Home » Blog » Micro Plastic in Rice : भारतातील तांदळात सूक्ष्म प्लास्टिक कण

Micro Plastic in Rice : भारतातील तांदळात सूक्ष्म प्लास्टिक कण

कर्करोगाचा धोका; डॉ. अनिल गोरे यांचे संशोधन

by प्रतिनिधी
0 comments
Micro Plastic in Rice

कोल्हापूर : प्रतिनिधी : भारतामधील तांदळाच्या विविध नमुन्यांमध्ये सूक्ष्मप्लास्टिक कणांचा शोध आणि महत्वपूर्ण संशोधन प्रा. अनिल गोरे यांनी केले आहे. प्रा. गोविंद भ. कोळेकर, पीएचडी संशोधक पिनल भावसार यांच्या सहकार्यांने हा शोध लावला आहे. बाजारात उपलब्ध तांदळाच्या विविध ब्रॅण्ड्समध्ये सूक्ष्म प्लास्टिक कणांचे प्रमाण आढळते. त्यामुळे कर्करोग, श्वसन विकार आणि पचनाशी संबंधित विकार उद्भवण्याचा धोका आहे. विशेषत: महिलांमध्ये अशा सूक्ष्म प्लास्टिक कणांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे.( Micro Plastic in Rice)

प्रा. डॉ. अनिल ह. गोरे शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगरचे ते मूळचे रहिवासी आहेत. सध्या ते उका तरसादिया विद्यापीठ, तरसादिया इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल सायन्सेस (TICS), सुरत येथे सहयोगी प्राध्यापक आहेत. त्यांनी दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित संस्थेत पोस्टडॉक्टरल संशोधन पूर्ण केले आहे. त्यांच्या संशोधन कारकीर्दीत त्यांना भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून तरुण वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (Micro Plastic in Rice)

डॉ. मोरे यांनी संशोधनात भारतातील तांदळाचे नमुने घेतले. त्यांचे विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासात १०० ग्रॅम तांदळात सरासरी ३०.८ ± ८.६१ कण सूक्ष्म प्लास्टिक आढळले. हे कण मुख्यतः पारदर्शक फायबर स्वरूपाचे आहेत. ते १००-२०० मायक्रोमीटरइतक्या आकाराचे होते. संशोधनाने असे दाखवून दिले की, पॉलीएथिलीन (PE) आणि पॉलीएथिलीन टेरेफ्थेलेट (PET) या प्रकारचे सूक्ष्मप्लास्टिक कण तांदळात आढळतात. हे संशोधन जर्नल ऑफ ह्याझार्डस मटेरिअल्स (Journal of Hazardous Materials) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या अभ्यासाद्वारे तांदळातील सूक्ष्मप्लास्टिक प्रदूषणाचे संशोधन आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. (Micro Plastic in Rice)

डॉ. गोरे यांनी नमूद केले की, सूक्ष्मप्लास्टिक हे अत्यंत घातक दूषित घटक आहे. माणूस आणि पर्यावरणासाठी त्याचा गंभीर धोका आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या तांदळाच्या विविध ब्रॅण्ड्समध्ये सूक्ष्मप्लास्टिक कणांचे प्रमाण आढळते. त्यामुळे कर्करोग, श्वसन विकार, आणि पचनाशी संबंधित विकार अशा दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होतात. विशेषतः पुरुष आणि मुलांपेक्षा महिलांमध्ये सूक्ष्मप्लास्टिक सेवनाचे प्रमाण जास्त आढळले. (Micro Plastic in Rice)

या संशोधनामध्ये पिनल भावसार ( संशोधक विद्यार्थी), प्रा. यासुहितो शिमाडा (मिई युनिव्हर्सिटी, जपान), प्रा. गोविंद कोळेकर (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), प्रा. शशिकांत पटोले (खलीफा विद्यापीठ, यूएई), डॉ. सुमित कांबळे (CSMCRI, भावनगर), आणि मंदीप सोलंकी यांचे मोलाचे सहकार्यआणि योगदान लाभले आहे. (Micro Plastic in Rice)

सुचवलेले उपाय

डॉ. गोरे यांनी सूक्ष्मप्लास्टिक कमी करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी तांदूळ लागवड आणि साठवणुकीसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तांदूळ शिजवतेवेळी पाण्याने किंवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवावे, जेणेकरून त्यातील सूक्ष्मप्लास्टिक कणांचे प्रमाण कमी होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :
रक्त शोषणाऱ्या माशांच्या २३ प्रजातींचा शोध

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00