Home » Blog » मुस्लिम, ख्रिश्चन आणि संतविचार

मुस्लिम, ख्रिश्चन आणि संतविचार

मुस्लिम, ख्रिश्चन आणि संतविचार

by प्रतिनिधी
0 comments
religion file photo

आज आपण संपूर्ण देशामध्ये पाहिले तर मुस्लिम समाजाबद्दल विद्वेष पसरविण्याचे काम काही मंडळी जाणीवपूर्वक करीत आहेत. दरोडे घालणारे हे फक्त मुसलमान असतात, बॉम्बस्फोट करणारे फक्त मुसलमान असतात, दंगल घडवणारे फक्त मुसलमान असतात, इतकंच नव्हे तर कोरोनाचे संकट हे संपूर्ण जगावर घोंगावत असताना, तो कोरोना देशामध्ये पसरविण्याचे काम सुद्धा मुसलमानांनी केलं, असा विद्वेषाचा विखार पसरविण्याचं काम काही मंडळींनी जाणीवपूर्वक केले.

 तुम्ही म्हणाल, महाराज! हे जुने नका सांगू आम्हाला! आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे विद्वेषाचे वातावरण सगळीकडे असताना असा कोणता मुसलमान आहे का की, जो खांद्यावर वारकरी संतांचा वीणा घेतो, हातामध्ये टाळ घेतो आणि समतेचा विचार गावागावांमध्ये पोहोचवून सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न करतो? असा एक तरी कीर्तनकार आहे का? आपल्या माहितीसाठी सांगतो की, आजही जवळपास २२ मुसलमान कीर्तनकार-भारुड, भजन गायक दररोज खांद्यावरती वीणा घेऊन हा वारकरी संतांचा समतेचा विचार गावागावांमध्ये कीर्तन, भजन, भारताच्या माध्यमातून सांगत आहेत. ज्यामध्ये औरंगाबादचे ताजुद्दीन महाराज शेख, निफाडचे जलाल महाराज सय्यद, भारूडकार आमीन महाराज सय्यद, महम्मद महाराज, आतार महाराज इत्यादी 22 मुसलमान कीर्तनकार आज समाजामध्ये प्रबोधन करीत आहेत. सातारा जिल्ह्यातले अकबर आबा कुशीकर यांचे भजन अत्यंत लोकप्रिय होतं. किर्तन आणि भजन ही त्यांची आवड होती.

माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यामध्ये एक दिंडी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी असते ती दिंडी आहे जैतुनबी आक्का शेख यांची. जैतुनबी आक्का मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आल्या पण मुस्लिम असून त्यांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली आणि वारकरी संप्रदायाचा हा विचार स्वीकारून कीर्तनाच्या माध्यमातून गावागावांमध्ये पोहचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःची दिंडी काढली. त्यांच्या दिंडीमध्ये अनेक वारकरी सहभागी झाल्याचे आपल्याला दिसून येतात. तिथे त्यांनी जात-धर्म विसरून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.

ख्रिश्चन धर्माबद्दल सुद्धा लोक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करतात. ख्रिश्चनांनी पूर्वी पाव टाकून लोकांना धर्मांतरित केलं आणि अलीकडे त्यांच्या शिक्षण संस्थांचा, सेवा उपक्रम, दवाखाने, अनाथ आश्रम आहेत त्यांचा उद्देश लोकांचं कल्याण करण्यापेक्षा त्यांच्या मनामध्ये धर्मांतराची भावना रुजवण्याचा असतो, असा प्रचार केला जातो. मग या ख्रिश्चन समुदायानं वारकरी संतांचा समतेचा विचार समाजामध्ये पोहोचविण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का? असा विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतो. वारकरी संप्रदायाचा ‘पाचवा वेद’ म्हणून ज्याचा गौरव केला जातो ती तुकारामांची गाथा पहिल्यांदा सरकारी खर्चाने प्रसिद्ध करून कमीत कमी किमतीत लोकांना उपलब्ध करून देण्याचा पहिला प्रयत्न करणारा कोणताही हिंदू राजा नव्हता, हिंदू पंतप्रधान नव्हता, हिंदू मुख्यमंत्री नव्हता, हिंदू पाटील नव्हता वा हिंदू सावकार नव्हता तर तुकाराम महाराजांची गाथा सरकारी खर्चातून प्रकाशित करून त्या कमीत कमी किमतीत लोकांना उपलब्ध करून देणारा जगातला पहिला माणूस कोण असेल तर ते ख्रिश्चन ग्रँट अलेक्झांडर आहेत. ग्रँट अलेक्झांडर हे इंग्रजांच्या काळात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. इंग्रज आपल्या देशामध्ये आले ते आज आले आणि उद्या त्यांनी इथला राज्यकारभार हातात घेतला असं झालं नाही. इंग्रज याठिकाणी व्यापारी म्हणून आले, इथल्या संस्कृतीचा अभ्यास केला, इथल्या मातीचा अभ्यास केला, इथले ग्रंथ साहित्य यांचा अभ्यास केला. इथल्या साहित्याचा अभ्यास करण्याची जबाबदारी ही शिक्षणतज्ञ असणाऱ्या अलेक्झांडर साहेबांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. ते इथल्या वेगवेगळ्या विचारवंतांचे साहित्य वाचत होते. कन्नड भाषेतील बसवेश्वरांची वचने जर समजून घ्यायची झाली तर ते इंग्रजी आणि कन्नड भाषा अवगत असणाऱ्या माणसाना जवळ करायचे आणि ते साहित्य समजून घ्यायचे. कबीर महाराजांचे दोहे समजून घ्यायचे झाले तर ज्यांना हिंदी आणि इंग्रजी येते त्यांना जवळ करायचे आणि त्याचे इंग्रजीत आकलन करून घ्यायचे. असे वेगवेगळ्या भाषेतले संतांचे विचार समजून घेत असताना त्यांच्या वाचनामध्ये संत तुकाराम महाराजांची गाथा आली. आणि गाथेतील एकेक अभंग ते मराठी माणसाकडून समजून घेऊ लागले. एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात,

नव्हती ते संत करिता कीर्तन l

सांगता पुराण नव्हती संत ll

कुणी कितीही चांगले कीर्तन केले तरी तो संत होऊ शकत नाही. कुणी मंदिरांमध्ये खूप सुंदर पणे पुराण समजून सांगत असेल तरी तो संत होऊ शकत नाही. संतांच्यासारखे एखादे काव्य करून कोणी अभंग रचण्याचा प्रयत्न केला तरी तो अभंग करणारासुद्धा संत होऊ शकत नाही. असं तुकाराम महाराज सांगतात.

नव्हती ते संत करिता कीर्तनl

सांगता पुराण नव्हती संतll

तुकाराम महाराज म्हणतात, माळामुद्रा घातल्याने संत होता येत नाही. मग महाराजांना लोकांनी विचारलं, “महाराज भगवे कपडे घातल्याने तर संत होता येते का?” महाराज म्हणतात, “भगवे कपडे घातल्याने संत होता येत नाही असं नाही, पण कुणीतरी भगवे कपडे घातले असेल आणि मलाच संत म्हणा! असं म्हणत असेल तर त्याला संत म्हणता येणार नाही.” महाराज म्हणतात,

भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा l

तेथे अनुभवाचा काय पंथll

फक्त भगवे कपडे घातले म्हणून कोणीतरी “मला संत म्हणा!” असं म्हणत असेल तर गावातल्या कुत्र्यांनाही संत म्हणावे लागेल. कारण गावातील अनेक कुत्र्यांचा रंग भगवा आहे, मग सगळ्याच कुत्र्यांना संत म्हणावे काय?

बोगस संतांचा उदो उदो करणारी यंत्रणा इथं कार्य करीत आहे. ते भोंदूबाबाचाही प्रचार करतात. ते म्हणतात, “आमचे बाबा इतके श्रेष्ठ आहेत की, सहा महिने गुहेत राहतात आणि एकच महिना बाहेर येतात, ज्यांचे भाग्य थोर आहे त्यांनाच बाबांचे दर्शन मिळतं.”

मग लोकांचीही उत्सुकता वाढते त्यांना वाटते, ते मग त्या प्रचार करणा-या शिष्याकडे त्या बाबाच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करतात, ते बनेल शिष्य अधिकच बाबांचे कौतुक करून, थोर भाग्य असल्याशिवाय दर्शन होत नाही, असे ठासून सांगतात. आपण पूर्णपणे त्यांच्या कह्यात गेलो आहे, असे लक्षात आले की, ते हळूच म्हणतात….

मी तुमच्या दर्शनाची व्यवस्था करतो. तुम्ही बाबाच्या मठासाठी काही व्यवस्था करा. म्हणजे मोठी देणगी द्या. अशा देणगी घेऊन दर्शन देणा-याचे दर्शन घ्यावे का, असे तुकाराम महाराजांना विचारले, तेव्हा महाराज म्हणतात, “इतका आटापिटा करून त्याचे दर्शन घ्यायला जातोस तर त्याचे मोठेपण काय आहे?”

दर्शन उत्सुक म्हणतो ते, “सहा महिने गुहेत राहतात”

मग तुकाराम महाराज म्हणतात, “अरे केवळ सहा महिने गुहेत राहतो म्हणून त्याचे दर्शन घ्यायचे असेल तर उंदराचे घे ना! ते बारा महिने गुहेत राहतात.”

मग लोक महाराजांना विचारतात, “महाराज! तुम्ही कीर्तनकारांना संत म्हणत नाही, तुम्ही पुराण वाचणाऱ्यांना संत म्हणत नाही, तुम्ही अभंग लिहिणाराला संत म्हणत नाही, तुम्ही गुहेत राहणाऱ्याला संत म्हणत नाही, भगवे कपडे घालणाऱ्याला संत म्हणत नाही. मग या जगात संतच नाहीत का?” तेव्हा तुकाराम महाराज सांगतात, “आहेत ना!” मग ते आपल्या सर्वांच्या जिभेवर असणारी संतांची व्याख्या सांगतात.

जे का रंजले गांजलेl

त्यासी म्हणे जो आपुलेll

तोचि साधू ओळखावाl

देव तेथेची जाणावाlll

जो रंजल्या गांजलेल्यांची सेवा करतो, तो खऱ्या अर्थाने संत आहे. हा अभंग ग्रँट अलेक्झांडर यांनी द्विभाषिकाकडून ऐकला आणि ते प्रभावित झाले. गोरगरिबांची, रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करणाऱ्याला संतत्व बहाल करणारे तुकाराम महाराज खरे एकमेव विचावंत आहेत अशी त्यांना खात्री पटली. त्यांनी तुकारामांची गाथा समजून घेतली. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, सामाजिक समता, अंधश्रद्धा इत्यादीबाबतचे तुकोबारायांचे विचार सांगणारी गाथा त्यांनी झपाटल्यासारख्या समजून घेतली. त्यांना वाटले समाजात डोळसं विचारांच्या पिढ्या जर घडवायच्या असतील तर हा संत तुकाराम महाराजांचा विचार गावागावात गेला पाहिजे. त्यासाठी तुकारामांची गाथा कमी किंमतीत लोकांना उपलब्ध करून दिली पाहिजे. ती कमी किमतीत द्यावयाची असेल तर त्याच्या प्रकाशनाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. मग आलेक्झांडर यांनी इंग्रज सरकारच्या खजिन्यातून २४ हजार रुपये खर्च करून तुकारामांची गाथा १८६८ मध्ये प्रसिद्ध केली. 

तात्पर्य हे की एका ख्रिश्चन माणसाने वारकरी विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. अगदी अलीकडचे उदाहरण सांगायचं झालं तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांनीसुद्धा संत साहित्यावर अभ्यास केलेला आहे. अशा प्रकारे सर्व धर्मांच्या लोकांनी वारकरी संप्रदायाबरोबर काम करून समतेचा विचार लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाला कोणत्याही एका धर्मात बंदिस्त करता येणार नाही. वारकरी संप्रदाय हा सर्व जातींचा, सर्व धर्मांचा, सर्व पंथाचा आहे. तसेच भारतीय संविधान ही सर्व जात, धर्म, पंथाचे आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00