बीडः केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हत्येच्या घटनेमुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून बीडचा बिहार झाल्याची टीका खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
संतोष देशमुख यांचे अपहरण आणि खून (Santosh Deshmukh Murder)
संतोष देशमुख आणि त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे सोमवारी नऊ डिसेंबरला दुपारी तीन वाजता त्यांच्या टाटा इंडिगो गाडीतून केजहून मस्साजोगकडे जात होते. त्यावेळी शिवराज देशमुख हे ड्रायव्हिंग करीत होते. वाटेत डोणगाव फाट्याजवळच्या टोलनाक्यानजिक एक काळ्या रंगाची स्कार्पिओ त्यांच्या गाडीच्या आडवी लावली. त्या गाडीतून सहा लोक खाली उतरले. त्यापैकी एकाने दरवाजाची काच दगडाने फोडली. गाडीत पाहिले आणि दुसऱ्या बाजुला जाऊन संतोष देशमुख यांच्याकडील दरवाजा उघडून त्यांना बाहेर ओढले. त्याचठिकाणी त्यांना लाकडी काठीने मारहाण केली आणि सोबत आणलेल्या स्कार्पिओमध्ये त्यांना बळजबरीने बसवून केजच्या दिशेने निघून गेले.
अपहरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दोन पथके तपासाठी रवाना केले होती. दरम्यान सायंकाळच्या वेळी संतोष देशमुख यांचा मृतदेह केज ते नांदूरघाट रस्त्यावर दहीटना फाटा येथे आढळून आला. त्यांच्या शरीरावर मारहाणीचे व शास्त्राचे वार होते. पोलिसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय केज येथे आणल्यानंतर तेथे रात्री मोठा जमाव जमला. (Santosh Deshmukh Murder)
पवनचक्की प्रकरणाची पार्श्वभूमी
सहा डिसेंबर रोजी मस्साजोग येथे पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाणीची घटना घडली होती. त्या प्रकल्पावरील सुरक्षा रक्षक मस्साजोग येथील असल्याने संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप करून मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यानी त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. सहा डिसेंबरच्या मारहाणीचा व्हिडिओसुद्धा काही लोकांनी बनवला आणि तो नंतर व्हायरल झाला. यामागे देशमुख यांचाच हात असल्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यामुळेच त्यांनी सोमवारी दुपारी देशमुख यांचे अपहरण केले आणि नंतर त्यांची हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकून दिला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
याप्रकरणी प्रतिक भीमराव घुले (रा.टाकळी ता.केज), महेश सखाराम केदार (रा, मैंदवाड, ता. धारूर) आणि जयराम माणिक चाटे (तांबवा, ता. केज) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अन्य तिघे फरारी आहेत.(Santosh Deshmukh Murder)
बीड जिल्ह्यात संतापाची लाट
संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने आणि रस्ता रोको करण्यात आला. अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको केले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. संतोष देशमुख यांच्या खुन्यांना अटक होत नाही तोपर्यंत रस्ता रोको करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. जरांगे यांनीही आंदोलकांची भेट घेतली. बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ हेही आंदोलनस्थळी पोहोचले. आरोपींसोबत हितसंबंध असल्याचा आरोप केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर करण्यात आला होता. बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी राजेश पाटील यांना तातडीने निलंबित केले. पाच तासानंतर पोलीस प्रशासन आणि जरांगे यांच्या मध्यस्थीनंतर ठिय्या मागे घेण्यात आले. त्यानंतर देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि अंत्यसंस्कारची तायरी सुरु झाली.