नवी दिल्ली : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात योग्य नियोजन नसल्याचा आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जहरी टीका केली आहे. भाविकांसाठी अपुरे नियोजन आहे. त्यामुळे महाकुंभ मृत्यूकुंभमध्ये बदलला आहे, अशा कडक शब्दांत टीका केली आहे. ममतांच्या टीकेनंतर भाजपने त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. (Mamata slams yogi)
प्रयागराज येथील महाकुंभसाठी देशविदेशातील कोट्यवधी भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. पण योग्य नियोजन नसल्याने भाविकांना मोठा फटका बसला आहे. पवित्र स्नानाच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तीस भाविकांचा मृत्यू झाला आहे. महाकुंभ नगरीत आगीच्या घटनाही घडल्या आहेत. प्रयागराजमध्ये प्रचंड गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. प्रयागराज शहरातून प्रवेश करणाऱ्या सर्व मार्ग बाहेरुन येणाऱ्या वाहनांना बंद केले आहेत. हजारो भाविकांना वीस ते पंचवीस किलोमीटरचा प्रवास करुन पवित्र स्नान करावा लागत आहे. (Mamata slams yogi)
या संदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी महाकुंभमध्ये भाविकांच्या सोयी सुविधांत मोठी तफावत असल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाकडे योग्य नियोजनाचा अभाव असल्याचा दावा केला आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या. “हा मृत्यूकुंभ आहे. मी महाकुंभाचा आदर करते. मी पवित्र गंगा मातेचा आदर करते. पण महाकुंभात कोणतेही नियोजन नाही. चेंगराचेंगरीत किती लोक बरे झाले?. श्रीमंत, व्हीआयपीसाठी एका लाख रुपयांपर्यंत तंबू मिळवण्यासाठी व्यवस्था उपलब्ध केली आहे. पण गरिबांसाठी महाकुंभात कोणतीही व्यवस्था नाही. मेळ्यात चेंगराचेंगरीची परिस्थिती नित्याची झाली आहे. चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून व्यवस्था करण्याची गरज आहे. तुम्ही कोणते नियोजन केले आहे? असा प्रश्नही ममता बॅनर्जी यांनी केला. (Mamata slams yogi)
महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर केलेल्या शवविच्छेदनावरही ममता बॅनर्जी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. पिडितांना भरपाई देण्यात आली आहे का असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “महाकुंभातील चेंगराचेंगरीत अनेक लोक मृत्यूमुखी पडले. उत्तर प्रदेश सरकारने किती भरपाई दिली?. चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या पश्चिम बंगालमधील मृतांचे पोस्टमार्टमही करण्यात आले नाही. पश्चिम बंगाल सरकारने मृतांचे पोस्टमार्टम केले. जर मृत्यूचे नेमके कारण माहीत नसले तर सरकारने भरपाई कशी दिली? उत्तर प्रदेश सरकारने मृत्यूचे कारण सांगितलेले नाही”. (Mamata slams yogi)
ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी हिंदू आणि संत समुदायाला आवाहन केले आहे. तुम्ही खरे हिंदू असाल तर राजकारणापलिकडे जाऊन ममता बॅनर्जींच्या या शब्दांचा तीव्र विरोध करा, असेही अधिकारी म्हणाले.