Home » Blog » Munde-Karuna case : वादग्रस्त धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात!

Munde-Karuna case : वादग्रस्त धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात!

पोटगीविरूध्दची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली

by प्रतिनिधी
0 comments
Munde-Karuna case

मुंबई : विशेष प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना पोटगी देण्याबाबत दिलेल्या निकालाविरोधात त्यांनी दाखल केलेली याचिका मुंबईतील माजगाव सत्र न्यायालयाने शनिवारी (५ एप्रिल) फेटाळून लावली.अतिरिक्त सत्र न्यायालयाने हा निकाल करुणा शर्मा यांच्या बाजूने देत वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने त्यांना व त्यांची मुलगी शिवानी यांना दरमहा २ लाख रुपये पोटगी देण्याचा  निर्णय कायम ठेवला. (Munde-Karuna case)

त्यामुळे त्याविरोधात धनंजय मुंडे यांना उच्च न्यायालयात आव्हान देण्याशिवाय पर्याय नाही. वांद्रे कौटुंबिक न्यायालयातील न्या. एस. बी. जाधव यांनी गेल्या २८ फेब्रुवारीला करुणा मुंडे यांच्या याचिकेवर निकाल दिला होता. त्यासाठी त्यांनी दाखल केलेले धनंजय मुंडे यांचे तत्कालीन इच्छापत्र महत्त्वपूर्ण ठरले.

 करूणा या धनंजय मुंडे यांच्या सुकृतदर्शनी प्रथम पत्नी असल्याचे मान्य करीत त्यांना घरखर्चासाठी दरमहा एक लाख २५ हजार व मुलगी शिवानी हिच्यासाठी ७५ हजार असे  एकूण २ लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. त्या विरोधात मुंडे यांच्यावतीने माझगाव कोर्टात याचिका दाखल केली होती. (Munde-Karuna case)

शनिवारी झालेल्या अंतिम सुनावणीवेळी करुणा शर्मा यांच्याकडून महत्वाची कागदपत्रे पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आली. धनंजय मुंडेंचे अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र अशा महत्त्वाच्या कागदपत्रांचा पुराव्यात समावेश करण्यात आला होता. याच पुराव्यांच्या आधारे करुणा मुंडे यांना न्यायालयाने दिलासा दिला. (Munde-Karuna case)

निकालात काय म्हटलंय?

न्यायालयाने धनंजय मुंडेंची आव्हान याचिका फेटाळली. करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुनावणी वेळी करुणा शर्मा- मुंडे यांनी न्यायालयात लग्नासंदर्भातले धनंजय मुंडे यांचे स्वीकृतीपत्रही सादर केले. या पत्रात धनंजय मुंडे यांनी ८ जानेवारी १९९८ रोजी वैदिक पद्धतीने करुणा यांच्याशी लग्न केल्याचा उल्लेख आहे. तसेच आई-वडिलांच्या दबावाखाली येऊन राजश्री यांच्यासोबत दुसरे लग्न केल्याचाही उल्लेख आहे. धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी  हे स्वीकृतीपत्र खोटे असल्याचे म्हणत सर्व दावे फेटाळले.

मात्र न्यायालयाने ते मान्य केले. कौटुंबिक न्यायालयाचा निकाल कायम ठेवताना मुंडे यांची याचिका फेटाळून  लावली.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे डिसेंबर महिन्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांचा कट्टर समर्थक वाल्मिक कराड हा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढला होता. त्याचबरोबर मागील सरकारमध्ये कृषी मंत्री असताना शेतकरी पीक विमा योजनेत कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा तसेच कराड समवेत हजारो कोटींची बेनामी संपत्ती अवैध मार्गाने जमवल्याचाही आरोप करण्यात आला होता. त्यातच करुणा मुंडे यांनी कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत कोर्टाने त्यांना दर महिन्याला पावणेदोन लाख रुपये देण्याची निर्णय दिला होता. त्यामुळे विरोधकांसह पक्षातील टीकाराकडून टीकेची झोड उठली होती. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप

दरम्यान, मला प्रेमात अडकवून जो लग्न करेल त्याला धनंजय मुंडेंनी २० कोटींची ऑफर दिली असल्याचा खळबळजनक आरोप करुणा शर्मा यांनी शनिवारी केला. यात त्यांनी  मुंडेंसह घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्कर यांच्या नावांचाही उल्लेख शर्मा यांनी केला. आपल्याला मोठमोठ्या दिग्दर्शकांकडून हिरॉईनची ऑफर होती असे सांगून धनंजय मुंडे यांनी आपल्या बदनामीचा कट रचल्याचा दावाही करुणा शर्मा यांनी केला. हे आरोप करताना करुणा शर्मा यांना अश्रू अनावर झाले होते.

हेही वाचा :
अभय कुरूंदकर दोषी
 ‘बेअक्कल आणि भंपक कृषिमंत्री’

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00