Home » Blog » मानसिक आजार ओळखता यायला हवा!

मानसिक आजार ओळखता यायला हवा!

मानसिक आजार ओळखता यायला हवा!

by प्रतिनिधी
0 comments
mental illness file photo

-सुषमा शितोळे

प्रत्येकालाच कधी ना कधी तरी जीवनात खडतर परिस्थितीशी, अपयशाशी, नैराश्याशी सामना हा करावाच लागत असतो. हा विश्वास जागवण्याचं काम आपण सगळेच करू शकतो. आणि आपल्या प्रयत्नांनंतरही जर ती व्यक्ती त्याच रुग्ण मानसिकतेत असेल तर तिला योग्य त्या मानसोपचारतज्ञाकडं न्यायला हवं. मानसिक आजारांचा आपण आवर्जून अभ्यास करायला हवा. कारण या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेय.

आपल्या घरात, शेजारी, बिल्डींगमध्ये, कॉलनीत कुठंही थोडं थांबून माणसांच्या आत नीट डोकावून पहा.  जे त्या माणसालाही माहित नसेल कदाचित ते तुमच्या लक्षात येऊ शकतं. काय ? तीव्र स्वरुपाचे नैराश्य, चिंता, संशय, अविश्वास, न्यूनगंड, अवास्तव भीती, उदासीनता यापैकी कुठल्यातरी मानसिक आजारानं घेरलेलं मन. ज्यामुळं तो माणूस आत आत प्रचंड एकाकी फील करीत असेल. स्वतःपासून, भोवतालापासून केव्हाच तुटून गेलेला असेल. त्याच्याशी प्रेमानं, संवेदनशीलतेनं बोलून पहा. लक्षात येईल, की वरून वरून तो स्वतःला छान भासवत आहे. नियमितपणे जॉबला जात आहे. घरातील सर्व नित्याची कामं व्यवस्थित करत आहे. कोणालाही किंचितशीही शंका येणार नाही असं सगळं त्याचं जीवन बाहेरून पहाता छान आहे. कारण दुःखी, उदास होण्यासारखं जीवनात काहीच नाहीये. पैसा, कुटुंब, करिअर सारं काही आहे पण तरीही ती व्यक्ती आतून मात्र असमाधानी आहे अन् तिलाही त्याचं कारण समजत नाहीये. नेमक्या दुःखापर्यंत पोहोचता येत नाहीये. त्याला दुःख म्हणावं की दुःखाचा केलेला बाऊ ? कन्फ्युज आहे. रोज स्वतःशीच रडतेय. जीवनात आता काही चांगले घडेल ही आशाच वाटत नाहीये. भोवतालच्या कुठल्याच सुंदर गोष्टी तिला ह्या सुंदर वाटत नाहीहेत. नजरेतल्या सौंदर्याची, प्रेमाची, जीवनविषयक आसक्तीची जागा केवळ वैफल्यानं घेतलीय. ह्यातूनही रस्ता सापडू शकतो व आपल्या सा-या प्रश्नांची, समस्यांची उत्तरं फक्त आणि फक्त आपल्या आतच आहेत, आपणच हे सगळं चित्र बदलू शकतो ह्या ज्ञानापासून ती पार दूर गेलीय. अन् तिची ही अवस्था खरोखरच इतक्या टोकाला गेलेली असू शकते, की त्याची कल्पना इतरांना तर सोडाच त्या व्यक्तीलाही नसते. हे खरोखरच कोणालाही माहीत नसतं. अन् हे समजलंच तर कदाचित तेव्हा समजतं, जेव्हा तिनं एखाद्या भयाण व न पेलवणा-या क्षणी कुठला तरी टोकाचा निर्णय घेतलेला असतो. तो निर्णय मग कोणताही असू शकतो. आत्मघातकीही!

न दिसणारे मानसिक आजार

ब-याच आत्महत्यांमागील कारणं ही अशा न दिसणा-या मानसिक आजारांमध्ये दडलेली असतात. मरण्याआधी चिठ्ठीत त्यानं भलेही काही कारण लिहिले  असेल, पण तो निर्णय घेण्यापर्यंतचा प्रवास हेच त्याचे मूळ कारण असते. आत्महत्या ही घटना खूप उशिरा घडते. त्याच्या मनातल्या अवास्तव भीतीनं, चिंतेनं त्याला खूप आधीच संपवलेलं असतं.  शेतकरी आत्महत्या या विषयातही सखोलपणे पहा. आपण चर्चा करतो ती त्यांच्या आर्थिक हलाखीच्या परिस्थितीची. आपण त्यांना मदतही करतो ती फक्त तेवढीच, पण त्यांना नुसते पैसे देऊन त्यांच्यातली उमेद जागणार नसते. विश्वास जागणं गरजेचं असतं. तो विश्वास जागवू शकलो तर तीच काय कोणतीही व्यक्ती शून्यातूनही उभी राहू शकते. त्यांनाही मग कळतं, की सरळसोट असं जीवन कुणाचंच नसतं. प्रत्येकालाच कधी ना कधी तरी जीवनात खडतर परिस्थितीशी, अपयशाशी, नैराश्याशी सामना हा करावाच लागत असतो. हा विश्वास जागवण्याचं काम आपण सगळेच करू शकतो. आणि आपल्या प्रयत्नांनंतरही जर ती व्यक्ती त्याच रुग्ण मानसिकतेत असेल तर तिला योग्य त्या मानसोपचारतज्ञाकडं न्यायला हवं. मानसिक आजारांचा आपण आवर्जून अभ्यास करायला हवा. कारण या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेय. दर पाच कुटुंबांमागे एक व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त आहे. मात्र हे त्या कुटुंबाला व त्या व्यक्तीलाही माहीत नाहीहे. अन्  जगभरातली आकडेवारी पाहीली तर या आजारांचं सर्वात जास्त प्रमाण भारतात आहे. आज तो आजार भलेही आपल्याला झालेला नसेल, पण ती वेळ आपल्यावर किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीवर येणारच नाही असंही नाही. त्यामुळं शालेय वर्गापासूनच शारिरीक आरोग्याइतकंच मानसिक आरोग्य कसं महत्वाचं आहे हे शिक्षण देणं गरजेचं आहे, इतका हा विषय आज ज्वलंत बनलाय. मात्र आपल्याकडं अद्यापही या विषयाला जाणून घेण्याइतकीही सुरवात झालेली नाही. आपल्याला माहितही नसते, की मानसिक आजारांनी त्रस्त अशा या व्यक्तीच ब-याचदा समाजविघातक कार्यात सामील होण्याची शक्यता असते. वाममार्गाकडं, व्यसनांकडं तर ती सहजच आकर्षिली जाते. गुरू म्हणून भोंदू बाबाच्या नादी लागणारे तर बहुतांशी यातलेच असतात. 

भोंदू बाबांना शरण

गुरू असावा, पण स्वामी विवेकानंदांनी जसं रामकृष्णांना पारखून घेतलं, सतत परीक्षा घेऊन तपासून घेतलं आणि मग त्यांचा गुरू म्हणून स्वीकार केला, तसं हवं. पण बहुतांशी माणसं ही गुरूकडं जाताना मुळात मानसिकदृष्ट्या पंगुच असतात. मनाच्या चांगल्या अवस्थेत आत्मोन्नतीसाठी, ज्ञानासाठी, जीवनाच्या उत्थानासाठी ते गुरूकडे जात नाहीत, तर कुठल्यातरी टोकाच्या नैराश्यातून स्वतःला सावरता येणं जेव्हा अवघड होऊन बसतं, तेव्हा बाबाच्या आशिर्वादामुळं पुन्हा सारं सुरळीत होईल या आशेनं मिळेल त्या बाबाकडं जातात. त्याला गुरू मानतात. की जेव्हा खरं तर त्याला मानसोपचाराची गरज असते. भोंदू बाबांना मोठं वलय प्राप्त होतं ते अशाच माणसांमुळं. अशा माणसांना सेवा, भजन, नृत्यात गुंग ठेवलं जातं. ‘तन, मन धनासह शरण या’ असं सांगितलं जातं. बुध्दीचा डोळा पूर्णतः काढून टाकला जातो. मुळातच मानसिक, बौध्दिकदृष्ट्या कमकुवत बनलेली ही माणसं लगेच बाबाला शरण जातात. त्याच्या प्रभावाखाली येतात. भाबड्या स्त्रिया तर बाबा मागेल ते सारं काही देऊ लागतात. ‘ईश्वराशी संग’, ‘ईश्वराचा प्रसाद’, ‘ ईश्वराशी मिलन’ असं त्याला त्या समजतात. ‘कृष्णानं गोपींसोबत जी प्रेमलीला केली तशीच मी करतोय’, असं त्यांच्यावर बिंबवून तो बाबा कृष्ण गोपिकांच्या विशुध्द प्रेमाला बदनाम करतो. पण ते कळण्याइतकंही तिथं कोणी शुध्दीवर नसतं. कोणी एखादी याविरूध्द बोललीच तर बाकीच्या तिच्यावर तुटून पडतात. पिटतात. ‘बाबाचा प्रत्येक शब्द म्हणजे देवाचा शब्द’. त्या बाबाविरूध्द गुन्हा सिद्ध झाला तरी त्याचे भक्त तो मान्य करत नाहीत. ‘गुरूविरूध्द एकही शब्द ऐकून घेऊ नका, त्याच्याविरूध्द ऐकणं म्हणजे पाप’ अशी गुरू आज्ञा.  त्यानंतर तर मग जाळपोळ, खून, हत्या हे सारं करताना या भक्तांच्या उरल्यासुरल्या सा-याच मानवी भावना मेलेल्या असतात. वाढलेल्या विकाराचे ते अंतिम टोक असते. हे सर्व आपण अनेकदा प्रत्यक्ष बघितलंय. वाचलंय. ऐकलंय.  म्हणूनच हे उदाहरण इथं मी देतेय.  

आतल्या आत चाचपून पाहा

कारण नसताना सतत चिडचिड, उद्वेग होणं, विश्वासच उडणं, संताप, भोवतालच्या गोष्टींबद्दल सतत नकारात्मक बोलणं, हेकेखोरपणा, आपल्यालाच परिस्थिती वाईट मिळालीय, आपलेच नशीब वाईट असं वाटणं, अती भावनिकता, मनात सतत तेचतेच विचार येत रहाणं, विचारच न संपणं, निद्रानाश होणं, काहीही करावंसं न वाटणं, छोटेछोटे निर्णय न घेता येणं, गोंधळ होणं, सैरभैर वाटणं, चूक बरोबर न समजणं, नशा करावीशी वाटणं, मरावंसं वाटणं यातील कोठल्या तरी गोष्टीचा आपल्या आत अतिरेक होतोय का? पुन्हापुन्हा तो मानसिक त्रास होतोय का?  हे जर आपल्या आत चाचपून पाहीलं तरी आपला आजार कळू शकेल, पण आपल्या आत हे असं चाललंय हे आपण तितक्या सूक्ष्मतेनं पहात नाही. बरं लक्षात आलं तरी तसं सांगण्यास आपण घाबरतो. आपण त्या भावना लपवतो. तो आजार आहे हे स्वतःशीही मान्य करत नाही. ते कमीपणाचं, अपराधीपणाचं वाटतं. आपण छान आहोत, आनंदी आहोत, बरोबरच वागत आहोत असंच आपल्याला जगासमोर दाखवायचं असतं. मग तशा प्रत्येक वागण्याचं  समर्थन करत रहातो. कारण तसं मान्य करणे म्हणजे आपणच स्वतःला वेडे म्हणून मान्यता देणं, मग लोक आपल्याकडं त्याच नजरेनं बघतील ही भीती वाटत असते. ती खरीही असते. त्याचे कारणही पुन्हा हेच, की आपल्या लोकांना ह्या आजाराविषयी माहितीच नाहीये. मानसोपचारतज्ञ हे वेड्यांचे डॉक्टर असतात असाच अजूनही आपल्याकडे समज आहे. आजार हा आजार असतो, तो मग शारिरीक असो किंवा मानसिक. योग्य उपचार घेऊन त्यातून बाहेर येऊन जीवन आरोग्यपूर्ण बनवता येतं व तसंच ताबडतोबीनं केलं पाहिजे. कारण त्याकडं जेवढं दुर्लक्ष होत जाईल तेवढं नुकसान आपल्या व आपल्या भोवतालाचंही होत असतं. खूप मोठी मानसिक उर्जा अशा नकारात्मकतेतून वाया जाते. तसं होऊ न देता मानसोपचारतज्ञ तसेच गरज भासल्यास मनोविकारतज्ञाची मदत घेतली पाहीजे. व्यायाम, योग्य आहार, योग्य झोप, योगाभ्यास, ध्यानधारणा यातून मनाचा समतोल पुन्हा नक्कीच मिळवता येतो. त्यासाठी त्याचा अभ्यास केला पाहीजे. स्वतःकडं स्पष्टपणे बघता आलं पाहीजे. कारण त्या तसं बघण्यातूनच उद्याचं जीवन काल, आजपेक्षा अधिक सुंदर होऊ शकतं. जगण्याची समज अधिक परिपक्व होऊ शकते. जसं दीपिका पदुकोण या अभिनेत्रीचे झाले.

दीपिका पदुकोनची कहानी

युट्युबवरील एका मुलाखतीत ती म्हणते, ‘ टूटकर मै औरभी मजबूत हो गयी..’ कदाचित तिची कहाणी खूप जणांनी वाचली, ऐकली असेल. तिच्या या विषयावरील मुलाखती नेटवर उपलब्ध आहेत.  तीही ह्या आजारातून गेलीय व तिनं ते स्वीकारलं. सेलिब्रेटी असूनही तिनं हा आजार लपवला नाही. योग्य ते उपचार केले. त्यातून बाहेर आली व पूर्वीपेक्षाही जगण्याकडं अधिक सकसतेनं पाहू लागली. पण या सर्व काळात तिलाही हेच जाणवलं, की अजूनही लोकांना मानसिक आजारांविषयी साधी तोंडओळखही नाहीये. अन् ज्यांना ती झालीये व प्रत्यक्ष तो आजार आहे ती चुकीच्या दिशेने आयुष्य वाया घालवताहेत. त्यासाठी तिनं ‘ लिव्ह, लव्ह, लाफ ’ ही एनजीओ सुरू केली. जी या आजारांविषयी जागृती निर्माण करते व अशा लोकांना मदत करण्याचे काम करते.  ऋतिक रोशन हा अभिनेताही मानसिक आजारातून गेलाय त्यानंही आजार लपवला नाही. त्यामुळंच त्यांचे पुढील जीवन व करिअरही नीट मार्गी लागू शकले.  पण समजा त्यांनी असे उपचार घेतले नसते तर कल्पना करा की त्यांचे आयुष्य कोठे वहावत गेले असते ? 

तेव्हा जीवन ही आपल्या सर्वांनाच मिळालेली अमूल्य चीज आहे. ते कसेही बहकता कामा नये. निरुपयोगी होता कामा नये.  ते मिळाले आहे तर ते पूर्णार्थाने जगले पाहीजे. व त्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या कायम फिट् असलं पाहीजे व शरिराच्या आरोग्याची जशी काळजी घेतो तशी मानसिक आरोग्याचीही घेतली पाहीजे. त्यात काही बिघाड आला तर त्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. अवस्था अधिक बिकट होण्याआधीच त्यावर योग्य तो उपचार केला पाहीजे. व्यसन हा त्यावर पर्याय नव्हे. जीवन संपवणं हे काही उत्तर असू शकत नाही. अन् मॉं, बापू, बुवा, महाराज, साधू, बाबा अशांकडं जाणं हा तर त्याहीपेक्षा मोठा आत्मघातकी उपाय होईल. वेळीच मानसिक उपचार न करणं यातून आपणच राष्ट्राचं किती मोठं नुकसान करत आलोय हे लक्षात घ्यायला हवं.

आपलं प्रत्येकाचं मानसिक आरोग्य हे आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी अतिशय मौल्यवान अशी गोष्ट आहे हे नीट समजावून घेऊया. ते जपूया. या विषयावर जागृती करूया.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00