छत्रपती संभाजीनगर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील ८८ वर्षीय वृद्ध महिलेची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने रविवारी रात्री १०च्या सुमारास इंडिगो विमानाचे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. संबंधित महिलेला सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जीएमसीएच) नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. (Medical Emergency)
एमआयडीसी सिडको पोलिसांनी मृत प्रवाशाची ओळख पटवली आहे. ती एकटीच प्रवास करत होती.
मृत्यूचे कारण शोधण्यासाठी जीएमसीएच येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे. आम्हाला अद्याप अहवाल मिळालेला नाही. मृताचे कुटुंब छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचले आहे, असे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.सध्या याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. (Medical Emergency)
अधिकाऱ्याने सांगितले की, वृद्ध महिला वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईला गेली होती आणि घरी परतत असताना विमानातच तिची तब्येत बिघडली. “तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. केबिन क्रूला तिची अस्वस्थता लक्षात आली आणि त्यांनी फ्लाइट कमांडरला कळवले. एअर ट्रॅफिक कंट्रोलशी समन्वय साधून, विमान छत्रपती संभाजीनगरला वळवण्यात आले,” असे कल्याणकर म्हणाले. (Medical Emergency)
आपत्कालीन लँडिंगपूर्वी विमानतळावर आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले होते. लँडिंगनंतर, महिलेला ताबडतोब जीएमसीएचमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि तिला मृत घोषित केले. ‘विमान उतरेपर्यंत ती बेशुद्ध होती,’ असे विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
मृतदेह अधिकाऱ्यांना सोपवल्यानंतर आणि सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, विमानाने वाराणसीकडे पुन्हा प्रवास सुरू केला. इतर सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि मानक कार्यपद्धतींनुसार आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात आली आहे, असे छत्रपती संभाजीनगर विमानतळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
तमिळनाडूतील मंत्र्यासह मुलावर ईडी छापे
मला तुरुंगवासाची पर्वा नाही