नवी दिल्लीः नवी दिल्लीत सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाच्या मंचावरून उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भलावण केल्यामुळे महाराष्ट्राच्या साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखालील ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून नवी दिल्लीत सुरू झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या या संमेलनाचे आयोजन सरहद या संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार संमेलनाचे स्वागताध्य़क्ष आहेत, तर उद्घाटक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संमेलनाला प्रमुख उपस्थिती होती. महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. उषा तांबे, सचिव उज्ज्वला मेहेंदळे, सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार मंचावर उपस्थित होते.
आरएसएसने जगण्याची प्रेरणा दिली
उद्घाटनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भलावण केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मोदी म्हणाले, महाराष्ट्राच्या भूमीवर मराठी भाषिक महापुरुषाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीज रोवले होते. आज संघ एका वटवृक्षाच्या स्वरुपात आपली शताब्दी साजरी करतोय. वेदापासून विवेकानंदांपर्यंतचे विचार पोहोचवण्याचे काम संघ शंभर वर्षे करीत आहे. माझ्यासारख्या लाखो लोकांना आरएसएसने जगण्याची प्रेरणा दिली. संघामुळेच मला मराठी भाषा आणि मराठी परंपरेशी जोडून घेण्याचे भाग्य लाभले
मोदी पुढे म्हणाले, काही महिन्यांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. जगभरात बारा कोटी मराठी लोक आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, याची कोट्यवधी लोकांना प्रतीक्षा होती. ते काम पूर्ण करण्याची संधी मला मिळाली, ही माझ्या आयुष्यातले एक भाग्याची गोष्ट आहे.
मराठी भाषा अमृताहूनि गोड
माझा मराठाचि बोलू कौतुके, परि अमृताते पैजा जिंके, या संत ज्ञानेश्वरांच्या ओळींचा उल्लेख करून मोदी म्हणाले, मराठी भाषा अमृताहून गोड आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीप्रती माझे प्रेम आपण सगळे जाणता. मी आपल्याप्रमाणे मराठीत प्रवीण नाही, पण मराठी बोलण्याचा प्रयत्न आणि नवे शब्द शिकण्याचा प्रयत्न सातत्याने मी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे होत आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना तीनशे वर्षे आणि संविधानाने ७५ वर्षे पूर्ण केली आहेत, अशा वेळी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होत आहे.
भाषा संस्कृतीची वाहक
मोदी पुढे म्हणाले, भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते. आपली भाषा आपल्या संस्कृतीची वाहक असते. भाषा समाजात जन्म घेतात हे खऱे. पण भाषा समाजाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. समर्थ रामदास म्हणायचे, मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. मराठीत शौर्य आहे, वीरता आहे. सौदर्य आणि संवेदना आहे. समानता आणि समरसता आहे. अध्यात्माचे स्वर आणि आधुनिकतेची लहरही आहे. भक्ती, शक्ती आणि युक्तीही आहे. जेव्हा भारताला अध्यात्मिक उर्जेची गरज होती, तेव्हा मराठी संतांनी ऋषींचे ज्ञान मराठी भाषेत सुलभपणे मांडले. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, तुकडोजी महाराज, गोरा कुंभार, बहिणाबाई महाराष्ट्रातल्या या संतांनी भक्ती आंदोलनाद्वारे मराठी भाषेत समाजाला नवी दिशा दाखवली.
केसरी, मराठा या वृत्तपत्रांनी, गोविंदाग्रजांची कविता, गडकरींची नाटके – देशात स्वातंत्र्यआंदोलनाला प्रेरणा दिली. गीतारहस्य टिळकांनी मराठीत लिहिले.
सामाजिक मुक्तीचे द्वार उघडले
मराठी भाषा आणि मराठी साहित्याने शोषित, वंचित वर्गासाठी सामाजिक मुक्तीचे द्वार उघडण्यायाचे अद्भूत काम केले. महात्मा जोतिबा फुले, सावित्राबाई फुले, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्यांनी मराठी भाषेतून नव्या युगाचे सिंचन केले. मराठीने समृद्ध दलित साहित्य दिले. आधुनिक चिंतनामुळे विज्ञानकथांची रचना केली. आयुर्वेद, विज्ञान, तर्कशास्त्रात महाराष्ट्रीयनांनी मोठे योगदान दिले.
आईप्रमाणेच भाषा कुणाशी भेदभाव करीत नाही. भाषा प्रत्येक विचाराचे स्वागत करते, असे सांगून मोदी म्हणाले, भारतीय भाषांमध्ये परस्पर वैर कधीच नव्हते. भाषांनी एकमेकांना स्वीकारले, समृद्ध केले. काही वेळा भाषिक प्रश्नावरून भेद निर्माण करण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा भाषांच्या समृद्ध वारशानेच त्याला उत्तर दिले. देशाच्या सर्व भाषांना आपण प्रमुख भाषा म्हणून पाहतो. मराठीसह सर्व प्रमुख भाषांमध्ये शिक्षणाला प्राधान्य देतोय. महाराष्ट्रातील तरुण आता इंजिनिअरिंग, मेडिकलचे शिक्षणही मराठीतून घेऊ शकतील.

भाषा ही जैविक असते, ती संस्कृतीचे बलस्थान असते : तारा भवाळकर
भाषा ही जैविक आहे. त्यामुळे ती बोलली तर जिवंत राहते. ती केवळ पुस्तकातून आणि ग्रंथांमधून जिवंत राहत नाही, भाषा ही संस्कृतीचे बलस्थान असते, असे मत संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्राला सतत पांडुरंगाचे स्मरण करायला लावणारी ही मराठी भाषा आहे. ती संतांनी जिवंत ठेवली आहे. ज्या दिवशी आईने आपल्या बाळासाठी पहिली ओवी म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली असेल. ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी. लसूण कोथिंबिरी अवघा झाला माझा हारी,’ असे सांगणाऱ्या संत सावता माळी यांनी ही भाषा जिवंत ठेवली, असे त्या म्हणाल्या.
संतांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी भूमी निर्माण केली होती, असे निरीक्षण न्या. महादेव गोविंद रानडे यांनी नोंदवले आहे. अशी ही महाराष्ट्राची महान संत परंपरा आहे, या परंपरेने मराठी समृद्ध केली, असे सांगून त्या म्हणाल्या, ‘‘मराठी केवळ लिखित नाही, ती बोलीमधून पुढे आली. म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातले मावळे मिळाले. त्यांच्यामुळे भाषा जिवंत राहिली.’’
भाषा जोडणरी असते…
भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असते. ती आपलेपण निर्माण करणारी असते. म्हणून ती जोडणारी गोष्ट असायला पाहिजे, तोडणारी नाही. आमच्या अंत्यज स्त्रियासुद्धा बोलत होत्या आणि आज ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो…आणि कोणी कोणी उपहासाने त्यांना फुरोगामी म्हणतात…ते काहीही म्हणू देत पण खरोखरच आमचे संत हे पुरोगामी आहेत. जात-पात, पक्ष-पंथ, स्त्री-पुरूष भेदाच्या पलीकडे हा विचार यामागे आहे. त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाली हा महत्त्वाचा मुद्दा नाही. गुणवत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र माझा हा साहित्यातून जिवंत राहिलेला आहे. कर्तबगारीतून जिवंत राहिलेला आहे, हे संमेलन ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी मराठी माणसांनी एकदा छावणी टाकलेली आहे, हा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे. यापुढील तीन दिवस आपण एकमेकांचे मैत्र घेऊन पुढे जाऊ या, असे आवाहन भवाळकर यांनी केले.
हेही वाचा :
साहित्य ही संस्कृती रचणारी महान शक्ती
नवसमाज निर्मितीत साहित्याला श्रेष्ठ स्थान