इम्फाळ वृत्तसंस्था : मणिपूरच्या (Manipur ) जिरीबाम जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावात दहशतवाद्यांच्या सशस्त्र गटाने किमान सहा घरे जाळली आणि गावकऱ्यांवर हल्ला केला. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की गुरुवारी संध्याकाळी जारोन हमर गावात ही घटना घडली. दहशतवाद्यांच्या एका गटाने सहा घरांना आग लावली.
Manipur : गावातील एका महिलेचा मृत्यू
प्रारंभिक अहवालात असे सूचित होते, की अनेक गावकरी हल्ल्यादरम्यान पळून जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी जवळच्या जंगलात आश्रय घेतला. जाळपोळीमुळे किमान सहा घरांचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कुकी समुदायांनी दावा केला, की या हल्ल्यात गावातील एका महिलेचा मृत्यू झाला; परंतु जिल्हा पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही. मणिपूरमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यापासून जातीय हिंसाचार सुरू आहे आणि आतापर्यंत २०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीच्या निषेधार्थ ३ मे २०२३ रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आला, तेव्हा हिंसाचार झाला.
मणिपूरच्या एकूण लोकसंख्येच्या ५३ टक्के लोकसंख्या मैतेई आहे आणि ते प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतात, तर नागा आणि कुकींसह आदिवासी समुदाय ४० टक्के आहेत आणि प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.
हेही वाचा