Home » Blog » Mumbai Semi-Final : विदर्भाची आघाडी अडीचशेपार

Mumbai Semi-Final : विदर्भाची आघाडी अडीचशेपार

मुंबईच्या पहिल्या डावात २७० धावा; आकाशचे झुंजार शतक

by प्रतिनिधी
0 comments
Mumbai Semi-Final

नागपूर : विदर्भाने रणजी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बुधवारी मुंबईचा पहिला डाव २७० धावांमध्ये संपवून ११३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर, तिसऱ्या दिवसअखेर विदर्भाने दुसऱ्या डावामध्ये ४ बाद १४७ धावा करून ही आघाडी २६० धावांपर्यंत वाढवली.

नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. विदर्भाच्या पहिल्या डावातील ३८३ धावांना प्रत्युत्तर देताना मुंबईची स्थिती दुसऱ्या दिवशी ७ बाद १८८ अशी झाली होती. मंगळवारी नाबाद राहिलेल्या आकाश आनंद आणि तनुष कोटियनने आठव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचली. तनुष ३३ धावांवर बाद झाल्यानंतर आकाशने मोहित अवस्थीच्या साथीने मुंबईला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. सलामीवीर आकाशने प्रथमश्रेणी क्रिकेटमधील दुसरे शतक झळकावताना २५६ चेंडूंमध्ये ११ चौकारांसह १०६ धावांची झुंजार खेळी केली. विदर्भाकडून पार्थ रेखाडेने ४, तर यश ठाकूर व हर्ष दुबे यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

दुसऱ्या डावात विदर्भाची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरने सलामीवीर अथर्व तायडेला शून्यावर बाद केले. ध्रुव शौरी, दानिश मालेवार हे पहिल्या डावातील अर्धशतकवीर अनुक्रमे १३ व २९ धावांवर परतले. करुण नायरही ६ धावांवर बाद झाल्यामुळे २१ व्या षटकात विदर्भाची अवस्था ४ बाद ५६ अशी झाली होती. मात्र, यश राठोडने कर्णधार अक्षय वाडकरच्या साथीने संघाचा डाव सावरला. या दोघांनी दिवसअखेरपर्यंत मुंबईला आणखी यश मिळू न देता पाचव्या विकेटसाठी नाबाद ९१ धावांची भागीदारी रचली. यशने १०१ चेंडूंमध्ये ४ चौकारांसह नाबाद ५९ धावा केल्या, तर अक्षयने नाबाद ३१ धावा करून त्याला पूरक साथ दिली.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात, केरळच्या ४५७ धावांना चोख प्रत्युत्तर देत गुजरातने तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावामध्ये १ बाद २२२ धावा केल्या. गुजरातकडून सलामीवीर प्रियांक पांचालने नाबाद शतक झळकावताना २०० चेंडूंमध्ये १३ चौकार व एका षटकारासह ११७ धावा फटकावल्या. आर्य देसाई ११८ चेंडूंमध्ये ११ चौकार व एका षटकारासह ७३ धावा करून बाद झाला. गुजरातचा संघ अद्यापही २३५ धावांनी पिछाडीवर आहे.

संक्षिप्त धावफलक : विदर्भ पहिला डाव ३८३ आणि दुसरा डाव – ५३ षटकांत ४ बाद १४७ (यश राठोड खेळत आहे ५९, अक्षय वाडकर खेळत आहे ३१, दानिश मालेवार २९, शम्स मुलाणी २-५०, शार्दुल ठाकूर १-१४) विरुद्ध मुंबई पहिला डाव – ९२ षटकांत सर्वबाद २७० (आकाश आनंद १०६, शार्दुल ठाकूर ३७, तनुष कोटियन ३३, पार्थ रेखाडे ४-५५, हर्ष दुबे २-६८).

हेही वाचा :

फर्ग्युसन चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

स्पेनने भारताला नमवले

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00