकारी पदार्थांबाबत आस्थापनेची सखोल तपासणी करुन भेसळ कोणत्या स्तरावर झाली याबाबत संपूर्ण तपास, चौकशी करण्याचे व अशा आस्थापनांवर तसेच पुरवठादारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. (Narahari zirval)
यासोबतच ‘एफडीए’ने मागील २ वर्षांचा आढावा घेतला असता, दूधभेसळ करणार्यांवर केवळ दंडात्मक कारवाई करुन कोणताच फरक पडत नाही. उलट कारवाई झाल्यानंतरही अशी भेसळ सुरुच राहते, असे आढळले. त्यामुळे आता एफडीएने याबाबत कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. अशा भेसळखोरांवर चाप बसवण्यासाठी कायद्यातील तरतुदींनुसार संपूर्ण तपास करुन हलगर्जीपणा व भेसळ आढळल्यास त्यांचा परवाना निलंबित किंवा रद्द केला जाऊ शकतो.
हेही वाचा :