Home » Blog » Mumbai Win : मुंबई, विदर्भ, गुजरात उपांत्य फेरीत

Mumbai Win : मुंबई, विदर्भ, गुजरात उपांत्य फेरीत

केरळला अखेरच्या दिवशी विजयासाठी २९९ धावांची गरज

by प्रतिनिधी
0 comments
Mumbai Win

कोलकाता : गतविजेत्या मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाचा १५२ धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढतींमध्ये विदर्भाने तमिळनाडूवर १९८ धावांनी मात केली, तर गुजरातने सौराष्ट्राला एक डाव ९८ धावांनी हरवले. केरळला जम्मू आणि काश्मीरवर विजय मिळवण्यासाठी अखेरच्या दिवशी २९९ धावांची आवश्यकता आहे. (Mumbai Win)

मुंबईने तिसऱ्या दिवशी हरियाणाविरुद्ध २९२ धावांची आघाडी घेतली होती. मंगळवारी मुंबईचा दुसरा डाव ३३९ धावांत संपुष्टात आला. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने शतक झळकावताना १८० चेंडूंमध्ये १३ चौकारांसह १०८ धावांची खेळी केली. शिवम दुबेने ६ चौकार व एका षटकारासह ४८ धावा फटकावल्या. मुंबईने पहिल्या डावामध्ये १४ धावांची आघाडी घेतल्यामुळे हरियाणासमोर विजयासाठी ३५४ धावांचे लक्ष्य होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हरियाणाचा दुसरा डाव चौथ्या दिवशीच २०१ धावांत संपुष्टात आला. (Mumbai Win)

हरियाणातर्फे दुसऱ्या डावामध्ये लक्ष्य दलाल आणि सुमीत कुमार यांनाच अर्धशतकी कामगिरी करता आली. सलामीवीर लक्ष्यने १३० चेडूंमध्ये ९ चौकारांसह ६४ धावा, तर सुमीतने ९६ चेंडूंमध्ये १० चौकारांसह ६२ धावा केल्या. हरियाणाचे अन्य फलंदाज मात्र मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मुंबईचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रॉयस्टन डायसने ३९ धावांत हरियाणाचा निम्मा संघ गारद केला. शार्दुल ठाकूरने ३, तर तनुष कोटियनने २ विकेट घेऊन मुंबईच्या विजयात हातभार लावला. (Mumbai Win)

उपांत्य फेरीत मुंबईची लढत विदर्भाच्या संघाशी होईल. हे दोन्ही संघ मागील मोसमाच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. मंगळवारी विदर्भाने उपांत्यपूर्व लढतीमध्ये तमिळनाडूसमोर विजयासाठी ४०१ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरादाखल तमिळनाडूचा दुसरा डाव २०२ धावांत आटोपला. गुजरातने पहिल्या डावामध्ये घेतलेल्या २९५ धावांच्या आघाडीपुढे सौराष्ट्राचा दुसरा डाव १९७ धावांत गारद झाला. जम्मू आणि काश्मीरने चौथ्या दिवशी दुसरा डाव ९ बाद ३९९ धावांवर घोषित करून केरळसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर दिवसअखेरपर्यंत केरळने दुसऱ्या डावात २ बाद १०० धावा केल्या होत्या. (Mumbai Win)

संक्षिप्त धावफलक : मुंबई – पहिला डाव ३१५ आणि दुसरा डाव – ८५.३ षटकांत सर्वबाद ३३९ (अजिंक्य रहाणे १०८, सूर्यकुमार यादव ७०, शिवम दुबे ४८, अनुज ठकराल ४-७०, अंशुल कंबोज २-५७) विजयी विरुद्ध हरियाणा – पहिला डाव ३०१ आणि दुसरा डाव ५७.३ षटकांत सर्वबाद २०१ (लक्ष्य दलाल ६४, सुमीत कुमार ६२, जयंत यादव २७, रॉयस्टन डायस ५-३९, शार्दुल ठाकूर ३-२६, तनुष कोटियन २-१५).

हेही वाचा :

डी. गुकेशचे आव्हान संपुष्टात

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00