मुंबई : जमीर काझी : २६/११ च्या हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाबपासून ते अनेक कुख्यात गँगस्टरला धडकी भरविणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेची ऐतिहासिक इमारत आता कालबाह्य होणार आहे. तब्बल ११९ वर्षे जुन्या या दगडी इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. याठिकाणी पूर्ण मुंबई महानगरवर नजर ठेवणारे अद्यावत कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात येणार आहे. (Mumbai crime branch)
पाच मजली इमारतीच्या बांधकामासाठी ६० कोटी खर्च अपेक्षित आहे. यंदाच्या नव्या आर्थिक वर्षात त्याची तरतूद केली जाणार आहे. असे गृह विभागातील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पोलीस आयुक्तालयाच्या आवारात सध्या अस्तित्वात असलेली गुन्हे शाखेची इमारत दगडी इमारत १९०६ पासून कार्यरत आहे. या ठिकाणी अनेक गँगस्टर, हाजी मस्तान, याकूब लाला, दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी टोळीतील अनेक कुप्रसिद्ध गँगस्टर, मुंबई दंगल, १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींना बराकीत ठेवण्यात आले होते. २६/११ वेळी जिवंत पकडण्यात आलेल्या अजमल कसाबला याठिकाणी तपासावेळी ठेवण्यात आले होते. (Mumbai crime branch)
या इमारतीत क्राईम बॅन्चचे सहआयुक्त, उपायुक्त व इतर अधिकाऱ्यांची कार्यालय आहेत. इमारत जुनी व अत्यंत जीर्ण झाल्याने वारंवार दुरुस्ती करावी लागते. तसेच आयुक्त कार्यालयात वेळोवेळी गरजेनुसार नवीन शाखा उघडत असल्याने जागेची कमतरता भासत आहे. आर्थिक गुन्हे शाखेला सध्याची उपलब्ध जागा अपुरी पडत आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आणि भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई शहरातील मुख्य व दाटीवाटीच्या ठिकाणच्या हालचालीवर योग्य प्रकारे निगराणी ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता अत्याधुनिक प्रशस्त आणि सुसज्ज कमांड आणि कंट्रोल सेंटर असणे अत्यंत गरजेचे आहे. त्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नियंत्रण ठेवणे मुंबई पोलीस दलास शक्य होईल. सध्या अस्तित्वात असलेल्या कंट्रोल सेंटर हे पोलीस आयुक्त कार्यालय नवीन इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर कार्यरत आहे. त्यामध्ये फक्त २० ऑपरेटर बसण्याची व्यवस्था आहे. इंटेलिजन्स युनिट लॅब, गंभीर आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी वॉर रूम अस्तित्वात असून महानगरात विविध महत्त्वाच्या ठिकाणी जवळपास ११ हजार कॅमेरे बसविलेले आहेत. भविष्यात कॅमेऱ्याची संख्या वाढू शकते. (Mumbai crime branch)
मुंबई शहरातील महत्त्वाची ठिकाणे अटल सेतू,कोस्टल रोड आणि मेट्रो आदी प्रकल्प सिटी सर्व्हिस प्रणालीशी जोडलेले आहेत. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अद्ययावत कमांड आणि कंट्रोल सेंटरची नितांत गरज आहे. त्यासाठी जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून तेथे वाहनतळासह पाच मजली इमारत नव्याने बांधून त्यामध्ये प्रस्तावित सुसज्ज कमांड कंट्रोल सेंटर प्रस्तावित आहे. त्यासाठी ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रस्ताव मुंबई पोलीस आयुक्तांनी शासनाकडे पाठवला आहे. दहा मार्चच्या नव्या बजेटमध्ये त्यासाठी आवश्यक तरतूद अपेक्षित आहे.
नव्या इमारतीची रचना
तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था
पहिला व दुसऱ्या मजल्यावर कमांड आणि कंट्रोल सेंटर
तिसऱ्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर गुन्हे शाखेची प्रशासकीय कार्यालये
वरिष्ठांची अधिकाऱ्यांची दालने अशी रचना प्रस्तावित आहे.
हेही वाचा :
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकपाल कक्षेत नाहीत