लखनौ : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील लखनौ सुपरजायंट्स संघाचा वेगवान गोलंदाज मयंक यादव हा यंदाच्या मोसमातील पूर्वार्धात खेळू शकणार नाही. मयंक अद्याप पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसून त्याने नुकताच बेंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर फॉर एक्सलन्समध्ये गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. (Mayank Yadav)
मागील वर्षी बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा मयंक पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. या दुखापतीमुळेच त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती. आयपीएलमध्ये मयंक लखनौ संघाकडून खेळतो. २०२४ मध्ये लखनौने केवळ २० लाख रुपयांना मयंकला करारबद्ध केले होते. तथापि, २०२४च्या मोसमातील प्रभावी कामगिरीमुळे त्याला २०२५च्या मोसमासाठी लिलावात न उतरवता स्वत:कडेच ठेवण्यासाठी लखनौने तब्बल ११ कोटी रुपये मोजले. बीसीसीआयने अद्याप मयंकच्या पुनरागमनाची निश्चित तारीख जाहीर केली नसली, तरी सर्व पातळ्यांवर फिटनेस सिद्ध केल्यास तो आयपीएलच्या उत्तरार्धात खेळू शकेल. (Mayank Yadav)
आयपीएलच्या मागील मोसमामध्ये सातत्याने ताशी १५० पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करून मयंकने लक्ष वेधून घेतले होते. त्याने लागोपाठच्या दोन सामन्यांत सामनावीरचा पुरस्कारही पटकावला होता. तथापि, त्याहीवेळी दुखापतीमुळे त्याला केवळ चार सामनेच खेळता आले होते. २०२५ च्या आयपीएल मोसमापूर्वी भारताचा माजी गोलंदाज झहीर खानने लखनौ संघाचा टीम डायरेक्टर म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. “आम्ही बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या संपर्कात आहोत. मयंक पूर्णत: फिट झाल्यानंतरच त्याला खेळवण्यासंबंधी विचार करण्यात येईल,” असे झहीर म्हणाला. २०२५ च्या मोसमामध्ये लखनौचा संघ रिषभ पंत या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. मोसमातील संघाचा सलामीचा सामना २४ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सशी होईल. (Mayank Yadav)
हेही वाचा :
भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी उठवली
हॅरी ब्रुकची दुसऱ्यांदा ‘आयपीएल’मधून माघार