कोलकाता : रहाणे, सूर्यकुमारची अर्धशतके; शार्दुलच्या सहा विकेट रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये मुंबईने तिसऱ्या दिवसअखेर हरियाणाविरुद्ध दुसऱ्या डावात २९२ धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावामधील १४ धावांच्या नाममात्र आघाडीनंतर मुंबईने सोमवारी दुसऱ्या डावात ४ बाद २७८ धावा केल्या. मुंबईकडून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके झळकावली. (Mumbai Lead)
मुंबईच्या पहिल्या डावातील ३१५ धावांना प्रत्युत्तर देताना हरियाणाने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद २६३ पर्यंत मजल मारली होती. त्यामुळे, हरियाणा पहिल्या डावामध्ये आघाडी घेईल, असा अंदाज होता. तथापि, सोमवारी सकाळी शार्दुल ठाकूरच्या स्विंग माऱ्यासमोर जेमतेम १३ षटकांमध्येच हरियाणाचा डाव संपुष्टात आला. सोमवारच्या पाचही विकेट शार्दुलने काढल्या. डावामध्ये ५८ धावा देत ६ विकेट घेऊन त्याने मुंबईला १४ धावांची आघाडी मिळवून दिली. (Mumbai Lead)
दुसऱ्या डावामध्ये मुंबईचे सलामीवीर लवकर बाद झाले, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या रहाणेने सिद्धेश लाडसोबत अर्धशतकी, तर सूर्यकुमारसोबत शतकी भागीदारी रचली. सिद्धेश ७५ चेंडूंमध्ये ४ चौकार व एका षटकारासह ४३ धावा करून बाद झाला. सूर्यकुमारने ८६ चेंडूंमध्ये ८ चौकार व २ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर रहाणे आणि शिवम दुबे यांनी दिवसअखेरपर्यंत यशस्वीपणे किल्ला लढवला. खेळ थांबला, तेव्हा रहाणे १४२ चेंडूंमध्ये १० चौकारांसह ८८, तर दुबे ३० धावांवर खेळत होता. (Mumbai Lead)
उपांत्यपूर्व फेरीतील अन्य सामन्यांमध्ये, जम्मू आणि काश्मीरने केरळविरुद्ध दुसऱ्या डावामध्ये ३ बाद १८० धावा केल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरकडे १७९ धावांची आघाडी आहे. विदर्भाने तमिळनाडूविरुद्ध दुसऱ्या डावामध्ये ५ बाद १६९ धावा केल्या असून त्यांची आघाडी २९७ धावांपर्यंत वाढली आहे. विदर्भाकडून दुसऱ्या डावामध्ये यश राठोडने नाबाद ५५ धावांची खेळी केली. चौथ्या सामन्यामध्ये, गुजरातने सौराष्ट्राविरुद्ध पहिल्या डावामध्ये ५११ धावांचा डोंगर उभारून २९५ धावांची भक्कम आघाडी घेतली. गुजराकडून जयमीत पटेल (१०३) व उर्विल पटेल (१४०) यांनी शतके झळकावली. त्यानंतर, तिसऱ्या दिवसअखेर सौराष्ट्राने दुसऱ्या डावात बिनबाद ३३ धावा केल्या असून डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना आणखी २६२ धावांची गरज आहे. (Mumbai Lead)
संक्षिप्त धावफलक : मुंबई – पहिला डाव ३१५ आणि दुसरा डाव ६७ षटकांत ४ बाद २७८ (अजिंक्य रहाणे खेळत आहे ८८, सूर्यकुमार यादव ७०, सिद्धेश लाड ४३, अनुज ठकराल २-६१, सुमीत कुमार १-४२) विरुद्ध हरियाणा – पहिला डाव ८४.५ षटकांत सर्वबाद ३०१ (अंकित कुमार १३६, शार्दुल ठाकूर ६-५८).
हेही वाचा :