नवी दिल्ली : महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव करणाऱ्या प्राध्यापकांची एखाद्या दर्जेदार राष्ट्रीय संस्थेच्या डीनपदी कशी काय नियुक्ती केली जाते, असा सवाल काँग्रेसचे खासदार एम. के. राघवन यांनी केला. लोकसभेत शून्य प्रहरात सोमवारी (१७ मार्च) या नियुक्तीबद्दल चिंता व्यक्त केली.(MP Raghwan)
गोडसेची प्रशंसा करणारे विधान प्रा. शैजा ए यांनी केली होती. तरीही त्यांना एका महत्त्वाच्या संस्थेच्या डीनपदी नियुक्ती केली आहे, याकडे राघवन यांनी लक्ष वेधले.शैजा यांची कालिकत येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) च्या डीनपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राघवन हे कोझिकोडचे खासदार आहेत. प्रा. शैजा यांनी, ‘‘गोडसेने भारत वाचवल्याबद्दल अभिमान आहे,’’ असे वक्तव्य केले आहे. तशी पोस्टही त्यांनी ‘एक्स’वर केली होती. या विधानामुळे त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आणि सध्या चौकशी सुरू आहे,’’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘‘दुर्दैवाने, या प्राध्यापिकेने केलेल्या या गंभीर वक्तव्याचे बक्षीस म्हणून तिला बढती देण्यात आली. मला जाणून घ्यायचे आहे की यामुळे संपूर्ण देशासमोर काय संदेश जाईल?,’’ असा सवालही राघवन यांनी केला. (MP Raghwan)
एनआयटी कालिकतने फेब्रुवारीमध्ये प्राध्यापक शैजा यांना बढती देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांची नियुक्ती ७ मार्चपासून लागू होईल, असे म्हटले होते. तेव्हाही काँग्रेस पक्षाने या निर्णयावर टीका केली होती.
त्यावेळी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आणि माध्यम समन्वयक जयराम रमेश म्हणाले, ‘‘जिला गोडसेने भारत वाचवल्याबद्दल अभिमान वाटतो आणि तसे ती जाहीरपणे सांगते, अशा केरळमधील एका प्राध्यापिकेला मोदी सरकारने एनआयटी-कालिकतमध्ये डीन बनवले आहे.’’ (MP Raghwan)
पीटीआयच्या वृत्तानुसार, महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त शैजा यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे गोडवे गाणारी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती.
‘‘हिंदू महासभेचे कार्यकर्ते नथुराम गोडसे, भारतातील अनेकांचे नायक,’’ अशी पोस्ट एका वकिलाने केली होती. त्यावर प्रा. शैजाने टिपणी करताना ते वक्तव्य केले होते.
शैजाने नंतर ती टिप्पणी डिलीट केली, परंतु स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. (MP Raghwan)
तिच्याविरुद्धच्या अनेकांनी तक्रार केली. त्यावर कारवाई करत, कोझिकोड शहर पोलिसांनी आयपीसी कलम १५३ (दंगल घडवण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून चिथावणी देणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
शैजाने केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो, याकडे खासदार राघवन यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.