कोल्हापूरः येथील कसबा बावडा परिसरात असलेल्या जिल्हा न्यायालयाच्या आवारातून चंदनाची झाडे चोरणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांच्या म्होरक्याला पकडण्यासाठी सातारा येथे गेलेल्या कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. (sandalwood theft in Kolhapur)
त्या चंदन तस्कराला समोर असुनही एलसीबी हात लावू न शकली नाही. सातारा जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या फोनमुळे चंदन तस्कर समोर असतानाही कारवाई न करता पोलिसांना रिकाम्या हाताने परत यावे लागले. कोल्हापूर आणि सातारा पोलीस दलात याची जोरदार चर्चा सुरू आहे. (sandalwood theft in Kolhapur)
दोघा चोरट्यांना कर्नाटकातून अटक
कोल्हापूर शहरातील कसबा बावडा परिसरात जिल्हा न्यायालय आहे. या आवारातील चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याने कोल्हापूर पोलीसांची झोप उडाली होती. न्यायालयाचा परिसरही सुरक्षित नसल्याचे चोरट्यांनी दाखवून दिले. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचे धिंडवडे निघाले. घटनेची गंभीर दखल घेवून न्यायालयाने ताशेरे ओढल्याने बंदोबस्तावरील पोलिसांना निलंबित करण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आंतरराज्य टोळीतील दोघांना कर्नाटकातून अटक केली होती. करण उर्फ समुसलाल सरायलाल पवार (वय ५५) आणि रुलबाबू सरायलाल पवार (वय २०, दोघेही रा. हरदुवा, जि. कटनी, मध्यप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे कसून तपास केल्यावर चोरलेले चंदन विकल्याच्या ठिकाणाचा पत्ता लागला. (sandalwood theft in Kolhapur)
चंदन तस्कर सातारा जिल्ह्यातील
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील एका बड्या चंदन तस्कराच्या पंटरला चंदन विकल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी तपासाची दिशा त्या दिशेला वळवली. पोलिसांचे पथक तीन दिवस सातारा भागात तळ ठोकून होते. त्याचा सुगावा संबंधित चंदन तस्कराला लागल्याने त्याने जोरदार फिल्डिंग लावली होती. आधी त्या भागातील काही पोलीस आणि बोरू बहाद्दरांच्या मध्यस्तीने प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न झाला. मुख्य तस्कराला रेकॉर्डवर न दाखवता त्याच्या पंटरला दाखवण्याचे ठरले. मात्र, न्यायालयाच्या आवारातील विषय तसेच तांत्रिक पुरावे असल्याने कोल्हापूर पोलीस धोका पत्करायला तयार नव्हते. (sandalwood theft in Kolhapur)
तस्करासाठी मंत्र्यांची मध्यस्थी
चंदनाच्या लाकडासाठी तस्कराने थेट सातारा जिल्ह्यातील एका मंत्र्यालाच साकडे घातले. संबंधित मंत्र्यांनी तातडीने वरिष्ठ पातळीवर सूत्रे हलवली आणि आपल्या कार्यकर्त्यांवरील कारवाई टाळण्यात यश मिळवले. वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्याने कोल्हापूरचे पोलीस रिकाम्या हाताने परतले. आंतरराज्य टोळी पकडल्याचा पोलिसांचा आनंद फार काळ टिकला नाही. सातार्यातील चंदन तस्कर पोलिसांना भारी पडला. राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे लागेबांधे कुठल्या थरापर्यंत गेले आहेत, हेही यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
सातारा पोलिसांचे इमान कुणाशी?
चंदन चोरांना पकडल्यावर मूळ तस्कराला पकडण्यासाठी कोल्हापूरचे पोलीस तीन दिवस सातारा जिल्ह्यात तळ ठोकून होते. मात्र, सातारा पोलिसांनी त्यांना कसलेही सहकार्य केले नाही. उलट तस्कराला माहिती पुरवत वाचण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळेल याची व्यवस्था केल्याचे एका पोलिसाने सांगितले. सातारा पोलिसांचे इमान पोलीस दलाशी आहे की चंदन तस्कराशी अशीही चर्चा यानिमित्ताने होत आहे.
हेही वाचाः
Indian bison rescue विहिरीत पडलेल्या गव्याला आज-यात जीवदान
Cheater arrested : आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीकडून २५ कोटीला गंडा
Communal Riots : महाराष्ट्रात सर्वांत जास्त दंगली