Home » Blog » ठाकरे बंधू, देवरा, शायना एनसी, नांदगावकरांचा लागणार कस!

ठाकरे बंधू, देवरा, शायना एनसी, नांदगावकरांचा लागणार कस!

मुंबई शहर जिल्हा वार्तापत्र

by प्रतिनिधी
0 comments
Mumbai Election file photo

जमीर काझी

महाराष्ट्राचे राजकीय व प्रशासकीय सत्ता केंद्राचे मुख्यालय, गेटवे ऑफ इंडिया, उच्च न्यायालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हाजी अली, मुंबादेवी यासारख्या ऐतिहासिक व जागतिक दर्जाची पर्यटन, धार्मिक स्थळे आणि सर्व प्रमुख राजकीय पक्षांची मुख्यालये आदींचा समावेश असलेल्या मुंबई शहर जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांतील लढती यावेळी विविध कारणांनी लक्षवेधी ठरल्या आहेत.  शिवसेनेतील फूटीनंतर त्यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत असून प्रामुख्याने लढती उद्धव ठाकरे  व शिंदे गट,  भाजपात  होत आहे . त्याचबरोबर गेल्या अडीच तीन दशकापासून स्वतःहून कोणतीही निवडणूक लढविली नसली तरीही प्रत्येक निवडणुकीत ‘गर्जना’वीर म्हणून आकर्षणाचा भाग असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावत आहेत. बहुतांश ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढती होत असून मतविभागणी वरच दिग्गजांच्या विजयाचे समीकरण निश्चित होणार आहे.

आदित्य ठाकरे-देवरा लढत

वरळी मतदारसंघ:

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र व माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे युवाप्रमुख आदित्य ठाकरे या ठिकाणाहून दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. सेनेतील फुटीनंतर आदित्य यांनी मोठ्या हिमतीने आपल्या पित्याच्या पाठिशी उभे राहत महाराष्ट्रभर दौरे करत पक्षाची मोट बांधण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर महायुती, भाजपा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक वादग्रस्त निर्णय व कार्यपद्धतीबाबत  केवळ शाब्दिक  हल्ले न करता आकडेवारीनिशी उघडे पाडत राहिले. त्यामुळे ते फडणवीस, शिंदे यांच्या ‘टार्गेट ‘वर असून त्यांना पराभूत करण्यासाठी राज्यसभेतील खासदार मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवले आहे. वास्तविक हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते, मात्र लोकसभेवेळी दक्षिण मुंबई हा मतदार संघ ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर गेल्या पाच दशकापासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या देवरा कुटुंबाने शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करीत राज्यसभा मिळवली. या मतदारसंघातील गुजराती मतांचे प्रमाणही लक्षणीय असल्याने विधानसभेसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली, तर मराठी मतांची विभागणी व्हावी, यासाठी गेल्यावेळी आदित्य यांच्याविरोधात उमेदवार न देणाऱ्या मनसेशी महायुतीने  ‘अंडरस्टँडिंग’ करून उमेदवार दिला. मनसेचे संदीप देशपांडे रिंगणात असले तरी प्रमुख लढत ही आदित्य व मिलिंद देवरा यांच्यात होत आहे.

अमित ठाकरे पहिल्यांदाच रिंगणात

माहीम मतदारसंघ :

वरळीलाच लागून असलेला माहीम दादर मतदारसंघ यंदा आदित्य ठाकरे यांचे चुलत बंधू व राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे सुरुवातीपासून चर्चेत राहिला आहे. अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच नशीब आजमावत असून लोकसभेला राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्याची परतफेड म्हणून ठाकरे यांना पाठिंबा देण्याची उघड भूमिका भाजपाने घेतली होती. मात्र राज यांनी पुढील मुख्यमंत्री भाजपचा असेल असे विधान केल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे त्यांच्यावर नाराज झाले आहेत, त्याचाच परिपाक म्हणून त्यांनी आपले खंदे समर्थक व विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी  मागे घेण्याबाबत आग्रह केला नसल्याचे सांगितले जाते. या दोघांसह मराठी माणसाचा वरचष्मा असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने महेश सावंत या निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीतील दुसरा युवा नेता विधानसभेत प्रवेश होतो की नाही? याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

शायना एनसी यांच्यामुळे चर्चा

 मुंबादेवी मतदार संघ :

 बहुभाषिक मतदारांचा पगडा असलेल्या मुंबादेवी मतदार संघातून काँग्रेसचे अमीन पटेल सलग चौथ्यांदा विधानसभेत जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पहिल्यांदा मुरली देवरा व त्यानंतर त्यांचे पुत्र मिलिंद  यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या पटेल यांना आपल्या सोबत घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न देवरा यांनी केले होते, मात्र अमीन पटेल हे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आणि लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांना मताधिक्य मिळवून देण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्यांना पराभूत करण्याचा चंग देवरा यांनी बांधला असून त्यासाठी तुल्यबळ उमेदवार असावा म्हणून निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी एक दिवस अगोदर भाजपच्या शायना एनसी या बहुचर्चित व्यक्तिमत्त्वाला शिंदे गटात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली. अमीन पटेल हे  मतदारसंघातील विविध कामांमुळे  त्यांची सकारात्मक प्रतिमा सर्व मतदारांत आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ओरिजनल माल व इम्पोर्टेड माल असे वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या स्थानिक पासून ते दिल्लीतील राष्ट्रीय नेत्यांनी त्याविरोधात प्रतिक्रिया देत मोठा गाजावाजा केला. या ठिकाणी महायुतीकडून’ व्होट जिहाद’ ची वातावरण निर्मिती करण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे.

बाळा नांदगावकर यांची कसोटी

 शिवडी विधानसभा : 

महायुतीने उघडपणे मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला राज्यातील २८८ मतदार संघातील हा एकमेव मतदार संघ आहे. याठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे अजय चौधरी व मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यात पारंपारिक लढत होत आहे. यावेळी ठाकरे गटाकडून सुधीर साळवी यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते. मात्र फुटीच्या काळात ठाकरेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेल्या अजय चौधरी यांनाच मातोश्रीने प्राधान्य दिले, त्यामुळे लालबागच्या राजा मंडळाच्या कामानिमित्ताने परिचित असलेले साळवी यांचे समर्थक नाराज झाले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी साळवींना मातोश्रीवर बोलावून त्यांची समजूत काढण्यात यश मिळवले. मात्र महायुतीच्या पाठिंब्यामुळे प्रचारात आघाडी घेतलेल्या बाळा नांदगावकर यांना पुन्हा चितपट करण्यासाठी साळवी यांना समर्थकांची किती साथ मिळते ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

यामिनी जाधव यांच्यापुढे आव्हान

भायखळा विधानसभा :

या मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटात झुंज होत असून शिंदे गटाच्या उमेदवार व विद्यमान आमदार यामिनी जाधव यांच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार मनोज जामसुतकर यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. मुस्लिम प्राबल्य असल्या या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी माजी आमदार मधुकर चव्हाण,  युसुफ अब्राणी यांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र ठाकरे गटाने ही जागा सोडली नाही. त्यामुळे  काँग्रेस कार्यकर्त्यांत नाराजी असून त्यांची किती मते आघाडीला मिळतात ?  एमआयएमचे फैयाज अहमद हे  किती मते खातात? यावर या ठिकाणचे विजयाचे गणित निश्चित होणार आहे.

तमिल सेल्वन हॅट्ट्रिकवर

 सायन कोळीवाडा विधानसभा : 

 या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कॅप्टन आर तमिल सेल्वन विजयाची हॅट्रिक करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांची लढत प्रामुख्याने काँग्रेसचे उमेदवार गणेश कुमार यादव यांच्याशी होत असून मनसेचे कार्यकर्ते संजय बोगले हेही रिंगणात आहेत. तिरंगी लढतीमध्ये सध्यातरी सेल्विन यांचेच पारडे जड दिसत आहे. या मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा प्रचंड इच्छुक होते, मात्र पक्षाने त्यांना डावल्याने त्यांनी दुसऱ्याच दिवशी कमळ हाती घेत मुंबई भाजपचे उपाध्यक्षपद मिळविले.

कालिदास कोळंबकरांसमोर आव्हान

वडाळा विधानसभा :

राज्यातील सर्वात ज्येष्ठ आमदारांपैकी एक असलेले कालिदास कोळमकर या ठिकाणाहून सलग सातव्यांदा नशीब आजमावत आहेत. विशेषतः त्यांनी शिवसेना, काँग्रेस व भाजप या तिन्ही पक्षांच्या चिन्हावरून निवडणूक लढवित आत्तापर्यंत विजयी परंपरा कायम ठेवली आहे. यावेळी ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव यांनी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले असून मनसेच्या स्नेहल जाधवही रिंगणात आहेत.

धारावीकडे मुंबईचे लक्ष

धारावी मतदारसंघ :

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेला धारावी मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणाहून गेल्या तीन टर्म वर्षा गायकवाड यांनी प्रतिनिधित्व केले आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून त्यापूर्वी त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या वर्षा गायकवाड लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने काँग्रेसने या ठिकाणी त्यांच्या लहान बहीण ज्योती गायकवाड यांना उभे केले आहे. त्यांच्या विरोधात राजेश खंदारे हे शिंदे गटाकडून लढत आहेत तर बसपाने मनोहर रायबागे यांना उमेदवारी दिली आहे. धारावी पुनर्विकासासाठी अदानीला कंत्राट मिळाल्याने महाविकास आघाडी विशेषतः ठाकरे गटाने त्याविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत आला असून प्रामुख्याने गायकवाड व खंदारे यांच्यातच लढत होणार आहे.

नार्वेकरांचा मार्ग सोपा

कुलाबा विधानसभा

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघावर आता भाजपाचे निर्विवाद वर्चस्व असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे  दुसऱ्यांदा या ठिकाणाहून नशीब आजमावित आहेत. त्यांच्या उमेदवारीला माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांनी मोठा विरोध करीत बंडखोरी करण्याचा पवित्र होता. मात्र  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढण्यात यश मिळविले. मनसेनेही उमेदवार न दिल्याने नार्वेकरांचा विजय निश्चित मानला जात आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने या ठिकाणी हिरा देवासी यांना उमेदवारी दिली आहे. ते कितपत मते घेतात? तसेच नीचांकी मतदानामुळे कुप्रसिद्ध असलेल्या या मतदारसंघातील मतांची टक्केवारी यंदा तरी वाढणार का हाच औत्सुक्याचा भाग असणार आहे.

लोढांना चौधरींचे आव्हान

मलबार हिल विधानसभा

राज्यातील सर्वात जास्त व्हीव्हीआयपी व्यक्तींचे निवासस्थान असलेला हा मतदारसंघ भाजपचा गेल्या कित्येक दशकापासून गड मानला जातो. महायुतीकडून भाजपाचे मंत्री व मोठे बिल्डर मंगल प्रभात लोढा पुन्हा रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे भैरूलाल चौधरी रिंगणात आहेत.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00