नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महम्मद युनुस यांच्यात शुक्रवारी भेट झाली. दोन्ही नेत्यांनी भारत बांगलादेश द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. बांगला देशातील सत्तांतरानंतर प्रथमच दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी मोदी यांनी बांगला देशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा युनुस यांच्यासमोर उपस्थित केला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही माहिती दिली. बिमस्टेक (बंगालचा उपसागर बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी पुढाकार) शिखर परिषदेच्या निमित्ताने ही बैठक झाली. (Modi-Yunus meet)
पंतप्रधान मोदी सध्या थायलंडमधील बँकॉकमध्ये आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून काढून टाकल्यानंतर दोन्ही नेत्यांची पहिल्यांदाच भेट झाली. शेख हसीना या सध्या भारतात निर्वासित जीवन जगत असल्याचे मानले जाते. मोदी आणि युनुस यांच्या बैठकीवेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. यापूर्वी, गुरुवारी बिमस्टेक गटातील इतर नेत्यांसोबत मोदी आणि युनुस हे दोन्ही नेते एकत्र दिसले होते. परंतु शेजारील राष्ट्रांमधील संबंध बिघडल्यानंतर शुक्रवारी झालेली द्विपक्षीय बैठक त्यांच्यातील ही पहिलीच बैठक आहे. (Modi-Yunus meet)
भारताच्या विश्वासार्ह आणि विश्वासू मित्र म्हणून पाहिल्या जाणाऱ्या हसीनाच्या हकालपट्टीनंतर बांगला देशात अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यात येत आहे, हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. भारताने त्याबद्दल तीव्र नापंसती व्यक्त केली आहे. दक्षिण आशियाई देशात कट्टर इस्लामी शक्तींच्या उदयाबद्दल भारत आणि बांगलादेशमधील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि मोहम्मद युनुस यांच्यातील भेटीमुळे दोन्ही देशातील संवाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Modi-Yunus meet)
बांगलादेश पाकिस्तान आणि चीनकडे झुकू लागल्याने भारताकडून बांगलादेशाशी असणारे संबंध पुन्हा सुरळीत व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दृष्टीने मोदी आणि युनुस यांच्या भेटीकडे पाहिले जात आहे. (Modi-Yunus meet)
हेही वाचा :
मनोजकुमार यांचे निधन
ट्रॅक्टर विहिरीत कोसळून आठ ठार