मायामी : मायामी ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये अग्रमानांकित आर्यना सबालेंका, इटलीची जॅस्मिन पाओलिनी यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये टेलर फ्रिट्झ आणि नोव्हाक जोकोविच या अनुक्रमे तृतीय व चतुर्थ मानांकित खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली आहे. (Miami Tennis)
सबालेंकाने उपांत्यपूर्व फेरीमध्ये चीनच्या नवव्या मानांकित किनवेन झेंगचा ६-२, ७-५ अशी मात केली. सबालेंकाची लढत उपांत्य फेरीमध्ये सहाव्या मानांकित पाओलिनीशी होईल. पाओलिनीनेही उपांत्यपूर्व फेरीतील सामना सरळ सेटमध्ये जिंकला. तिने पोलंडच्या मॅग्डा लिनेटला ६-३, ६-२ असे पराभूत केले. (Miami Tennis)
पुरुष एकेरीमध्ये चौथ्या फेरीमध्ये अमेरिकेच्या फ्रिट्झने ऑस्ट्रेलियाच्या ॲडम वॉल्टनचा ६-३, ७-५ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत फ्रिट्झची लढत इटलीच्या मॅटेओ बेरेटिनीशी होईल. बेरेटिनीला या स्पर्धेमध्ये २९ वे मानांकन आहे. चौथ्या फेरीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या दहाव्या मानांकित ॲलेक्स डिमिनॉरवर ६-३, ७-६(९-७) अशी मात केली. (Miami Tennis) सर्बियाच्या ३७ वर्षीय नोव्हाक जोकोविचने चौथ्या फेरीत इटलीच्या पंधराव्या मानांकित लोरेन्झो मुसेटीला ६-२, ६-२ असे नमवले. हा सामना पावसामुळे उशीरा सुरू झाला. परंतु, जोकोविचने त्याला परिणाम आपल्या खेळावर होऊ दिला नाही. जोकोविचने आतापर्यंत सहावेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तथापि, २०१६ नंतर मागील नऊ वर्षांमध्ये त्याला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना अमेरिकेच्या सॅबेस्टियन कॉर्डा याच्याशी होईल. २४ व्या मानांकित कॉर्डाने फ्रान्सच्या गेल माँफिलिसला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-४, २-६, ६-४ असे हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
हेही वाचा :
अखेरच्या सामन्यातही न्यूझीलंडची बाजी
अर्जेंटिनाची ब्राझीलवर मात